Online Satbara : ऑनलाइन सात-बारामुळे बनावट शेतकऱ्याचा भंडाफोड

Online Land Record : कुळ कायद्याची शेतजमीन खरेदी करताना नाशिकमधील संशयिताने स्वत:चा शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून शेतीचा बनावट सात-बारा जोडून शेतजमीन खरेदी केल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे.
Online Satbara
Online SatbaraAgrowon
Published on
Updated on

Nashik News : मौजे तळेगाव (ता. दिंडोरी) येथील कुळ कायद्याची शेतजमीन खरेदी करताना नाशिकमधील संशयिताने स्वत:चा शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून शेतीचा बनावट सात-बारा जोडून शेतजमीन खरेदी केल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे.

दरम्यान, २००४ मधील हा व्यवहार असला, तरी त्याबाबत अलीकडेच तक्रार आली. संबंधित तलाठ्याने ऑनलाइन सात-बारा तपासला असता ही बाब उघडकीस आली. या प्रकरणी दिंडोरी पोलिसांत शेतकरी असल्याचा बनावट सात-बारा पुरावा म्हणून देणाऱ्या संशयिताविरोधात फसवणुकीसह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नरेश बाबूलाल शहा (रा. शिव सोसायटी, झंकार हॉटेलसमोर, गंजमाळ, नाशिक) असे संशयिताचे नाव आहे. मौजे तळेगावचे तलाठी शरद सांडूगीर गोसावी (रा. नवीन आडगाव नाका, नाशिक) यांनी या प्रकरणी दिंडोरी पोलिसांत फिर्याद दिली.

दिंडोरीतील तळेगाव, पिंपळनारे या गावांसाठी तलाठी म्हणून गोसावी यांची नियुक्ती आहे. जुलै २०२३ मध्ये त्यांच्याकडे मौजे तळेगावातील दीड एकर जमिनीच्या झालेल्या व्यवहारासंदर्भात कागदपत्रे तपासणीसाठी अरुण विधाते यांच्यामार्फत तक्रार अर्जान्वये आली होती.

मौजे तळेगावातील दीड एकर कुळकायद्यातील शेतजमीन संशयित शहा याने २००४ मध्ये खरेदी केली. या व्यवहारात दोन्ही पक्षकार हे शेतकरी असणे आवश्यक होते. त्यासंदर्भातील दस्तावेज संशयित शहा याने खरेदीवेळी दुय्यम उपनिबंधक कार्यालयाकडे नोंदणीसाठी दिले.

त्यानंतर विधाते यांच्याकडून खरेदीखत करून जमीन संशयित शहा याने खरेदी केली. हा व्यवहार करीत करताना शहा याने जे दस्तावेज दिले, त्यात शेतकरी असण्याचा सिद्ध करणारा शेतीचा सात-बारा दिला, तोच बनावट असल्याचे तलाठी गोसावी यांनी केलेल्या तपासणीत समोर आले आहे. यासंदर्भात तक्रार अर्ज दिंडोरी पोलिसांनाही देण्यात आला असता त्यांच्याही तपासात तीच बाब समोर आली.

Online Satbara
Digital Satbara : ‘उमंग’ ॲपवरून मिळणार डिजिटल स्वाक्षरीचा सात-बारा

यामुळे संशयित शहा याने बनावट दस्तावेज सादर करीत शासनाचीही फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्याने या प्रकरणी दिंडोरी पोलिसांत फसवणुकीसह विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सहायक निरीक्षक विकास ढोकरे तपास करीत आहेत.

ऑनलाइनमुळे उकल

२००४ मध्ये महसूल विभागाची कोणत्याही दस्ताची माहिती मिळण्याची कोणतीही ऑनलाइन प्रक्रिया नव्हती. मात्र अलीकडे कोणत्याही ठिकाणचा सात-बारा ऑनलाइन पाहता येतो. जुलै २०२३ मध्ये तक्रारदार विधाते यांनी तक्रार केली असता तलाठी गोसावी यांनी व्यवहारातील शहा याच्या दस्ताची तपासणी केली.

त्यात शहा याचा शेतकरी असल्याचा सात-बारा पुरावा जोडला होता. उतारा बाळद बुद्रुक (ता. पाचोरा, जि. जळगाव) येथील होता. त्या गावातील ४६७/२/२ असा गट असलेल्या शेतीचा सात-बारा शहाने सादर केला होता. प्रत्यक्षात बाळद गावात या क्रमांकाचा गटच अस्तित्वात नसल्याचे निष्पन्न झाले.

Online Satbara
Online Property Card : सात-बारा, प्रॉपर्टी कार्ड दुरुस्तीसाठी आता करा ऑनलाईन अर्ज

त्यामुळे सात-बारा बनावट व त्यावर तहसीलदारांसह संबंधितांचे सही-शिक्केही बनावट असल्याचे समोर आले. हीच बाब दिंडोरी पोलिसांनीही तपासली. त्याबाबत पाचोरा तहसीलदारांकडून आलेल्या अहवालातही शहा याचा सात-बारा बनावट असल्याचेच सिद्ध झाले आहे.

या गुन्ह्यातील संशयित शहा याने सादर केलेला सात-बारा हा पुरावाच बनावट असल्याचे निष्पन्न झाले. गेल्या २० वर्षांत त्याने असे आणखीही गुन्हे केल्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिस तपासातून या बाबी समोर येतील.
- विकास ढोकरे, सहायक निरीक्षक, दिंडोरी पोलिस ठाणे
नरेश शहा याने त्याचा शेतकरी असल्याच्या पुराव्यासाठी दिलेला सात-बारा बनावट आहे. तसा अहवालच पाचोरा तहसील विभागाने दिला. शहा याने यासाठी बनावट सही-शिक्के वापरले असून, यातून त्याने अनेक ठिकाणी अशारीतीने व्यवहार केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- शरद गोसावी, तलाठी, मौजे तळेगाव (ता. दिंडोरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com