
Pune News: शेतीमालाच्या बाजार व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी फेडरेशन फॉर ॲग्रो, कॉमर्स ॲण्ड ट्रेड (फॅक्ट) या संस्थेतर्फे केंद्र सरकारला मॉडेल सुपर टर्मिनल मार्केटचा आराखडा सादर केला जाणार आहे.
त्याचाच एक भाग म्हणून पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा, बटाटा आणि लसूण विभागांमध्ये व्यावसायिक बदल घडवून आणण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव मिळेल, असा दावा ‘फॅक्ट’चे अध्यक्ष किशोर कुंजीर यांनी पत्रकार परिषदेत केला.
आजमितीस पुणे बाजार समितीमध्ये अयोग्य, अनधिकृत प्रथा वाढीस लागल्यामुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान होत असून, ग्राहकांनाही किमान २५ टक्के जास्त दराने शेतीमाल खरेदी करावा लागत आहे, असे श्री. कुंजीर यांनी सांगितले.
श्री. कुंजीर म्हणाले, ‘‘शेतीमाल महाग झाला की अडत्यांना दोष दिला जातो. तसेच बाजार समितीत अडत्यांची गरजच नाही असे म्हटले जाते. मात्र अडत्या हा शेतीमाल विक्री व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक आहे. बाजार आवारातील ९५ टक्क्यांपेक्षा जास्त चुकीच्या प्रथांना अनधिकृत, सदोष व्यावसायिक व्यवस्थापन जबाबदार असून त्याचे खापर अडत्यांवर फोडले जाते.’’
पुणे बाजार समितीमध्ये अनधिकृत व्यापारामुळे गेल्या २५ वर्षांत आवक घसरून २० टक्क्यांवर आली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बाजार समितीच्या व्यवस्थापनातील त्रुटी दूर करण्यासाठी फॅक्टतर्फे पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर बाजार समितीने अनधिकृत व्यापाराला आळा घालण्यासाठी परिपत्रक देखील काढले.
परंतु राजकीय हस्तक्षेपामुळे त्याला खो बसला असून, अनधिकृत व्यापाराचा विळखा अधिकच घट्ट झाला आहे. फॅक्टने याबाबतची तक्रार पणन संचालकांकडे केली असता त्यांनी त्याची दखल घेऊन बाजार समितीकडे अहवाल मागितला आहे, अशी माहिती श्री. कुंजीर यांनी दिली.
सुपर टर्मिनल मार्केट
सुपर टर्मिनल मार्केट उभे राहिले तर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना प्रगत तंत्रज्ञान, हक्काची बाजारपेठ, योग्य भाव, अद्ययावत पायाभूत सुविधा, बाजार आवारातील सर्व जोखमींचा विमा, सुरक्षितता, निर्यात सुविधा, कृषी पूरक सेवा आदी उपलब्ध होतील, असे श्री. कुंजीर यांनी सांगितले.
‘फॅक्ट’द्वारे प्रचलित बाजार व्यवस्था, व्यावसायिक स्पर्धा, ग्राहकांच्या अपेक्षा, व्यवसायातील भविष्यातील गरजा, संभाव्य बदल, प्रगत देशांतील धोरणे आदी बाबींचा सखोल अभ्यास केला जाणार आहे. त्यासाठी निरनिराळ्या क्षेत्रांतील तज्ज्ञ व्यक्तींचे साह्य घेतले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.