
Chh. Sambhajinagar News : यंदाच्या खरीप हंगामात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ७८ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेल्या तूर पिकाची आताची स्थिती चांगली आहे. खरिपातील एकूण पिकांपैकी तुरीचे पीक बहुतांश भागात सुस्थितीत असल्याचे दिसते. खास करून बागायती तुरीची स्थिती कोरडवाहूपेक्षा अधिक चांगली आहे. पिकासाठी पोषक स्थितीमुळे यंदा तुरीच्या पिकाकडून आशा उंचावल्या आहेत.
मराठवाड्यात तुरीचे सर्वसाधारण क्षेत्र ४ लाख ९१ हजार ५३६ हेक्टर इतके आहे. त्या तुलनेत प्रत्यक्षात ३ लाख ८७ हजार ७५५ हेक्टरवर अर्थात ७८.८९ टक्के क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली. पेरणी झालेल्या या तुरीमध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांतील १ लाख ३८ हजार २१६ हेक्टर तर लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यांतील २ लाख ४९ हजार ५३८ हेक्टरवरील तुरीच्या पिकाचा समावेश आहे.
सर्वसाधारण क्षेत्राचा विचार करता छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या तीन जिल्ह्यांत सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ९७.१४ टक्के तर लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ७१.४५ टक्के क्षेत्रावरच तुरीची पेरणी झाली. त्यातही संपूर्ण मराठवाड्यात केवळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत पुढे जाऊन १०१.२४ टक्के क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली.
तर धाराशिव जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत सर्वांत कमी ४९.६ टक्के क्षेत्रावरच तुरीची पेरणी झाली. बीडीएन ७११, बीडीएन ७१६, गोदावरी आदी तुरीच्या वाणांना शेतकऱ्यांनी विशेष पसंती दिली आहे. पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी तूर पिकाचे मोठे नुकसान झाले होते. परंतु त्यानंतर आजवर तुरीच्या पिकासाठी स्थिती बऱ्यापैकी पोषक राहिली आहे.
कोरडवाहू क्षेत्रातील काही अपवाद वगळता पिकाची स्थिती बऱ्यापैकी चांगली आहे. कीड-रोगांचा प्रादुर्भाव वातावरण कोरडे असल्याने अत्यल्प आहे. काही ठिकाणी तूर फुलात काही ठिकाणी पापड्या बनण्याच्या अवस्थेत तर काही ठिकाणी दाणे पक्वतेच्या अवस्थेत आहे. सुधारित वाणांसह इतर राज्यातून तूर आणून तिची लागवड करण्याला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिल्याचे दिसते.
खरिपातील सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी, मका आदी सर्व पिकांचा विचार करता तुरीचे पीक सध्याच्या स्थितीला सर्वांत उत्तम असल्याचे शेतकरी सांगतात. कृषी विभागाच्या यंत्रणेचे ही तसेच म्हणणे आहे. त्यामुळे अशीच स्थिती कायम राहिल्यास तुरीचे उत्पादन चांगली येण्याची आशा आहे.
जिल्हानिहाय तुरीचे सर्वसाधारण क्षेत्र प्रत्यक्ष पेरणी (हेक्टरमध्ये)
जिल्हा...सर्वसाधारण क्षेत्र...प्रत्यक्ष पेरणी...टक्के
छ.संभाजीनगर...३५७००.२०...३६१४३.९०...१०१.२४
जालना ...५३३४६...४९९९०...९३.७१
बीड...५३२३७....५२०८३...९७.८३
लातूर...१०१८१६....७३८२०...७२.५०
धाराशिव...८८७४९...४३५४२...४९.०६
नांदेड...६७४२३...६२११३...९२.१२
परभणी...४५९५९...३९०६५...८५
हिंगोली...४३३०६...३०९९७...६८.४२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.