
Ahilyanagar News : रब्बी हंगामातील प्रमुख पीक असलेल्या रब्बी ज्वारीचे यंदा १५ लाख ४० हजार हेक्टरवर उत्पादन घेतले आहे. आता रब्बी ज्वारीच्या काढण्याला सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षी सोळा लाख हेक्टर क्षेत्रावर ज्वारीचे उत्पादन घेतले होते. यंदा कृषी विभागाने अद्याप अंतिम अहवाल प्रसिद्ध केला नसला तरी आता ज्वारीचे क्षेत्र वाढीची शक्यता नाही.
त्यामुळे गतवर्षीपेक्षा यंदा ज्वारीच्या क्षेत्रात ४० हजारांनी घट होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. घटत्या क्षेत्राचा चारा उत्पादनासह अन्नधान्य उत्पादनावरही परिणाम होणार असल्याचे दिसत आहे. पंधरा वर्षांचा विचार केला तर जवळपास ५० टक्के ज्वारीचे क्षेत्र राज्यात घटल्याचे दिसत आहे. असे असले तरी गत वर्षीच्या तुलनेत यंदा आठ जिल्ह्यांत काही अंशी ज्वारीचे क्षेत्र यंदा वाढले आहे.
राज्यात खरीप आणि रब्बीत ज्वारीचे उत्पादन घेतले जात असले तरी रब्बीतील हे प्रमुख पीक आहे. सर्वाधिक अहिल्यानगर, सोलापूर, लातुर, बीड, उस्मानाबादसह विदर्भातील काही जिल्ह्यांत ज्वारी घेतली जाते. ज्वारीचे उत्पादन वाढीसाठी कृषी विद्यापीठांनी नवीन वाण विकसित केलेले असले तरी सर्वाधिक मागणी असलेल्या ‘ज्यूट, बेद्री, मालदांडी’ यांसारख्या जुन्या, देशी वाणाला अजूनही शेतकरी पसंती देत आहेत.
दर वर्षी रब्बीत ज्वारीची हेक्टरी उत्पादकता ५ ते ९ क्विंटल असायची. अलीकडच्या सात ते आठ वर्षांत सुधारित वाणांमुळे उत्पादकता १२ क्विंटलच्या जवळपास गेली आहे. खरिपातही हेक्टरी १२ ते १३ क्विंटलच्या जवळपास उत्पादकता असते. ज्वारीला मागणी असूनही क्षेत्र घटतच आहे. राज्यात ज्वारीचे १७ लाख ५३ हजार ११८ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यंदा सरासरीच्या ८८.९६ टक्के म्हणजे १५ लाख ४० हजार हेक्टरवर उत्पादन घेतले आहे.
गेल्या वर्षी ९६ टक्के म्हणजे १६ लाख हेक्टरवर उत्पादन घेतले होते. यंदा संपूर्ण राज्याचा विचार केला तर गत वर्षीच्या तुलनेत ६ टक्के क्षेत्र घटले आहे. यंदा कृषी विभागाने अजून अंतिम अहवाल प्रसिद्ध केला नसला तरी आता ज्वारीची क्षेत्र वाढीची शक्यता आता नाही.
त्यामुळे यंदा ज्वारी उत्पादन क्षेत्रात ६० हजारांनी घट जवळपास निश्चित झाली आहे. वीस वर्षांतील ज्वारी उत्पादनाचा विचार केला तर क्षेत्रात ५० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. २०१०-११ मध्ये रब्बी ज्वारीची ३० लाख २८ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा राज्यात २९ जिल्ह्यांत ज्वारीचे उत्पादन घेतले असून सध्या काढणीला सुरुवात झाली आहे.
आठ जिल्ह्यांत क्षेत्र वाढ दिलासादायक
ज्वारीचे क्षेत्र वाढावे यासाठी कृषी विभाग व शासन पातळीवर सर्वोतपरी प्रयत्न केले जात असले तरी राज्यातील रब्बी ज्वारीचे घटते क्षेत्र चिंताजनक आहे. पहिल्यापासून ज्वारीच्या कडब्याचा सकस चारा म्हणून वापर होतो. मात्र ज्वारीची काढणी आणि सोंगणी एकाचवेळी करण्याबाबत अजून कोणतेही यंत्र विकसित नाही. त्यामुळे मजुरांचा प्रश्न, आणि काढणीचे किचकट काम करणारे मजूर उपलब्ध होत नसल्याचे क्षेत्र घटीचे प्रमुख कारण मानले जाते.
यंदा मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत विचार केला तर जळगावात २६ हजार हेक्टर, पुण्यात पाच ५ हेक्टर, सातारा जिल्ह्यात १० हजार हेक्टर, सांगली जिल्ह्यात सात हजार हेक्टर, कोल्हापुरात एक हजार हेक्टर, जालना जिल्ह्यात १२ हजार हेक्टर, नांदेडला ८ हजार हेक्टर, परभणीत ११ हजार हेक्टर क्षेत्र वाढले आहे. या आठ जिल्ह्यांतील क्षेत्र वाढ दिलासादायक असली तरी ज्वारीचे आगार असलेल्या जिल्ह्यात मात्र क्षेत्र घटले आहे.
प्रमुख जिल्हातील यंदाचे ज्वारी क्षेत्र (हेक्टर)
अहिल्यानगर ः १,४९,१२९, धुळे ः १३,०८४, जळगाव ः ७४,०८५, पुणे ः ८७,९५४, सोलापूर ः २,५४,०९२, सातारा ः १,३०,१०१, सांगली ः १,१९,३७३, कोल्हापूर ः १२,२७४, छत्रपती संभाजीनगर ः ३२,८०८, जालना ः ८६,११९, बीड ः १,७४,६५०, लातूर ः ३७,१६४, धाराशीव ः १,७२,७४४, नांदेड ः ४१,११९, परभणी ः ९६,३७४, हिंगोली ः ७४,७७९
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.