
Mumbai News : ‘‘सरदार वल्लभभाई पटेल, गोविंद वल्लभ पंत, यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण यांनीही देशाचे गृहमंत्रिपद भूषवले होते. या पदाची प्रतिष्ठा वाढविली, मात्र तडीपार झालेला नेता कधी देशाचा गृहमंत्री झाला नाही,’’ अशा शब्दांत नामोल्लेख टाळत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अमित शहा यांच्यावर जहरी टीका केली.
शिर्डी येथे झालेल्या भाजपच्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. या टीकेला पवार यांनी उत्तर दिले. शरद पवार म्हणाले, की एकेकाळी गुजरात आणि महाराष्ट्र एकच राज्य होते. गुजरातने उत्तम प्रशासकांची ओळख देशाला करून दिली. बाबूभाई पटेल, माधवराव सोळंकी, चिमणभाई पटेल यांनी गुजरातचे मुख्यमंत्रिपद भूषवले.
या व्यक्तींचे वैशिष्ट्य होते, की यापैकी कुणालाही त्यांच्या राज्यातून तडीपार करण्यात आले नव्हते. त्यामुळे तडीपार न केलेले आणि गृहखाते आणि गुजरात आणि देशाच्या विकासात योगदान देणाऱ्या अशा प्रकारच्या नेत्यांची आज मला आठवण येते. देशाच्या गृहमंत्र्यांनी काही भाषण केले. पण थोडीफार माहिती घेऊन भाषण केले, तर लोकांच्या मनात शंकेची स्थिती निर्माण होत नाही.
त्यांनी माझी १९७८ पासून आठवण काढली. मी १९५८ पासून राजकारणात आहे. १९७८ मध्ये ही व्यक्ती राजकारणात कुठे होती हे मला माहीत नाही. पण १९७८ मध्ये मी राज्याचा मुख्यमंत्री होतो आणि माझ्या मंत्रिमंडळात जनसंघाचे नेते उत्तमराव पाटील, हशू अडवाणी, अकोल्याच्या डॉ. प्रतिमाताई चौपे असे अनेक कर्तृत्ववान लोक होते. १९७८ च्या पुलोद सरकारबाबत माहिती घेतली किंवा वाचन केले तर या सगळ्यांनी एकत्रित येऊन महाराष्ट्रासाठी चांगले योगदान दिल्याचे समजेल.
याबरोबरच वसंतराव भागवत आणि प्रमोद महाजन यांनीही आमच्या सर्व कामात सहकार्य केले. भाजपने नेतृत्वाची ही सगळी फळी १९७८च्या नंतरच्या काळात दिली. देशात आतापर्यंत वेगवेगळे पक्ष सत्तेत होते, पण राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये सुसंवाद होता. त्यात अटलबिहारी वाजपेयी, त्या वेळचे गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांची नावे घ्यावी लागतील.
अतिरेकी भूमिका घेऊन त्यांनी कधी राजकारण केले नाही. ही भाजपच्या नेत्यांची पार्श्वभूमी होती. पण हल्लीच्या गृहमंत्र्यांनी माझ्यावर आणि उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या उल्लेखावर भाष्य न केलेले बरे, असे सांगत मराठीत एक म्हण आहे ‘कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठें श्यामभटाची तट्टाणी.’
‘तेव्हा बाळासाहेबांनी त्यांना मदत केली’
‘‘जेव्हा हे गृहस्थ गुजरातमध्ये राहू शकत नव्हते, त्या वेळी त्यांना मुंबईत आसरा देण्यात आला होता. तेव्हा बाळासाहेबांच्या घरी जाऊन मला सहकार्य करावे, अशी विनंती त्यांनी केली होती. याबाबतची माहिती माझ्यापेक्षा उद्धव ठाकरे जास्त सांगतील. पण दुर्दैवाने पातळी किती घसरली हे सांगायला ही पुरेशी विधाने आहेत. अशा व्यक्तीने जी विधाने केली त्याची नोंद पक्ष किती घेतील हेही माहीत नाही,’’ असेही शरद पवार यांनी या वेळी बोलताना म्हटले.
‘मविआ’ची लवकरच बैठक
इंडिया आघाडीत देशपातळीवरील निवडणुकीत एकत्र येण्याचा उल्लेख होता. राज्यातील विशेषतः स्थानिक पातळीवरच्या निवडणुकीत एकत्रित काम करावे, अशी चर्चा आमच्यात कधीही झालेली नाही. पण आता प्रामुख्याने राष्ट्रीय पातळीवरील मुद्द्यावर आपण एकत्रित येण्याची भूमिका घेऊन त्यात सातत्य ठेवण्याची गरज आहे आणि तसा प्रयत्न माझ्याकडून केला जाणार आहे. काँग्रेस, उद्धव सेना आणि आमच्या पक्षाचे नेते एकत्र बसून इथे काही वेगळी भूमिका घेता येईल का याबाबत येत्या ८ ते १० दिवसांत बैठक घेण्यासाठी मी पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘धनंजय मुंडेच्या राजीनाम्याबाबत फडणवीसांनी निर्णय घ्यावा’
‘‘सरपंच हत्येनंतर मराठवड्यातील काही भागांत सामाजिक तणाव निर्माण झालेला आहे. ही बाब मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली. इथे राजकारण न आणता समाजातील सर्व घटकांत एकवाक्यता कशी करता येईल याचा प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिलेले आहे. हे महाराष्ट्राला शोभणारे नाही,’’ असे शरद पवार यांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याविषयी विचारले असता, ते म्हणाले, की माझ्या भूमिकेपेक्षा याचा निकाल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे. संपूर्ण राज्यात चर्चा काय याची नोंद त्यांनी घेतली पाहिजे. वातावरण दुरुस्त करायला राज्यकर्त्यांनी प्रयत्नांची तातडीने पराकाष्ठा केली पाहिजे, हा माझा आग्रह आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.