
Akola News : प्रक्षेत्रावरील घडामोडींच्या नोंदी त्याच वेळी करण्याच्या उद्देशाने कर्मचारी, अधिकाऱ्यांना या हंगामापासून महाकृषी ॲपमध्ये माहिती व अहवाल संकलनाचे काम देण्यात आले आहे. या अॅपचा उद्देश कृषी योजनांची पारदर्शकता वाढवणे व तंत्रज्ञानाचा उपयोग करून कामकाज अधिक परिणामकारक करण्याचा असला तरी या ॲपचा वापर डोकेदुखी बनल्याचे कर्मचारी सांगत आहेत.
शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन कमी आणि माहितीच्या नोंदी, फोटो टाकण्याचे कामच अधिक होत असल्याचे कर्मचारी उपहासाने सांगत आहेत. या अॅपचा प्रत्यक्ष उपयोग करताना अनेक अडचणीही येत असल्याचे समोर येत आहे.
फील्डमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कर्मचाऱ्यांना अॅपमध्ये नोंदणी करणे, माहिती भरणे आणि फोटो अपलोड करणे आवश्यक करण्यात आलेले आहे. परंतु अॅप कधी वेळेत उघडत नाही, तर कधी फोटो अपलोड होत नाहीत. परिणामी, कर्मचाऱ्यांचा बराचसा वेळ नोंदणी व छायाचित्रणात जातो. शेतकऱ्यांशी संवाद कमी आणि बाकी प्रक्रियेतच वेळ अधिक होत आहे.
एका कर्मचाऱ्याने सांगितले, की शेतकरी आपला वेळ देतात. पण आम्ही मोबाइलमध्ये नोंदणी करण्यात गुंतून जातो. त्यामुळे माहिती देणे बाजूलाच राहते. अनेक जण यावर समाधानकारक उपायांची गरज व्यक्त करीत आहेत. अॅपमध्ये ऑफलाइन मोडची सुविधा, एकदा भरलेली माहिती सहज जतन होणे आणि फोटो नंतर अपलोड करण्याचा पर्याय यासारख्या उपायांची मागणीही होऊ लागली आहे.
शेती क्षेत्रात तांत्रिक प्रगती अत्यंत आवश्यक असली, तरी प्रत्यक्ष मार्गदर्शन तितकेच महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांना मोबाइलवर नोंद घेण्यापेक्षा प्रत्यक्ष संवादातून अधिक माहिती मिळते. त्यामुळे अॅपचा उपयोग करताना, कर्मचाऱ्यांना वेळेचे व कार्यक्षमतेचे योग्य नियोजन करता यावे, याची आवश्यकता अधोरेखित होत आहे. यातून सकारात्मक मार्ग काढण्याची गरज आहे.
कर्मचारी बनले, फोटो काढणारे साहेब
सध्या कृषी खात्यातील कर्मचारी हंगामाच्या अनुषंगाने मार्गदर्शनाला गावोगावी जात आहेत. परंतु तेथे गेल्यानंतर बहुतांश वेळ हा ॲपमध्ये माहिती भरण्यातच जातो. त्यानंतर छायाचित्रे काढणे, त्याची सविस्तर नोंद घेणे, अशा बाबी केल्या जात आहेत. प्रत्यक्ष मार्गदर्शन बाजूला राहून या तांत्रिक बाबींमध्येच कर्मचारी व्यग्र होत आहेत. आता कृषी खात्याच्या कर्मचाऱ्यांची ओळख फोटो काढणारे साहेब अशी तयार होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.