
नांदेड जिल्ह्यातील मालेगाव (ता. अर्धापूर) शिवारात शिवानंद ग्यानोबा इंगोले यांची पाच एकर जमीन आहे. त्यात १ एकरावर हळद लागवड तर उर्वरित क्षेत्रामध्ये प्रत्येकी १ एकरावर कापूस, टोमॅटो, गहू पिकाची लागवड (Cultivation of wheat crop) आहे. या व्यतिरिक्त जनावरांसाठी चारा पिकांची लागवडही केली जाते.
मागील २० वर्षांपासून ते हळद लागवड करत आहेत. दरवर्षी साधारण १ एकरावर हळद लागवड केली जाते. लागवडीसाठी प्रामुख्याने सेलम वाणाची निवड केली जाते. दरवर्षी एक एकरातून साधारण ३५ ते ४० क्विंटल हळद उत्पादन मिळते.
लागवड नियोजन
मागील हंगामात ऊस लागवड केलेल्या १ एकरामध्ये यंदा हळद लागवडीचे नियोजन केले होते. त्यानुसार नोव्हेंबर महिन्यात ऊस निघाल्यानंतर रोटाव्हेटर मारून जमिनीची चांगली मशागत केली. त्यानंतर जमीन उन्हामध्ये तापू दिली. जेणेकरून जमिनीतील कीड-रोगांच्या अवस्था नष्ट होतील.
मे महिन्याच्या शेवटी जमिनीत चांगले कुजलेले शेणखत एकरी ६ ट्रॉली प्रमाणे शेतात मिसळून घेतले. रासायनिक मात्रा देण्याचे टाळले.
त्यानंतर लागवडीसाठी ट्रॅक्टरचलित यंत्राद्वारे साडेचार फुटांचे बेड तयार केले. तयार बेडवर ठिबकच्या लॅटरल अंथरून घेतल्या. बेड चांगले भिजवून घेतले.
दरवर्षी लागवडीसाठी सेलम जातीचे घरचे हळद बेणे वापरले जाते. लागवडीपूर्वी शिफारशीप्रमाणे बेण्यास जैविक आणि रासायनिक बीजप्रक्रिया केली जाते.
मजुरांच्या मदतीने १५ जूनला बेणे लागवडीस सुरुवात करून २ दिवसांत पूर्ण केली.
साधारण ९ इंच अंतरावर झिगझॅग पद्धतीने बेणे लागवड केली. लागवडीसाठी एकरी साधारण ८ क्विंटल बेणे लागले.
लागवडीनंतरचे कामकाज
संपूर्ण लागवडीमध्ये ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे.
लागवडीनंतर आतापर्यंत पिकास दोन वेळा यंत्राद्वारे मातीची भर दिली आहे. जेणेकरून पावसामुळे कंद उघडे पडणार नाहीत. आलटून- पालटून मशागत केल्यामुळे तणनियंत्रण प्रभावीपणे होते.
पावसाळ्यात शेतात साचलेले पाणी वेळोवेळी बाहेर काढले. यामुळे कंद सडण्याचा धोका कमी झाला.
उगवणीनंतर २० दिवसांनी ठिबकद्वारे १९:१९:१९ हे खत ५ किलो प्रमाणे दिले.
सततच्या पावसामुळे जमिनीत पुरेसा वाफसा तयार होत नव्हता. त्यामुळे भरणीची कामे करणे शक्य नव्हते. दसऱ्याच्या दरम्यान पावसात थोडी उघडीप मिळाल्यानंतर रासायनिक खते आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या मात्रा देऊन यंत्राद्वारे हलकी भरणी केली.
खत व्यवस्थापन
लागवडीनंतर ५० टक्के उगवण झाल्यानंतर ठिबकद्वारे १९ः१९ः१९ या विद्राव्य खताची ५ किलो मात्रा दिली.
साधारण १५ जुलैच्या दरम्यान जैविक खते ३ पोती, डीएपी १०० किलो, १०ः२६ः२६ हे खत १०० किलो, निंबोळी पेंड ५० किलो आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये २० किलो प्रमाणे दिले.
त्यानंतर १ महिन्याने पुन्हा जैविक खते १०० किलो आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या मात्रा दिल्या.
एक नोव्हेंबरला ०ः५२ः३४ हे विद्राव्य खत ठिबकद्वारे दिले.
१० नोव्हेंबरला १३ः४०ः१३ या विद्राव्य खतासोबत बुरशीनाशकांची आळवणी केली.
कीड- रोग व्यवस्थापन
सततच्या पावसामुळे पिकात काही प्रमाणात कंदकुज दिसून आली. त्यासाठी शिफारशीप्रमाणे बुरशीनाशकांची आळवणी केली.
बदलत्या हवामानामुळे पानांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. त्यासाठी शिफारशीत बुरशीनाशकांचा वापर केली.
ऑक्टोबर महिन्यात पाने कुरतडल्याप्रमाणे दिसून आली. नियंत्रणासाठी शिफारशीत कीडनाशकांची फवारणी केली.
आगामी नियोजन
सध्या लागवड होऊन पाच महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. आगामी काळात हळद कंद पोसण्यास सुरुवात होईल.
वाफसा आणि पिकाची पाण्याची गरज पाहून सिंचन केले जाईल. दर ४ दिवसांनी ३ ते ४ तास सिंचन केले जाईल.
डिसेंबर महिन्यात ०:०:५० हे विद्राव्य खत एकरी २५ किलो प्रमाणे दर ८ दिवसांनी ठिबकद्वारे दिले जाईल.
कीड- रोगांच्या प्रादुर्भावासाठी पिकाचे वेळोवेळी निरीक्षण केले जाईल. प्रादुर्भाव आढळल्यास शिफारशीत घटकांची फवारणी केली जाईल.
आवश्यकतेनुसार वातावरणाचा अंदाज घेऊन ठिबकद्वारे विद्राव्य खते, बुरशीनाशके आणि कीडनाशकांच्या मात्रा दिल्या जातील.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.