Fake Pesticides Scam: विदर्भ, खानदेशात बनावट कीटकनाशकांचा धुमाकूळ

Supply of Fake Pesticides : गुजरातमधून दररोज मोठ्या प्रमाणात बनावट कीटकनाशकांचा पुरवठा होत असल्याची माहिती कृषी सेवा केंद्र चालकांनी दिली.
Pesticide
PesticideAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News: यंदाच्या हंगामात बीजी-२ कापूस बियाण्यांच्या बाजारपेठेला मोठा हादरा देणाऱ्या गुजरातमधील एचटीबीटी बियाण्यानंतर विदर्भ आणि खानदेशात आता बनावट कीटनाशकांच्या विक्रीने धुमाकूळ घातला आहे. गुजरातमधून दररोज मोठ्या प्रमाणात बनावट कीटकनाशकांचा पुरवठा होत असल्याची माहिती कृषी सेवा केंद्र चालकांनी दिली. ही कीटकनाशके स्वस्तात मिळत असल्याने शेतकरी त्याला बळी पडत आहेत.

या अनधिकृत आणि बेकायदेशीर विक्री व्यवहारामुळे शासकीय परवानग्या घेऊन निविष्ठा विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रचालकांना जबर आर्थिक फटका बसत आहे. पेरणीनंतर तणनाशके व कीटकनाशकांची खरेदी-विक्री जोर पकडते. विदर्भ आणि खानदेशातील अनेक तालुक्यांमध्ये दररोज गुजरातहून मोठ्या संख्येने शेतकरी कीटकनाशके आणत आहेत. ही बनावट कीटकनाशके नामांकित कंपन्यांच्या पॅकिंगची हुबेहुब नक्कल करून पॅक केली जातात. ती तुलनेने अत्यंत स्वस्तात शेतकऱ्यांना विकली जातात. त्यामुळे शेतकऱ्यांची दिशाभूल होत आहे.

Pesticide
Fake Pesticides : बनावट कीटकनाशके प्रकरणी दोन जणांवर गुन्हा

मका, कापूस, सोयाबीन, केळी, पपई, उडीद, मूग, तूर आदी पिकांतील कीडनाशके, तणनाशके गुजरातमध्ये स्वस्त दरात मिळत आहेत. खानदेशात कृषी केंद्रात अधिकृतपणे जे कीडनाशक १४०० ते १५५० रुपयांत मिळते, त्याच घटकांचे कीडनाशक तेथे ६०० ते ७०० रुपयांत बिना लेबल, विनापावती मिळत आहे. खानदेशात चांगल्या कंपनीचे कृषी केंद्रांत उडीद, तूर या पिकांतील २० पंपांचे (एक पंप १५ लिटर क्षमता) तणनाशक १४५० ते १५०० रुपयांत मिळत आहे.

पण अंकलेश्‍वर येथे संबंधित कंपनीच्या उडीद, तूर पिकासंबंधीच्या तणनाशकासारखेच तणनाशक ६५० ते ७०० रुपयांत मिळत आहे. मागील हंगामातही खानदेशात तेथून अवैध कीडनाशके, तणनाशके आली. यंदा मागील हंगामाच्या तुलनेत अधिकची कीडनाशके व तणनाशके येत आहेत.

हंगामाच्या सुरुवातीला कपाशीच्या एचटीबीटी बियाण्याचा पुरवठा चर्चेत आला होता. अनधिकृतरीत्या हे बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आले. त्यामुळे बीटी कपाशी बियाण्यांची बाजारपेठ यंदा मोडकळीस आली. अधिकृत बियाणे उत्पादक कंपन्या अडचणीत आल्या. त्यानंतर आता हे बनावट किटकनाशकांचा बाजार फोफावत चालला आहे. ही कीटकनाशके गुजरातमधील अंकलेश्वर व इतर भागांतून येत असल्याचे म्हटले जात आहे. प्रशासनाकडून मात्र याबाबतीत कोणतीही कारवाई होत नसल्याने फसवणुकीच्या प्रकारांना मोकळे रान मिळाले आहे.

Pesticide
Expired Pesticides: मुदतबाह्य कीटकनाशकांमुळे राज्यातील निविष्ठा विक्रेते हैराण

सावधगिरी आवश्यक

बाजारभावापेक्षा जवळपास निम्म्या दरात फवारणीची कीटकनाशके मिळत असल्याने शेतकरी या गोरखधंद्याला बळी पडतात. गावागावातून शेतकरी गट एकत्र गाडी घेऊन गुजरातमध्ये जाऊन स्वतः कीटकनाशके खरेदी करत आहेत. पण या कीटकनाशकांमुळे काही दुष्परिणाम झाले, नुकसान झाले तर कोठेही दाद मागता येत नाही. या व्यवहाराची कुठलीही पावती मिळत नाही. काही ठिकाणी पावती दिली जात असली तरी ती बनावट असण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी, कमी किमतीच्या मोहाला बळी पडू नये, असे आवाहन या क्षेत्रातील जाणकारांनी केले आहे.

कृषी केंद्रांची बाजारपेठ अडचणीत

बेकायदेशीर कीटकनाशक विक्रीचा सर्वांत मोठा फटका अधिकृत कृषी सेवा केंद्र चालकांना बसतो आहे. लाखो रूपयांचा अधिकृत कीटकनाशकांचा साठा दुकानांत पडून आहे. अनेक ठिकाणी शेतकरी स्वस्त व चटकन मिळणाऱ्या बनावट कीटकनाशकांकडे झुकत असल्यामुळे अधिकृत व्यापार पूर्णपणे कोलमडण्याची भीती वाढली आहे. ही बनावट कीटकनाशकांची साखळी आता पोलीस आणि कृषी विभागासाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे.

कृषी विभाग हतबल

कृषी विभाग गुजरातमधील किंवा अन्य भागांतील अवैध कापूस बियाणे घेऊ नका, असे आवाहन वारंवार करीत होता. पण तेथून बियाणे दाखल झाले व त्याची लागवडही झाली. शेतकरी गट बनवून अंकलेश्‍वरमधून अवैध कीडनाशके, तणनाशके आणत असल्याने कृषी विभाग कारवाई करू शकत नाही. कृषी विभाग जणू हतबल झाल्याचे दिसत आहे.

अंकलेश्‍वर रसायनांचे हब

अंकलेश्‍वर रसायने निर्मिती कारखान्यांचे मोठे क्षेत्र आहे. तेथे काही कृषी निविष्ठा उत्पादक कंपन्यांचे कारखानेदेखील आहेत. अंकलेश्‍वरमधून खानदेशात पोहोचण्यास फारसा वेळ लागत नाही. सकाळी तेथे पोहोचा व रात्रीपर्यंत जळगाव, धुळ्यात पोहोचा अशी स्थिती आहे. बऱ्हाणपूर-अंकलेश्‍वर महामार्ग खानदेशातील जळगामधील रावेर, यावल, चोपडा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, तळोदा व अक्कलकुवामधून जातो. या मार्गाने अधिकचे शेतकरी अंकलेश्‍वर येथे पोहोचत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com