
Nashik News : तालुक्यातील दुसंगवाडी शिवारात सोमवारी (ता.२१) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास चाऱ्याच्या गंजला लागलेली आग कांदा साठवलेल्या चाळीपर्यंत पोहोचल्याने या घटनेत जनावरांच्या चाळीस हजार रुपयांच्या चाऱ्यासह सुमारे दीडशे क्विंटल कांद्याचे नुकसान झाले. काही कांदा आगीत जळाला. तर आग विझवण्याच्या प्रयत्नात टाकलेल्या पाण्यामुळे उरलेला सर्व कांदा भिजला. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याला लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे.
आनंद त्रंबक गोराणे यांची वावी जवळच्या दुसंगवाडी शिवारात गट नं.८६४मध्ये वस्ती आहे. सोमवारी रात्री खळ्यावर साठवून ठेवलेल्या चाऱ्याच्या गंजीला आग लागली. हवेमुळे ही आग शेजारच्या कांदा चाळीपर्यंत पोहोचली. चाळीमध्ये सुमारे दीडशे क्विंटल कांदा साठवून ठेवण्यात आला होता.
चाळीस हजार रुपयांचा चारा क्षणात जळून खाक झाला. शेजारच्या वस्तीवरील रहिवाशांनी मदतीसाठी धाव घेत आग लागलेल्या चाळीतील कांदा वाचवण्याचा प्रयत्न केला. मिळेल त्या भांड्यांमधून पाणी फेकण्यात आले. आग विझवण्यात यश आले असले तरी संपूर्ण कांदा पाण्यामुळे भिजला.त्यामुळे शेतकऱ्याचे भरून न येणारे नुकसान झाले आहे.पाण्यात भिजल्यामुळे हा कांदा बाजारात न नेता उकिरड्यावर फेकून द्यावा लागणार आहे.
आपत्तीच्या काळात मदतीपासून वंचित
आग लागल्याची घटना घडल्यानंतर गोराने यांनी पोलिसांना ११२ या क्रमांकावर मदत मागितली. वावी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आग नियंत्रित करण्यासाठी अग्निशमन दलाची मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. सिन्नर नगरपालिकेच्या अग्निशमन दलास याबाबतची सूचना देण्यात आली. मात्र तेथील बंब नादुरुस्त असल्याचे सांगण्यात आले.
माळेगाव एमआयडीसीच्या अग्निशमन दलाकडून आग विझवण्याच्या कामासाठी पहिले एका तासासाठी दहा हजार रुपयांचे शुल्क द्यावे लागेल असे सांगण्यात आले. एक तासात आग आटोक्यात आली नाही तर तासानुसार शुल्क आकारणी वाढेल, असेही सांगण्यात आले. पाण्यामुळे कांदा भिजेल आणि नाही विझवला तर आगीमुळे जळेल त्यामुळे आपल्या हातात तसेही काहीच उरणार नाही,असे सांगत शेतकऱ्याने अग्निशमन वाहनासाठी पैसे द्यायला असमर्थता दर्शवली.
शेतकऱ्याचा त्रागा
शासनाकडून मिळणारी मदत तुटपुंजी असेल मात्र त्यासाठी येणाऱ्या कागदपत्रांच्या खर्च देखील परवडेल का असा प्रश्न संबंधित शेतकरी उपस्थित केला. झालेले नुकसान शासन भरून देणार नाही.त्यामुळे पंचनामा करायला या शेतकऱ्याने नकार दिला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.