Nashik News : यंदा जिल्ह्यात अनेक भागांत समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला. यंदा पेरणीही शंभर टक्के पूर्ण झाली आहे. त्यामुळे पोळ्याच्या सणाला ग्रामीण भागात उत्साह दिसून आला.
शेतकऱ्यांनी बैलांना सजवण्यासाठी साहित्याची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी केल्याचे दिसून आले. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात बैलपोळा बाजारात गर्दी कमी दिसून आली.
वाढत्या यांत्रिकीकरणामुळे बैल जोड्यांची संख्या कमालीची घटली आहे. मात्र असे असताना अनेक हौशी शेतकरी बैलांचे संगोपन करत आहेत. त्यामुळे शेतीकामात वर्षभर राबणाऱ्या या बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा करतात.
बैलपोळ्याच्या आठ दिवस अगोदरपासूनच या सणाची तयारी सुरू होते. मात्र पूर्वीच्या तुलनेत बैलांसाठी लागणाऱ्या साहित्यांच्या दुकानांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे पहिल्यासारखा फुलणारा बाजार आता नसल्याची स्थिती आहे. ग्राहकांची संख्याही कमी झाल्याचा परिणाम असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
दरवर्षी पोळ्याला बैलांना सजविण्यासाठी गळ्यातील घुंगरमाळ, कपाळाचे बाशिंग, बेगडे, शिंगाचे गोंडे, बैलांना रंग, रंगीत पट्ट्या, नवीन कासरे, दावे अशा साहित्याने बाजारपेठ भरलेली असते. चालू वर्षी बाजारपेठेतील दुकाने फुलली. ग्रामीण भागात दुकानांत गर्दी दिसून आली. तर शहरात ग्राहकांचा प्रतिसाद अपेक्षित नव्हता. त्यात यंदा बैल सजावट साहित्य १० ते२० टक्क्यांनी महागल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
कसमादे भागात भरतो बैलपोळ्याचा बाजार
ग्रामीण भागात गेल्या पंधरा दिवसांपासून बैल सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याचा बाजार भरत आहे. येथील व्यापारी मनमाड, नांदगाव, चांदवड, देवळा, कळवण, सटाणा, नामपूर, ताहराबाद, जायखेडा, वडेल, सौंदाणे, उमराणे यासह अनेक ठिकाणी विक्रीसाठी जात आहेत. त्यांना चांगला ग्राहक मिळतो. तर नाशिक शहरात पंचवटी परिसरात निमानी, पेठ नाका परिसरात दुकाने थाटली होती. मात्र शेतकऱ्यांची गर्दी कमीच असल्याचे पाहायला मिळाले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.