
Nashik News : अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या सिन्नर तालुक्यातील गावांमध्ये सुरू असलेले वितरिकांचे काम चुकीच्या पद्धतीने होत असल्याचा आरोप करत प्रकल्पाच्या मंजूर पहिल्या आराखड्याप्रमाणे काम करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सिन्नरच्या कहांडळवाडी परिसरात सुरू असलेले निळवंडे वितरीकेचे काम संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी (ता. २६) बंद पाडले.
निळवंडे लाभक्षेत्रात सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील कहांडळवाडी, दुसंगवाडी, मलढोण, सायाळे, पाथरे व वारेगाव आदी सात गावांचा समावेश करण्यात आला आहे. दुष्काळाचा सामना करणाऱ्या या गावांना निळवंडेचे पाणी मृगजळासमान वाटू लागले आहे. निळवंडे कालव्याच्या वितरिकांचे काम अपूर्ण असल्याने दोन आवर्तने नदी मार्गाने सोडण्यात आले.
गेल्या वर्षीच्या पहिल्या आवर्तनाचा लाभ मलढोन आणि सायाळे या दोन गावांना झाला झाला. मात्र गेल्या आठवड्यात बंद झालेल्या दुसऱ्या आवर्तनाचा लाभ पुरेशा प्रमाणात झाला नाही. दुसंगवाडी आणि कहांडळवाडी या लाभ क्षेत्रातील गावांना मात्र दोन्ही आवर्तनांपासून वंचित राहावे लागले.
तळेगाव शाखेतून निघणाऱ्या वितरिकेद्वारे देवकवठे, सिन्नरमधील सात गावांना लाभ देण्याचे नियोजन आहे. मात्र सुधारित नकाशांमध्ये सिन्नरमधील गावांची लाभक्षेत्र पद्धतशीरपणे वगळले गेले आहे. वगळण्यात आलेल्या क्षेत्रासाठीच्या पाण्याचा लाभ नगर जिल्ह्यात वाढवण्याचा डाव असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
बुधवारी सिन्नरच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी कहांडळवाडी, दुसंगवाडी, मलढोण या गावातील शेतकऱ्यांनी कहांडळवाडी शिवारात सुरू असलेले वितरिकेचे काम थांबवले. सुधारित नकाशा प्रमाणे असलेले काम आम्हाला मान्य नाही, जुन्या नकाशा प्रमाणेच काम झाले पाहिजे. याबाबत कार्यवाही होत नाही तोपर्यंत पुढचे काम होऊ देणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.
अशोक खरात, सुनील पवार,राहुल काहांडळ, विठ्ठल उगले, दत्तू कहांडळ, नंदू गोराणे, रामनाथ ढमाले, रावसाहेब कदम, नानाभाऊ ढमाले, कचरू घोटेकर, बळीराम घोटेकर, भाऊसाहेब घोटेकर, ज्ञानेश्वर कासार, ज्ञानेश्वर सरोदे, बाळकृष्ण पावले, सुदाम पवार, बाळू डूबे आदी शेतकरी या वेळी उपस्थित होते.
जलसंपदाचा खर्च वाया
समृद्धी महामार्गाच्या कामाच्या वेळेस जलसंपदा विभागाने रस्ते विकास महामंडळाकडे निळवंडे वितरिकांच्या कामासाठी जागा सोडण्यास सांगितले होते. त्यासाठी असणारा खर्च देखील जलसंपदाने दिला होता.
दुसंगवाडी, मलढोण, सायाळे शिवारात निळवंडे वितरिकासाठी ठिकठिकाणी जागा सोडण्यात आली आहे. मात्र नव्याने मंजूर नकाशाप्रमाणे पाणी समृद्धी महामार्ग ओलांडणार नसल्याने जलसंपदाचा हा खर्च वाया गेला. शिवाय समृद्धीच्या विरुद्ध बाजूचे शेतकरी पाण्यापासून कायमस्वरूपी वंचित राहणार आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.