Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतीची पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकली असून, शेतकऱ्यांना आता पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा लागली आहे. महिनाभरात शेतकऱ्यांनी शेतातील मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. आता मृग नक्षत्रात चांगला पाऊस होईल, या अपेक्षेने शेतकरी बियाणे, खतांची जमवाजमव करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
जिल्ह्यातील बहुतांश शेती कोरडवाहू आहे. त्यामुळे बहुतांश शेतकरी खरीप हंगामातील पिके घेतात. मृग नक्षत्रात वेळेत पाऊस झाला, तर सोयाबीन, उडीद, मूग, तूर ही पिके शेतकरी घेतात. दरवर्षी मोठ्या प्रमाणात शेतकरी सोयाबीनच्या बियाणांची पेरणी करतात. त्यापाठोपाठ उडीद, मूग ही पिके घेतली जातात. ही तिन्ही पिके तीन ते साडेतीन महिन्यांत काढणीला येतात. या पिकांची काढणी केल्यानंतर त्याच रानात शेतकरी रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, गव्हाची पेरणी करतात. सोयाबीन, उडीद व मुगाची पेरणी केली, तर वर्षभरातील खरीप व रब्बी हंगामातील पिके घेता येत असल्याने शेतकऱ्यांचा कल ही तीन पिके घेण्याकडे सर्वाधिक आहे.
यंदा शेतकऱ्यांनी महिनाभरापासून पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला सुरवात केली होती. ज्यांच्याकडे बैलबारदाना आहे, त्यांनी बैलांच्या साह्याने, तर ज्यांच्याकडे नाही त्यांनी ट्रॅक्टरच्या साह्याने शेतीच्या नांगरणीची कामे पूर्ण केली आहेत. पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण करून शेतकऱ्यांनी जमीन पेरणीसाठी तयार केली आहे.
आता या शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती पेरणीयोग्य पावसाची. रोहिणी नक्षत्रात अद्याप जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे मृग नक्षत्रात पेरणीयोग्य पाऊस होईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. वेळेत पाऊस झाला, तर ऐनवेळी धावपळ नको, म्हणून शेतकऱ्यांनी आता बियाणे, खतांची जमवाजमव करण्यास सुरवात केली आहे. मृग नक्षत्र आठवडाभरावर येऊन ठेपले आहे. कृषी विभागानेही जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी बियाणे, खतांची टंचाई निर्माण होऊ नये, याची पूर्वतयारी केली आहे. यंदाच्या मोसमात पाऊस वेळेत होईल, असा हवामान खात्याचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांनाही आता पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा आहे.
७० टक्के क्षेत्रांवर सोयाबीन पेरणीचा अंदाज
यंदा खरिपाच्या एकूण क्षेत्रांपैकी जवळपास ७० टक्के क्षेत्रांवर सोयाबीनची पेरणी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे जिल्ह्यात यंदा सोयाबीनच्या बियाणाला सर्वाधिक मागणी राहणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी पेरणीसाठी गेल्यावर्षी काढणी केलेले सोयाबीनचे घरगुती बियाणे जतन करून ठेवले आहे. ज्यांच्याकडे घरगुती बियाणे उपलब्ध नाही, असे शेतकरी कोणत्या वाणाला उतार चांगला पडेल, याची चाचपणी करीत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.