
Farming Tips :
हवामान अंदाज
विस्तारित श्रेणी अंदाजानुसार (ईआरएफएस), कोकण विभागात रविवार ते शनिवार (ता. १९ ते २५) दरम्यान पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त राहू शकते. कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी, तर किमान तापमान सरासरीएवढे असण्याची शक्यता वर्तविण्यात येते.
काजू
फुलोरा ते फळधारणा अवस्था
काजूच्या नवीन येणाऱ्या पालवीवर ढेकण्या (टी मॉस्कीटो बग) किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ही कीड पालवीतील रस शोषत असल्याने नवीन पालवी सुकून जाते. या किडीच्या नियंत्रणासाठी काजू मोहोर अवस्थेत असताना प्रोफेनोफॉस (५० टक्के प्रवाही) १० मि.लि. आणि फळधारणेच्या वेळी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ६ मि.लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी घ्यावी. फवारणी पानांच्या खालून आणि वरून व्यवस्थित बसेल अशी सकाळी १० पूर्वी किंवा संध्याकाळी ४ नंतर करावी. करावी. कारण पुढे उन्हे तापू लागताच ढेकण्या सक्रीय होतात. ते एका जागी स्थिर राहत नसल्याने फवारणी द्रावणाचा संपर्क जास्त येत नाही. त्यामुळे अपेक्षित नियंत्रण मिळत नाही.
टीप : काजू बागेतील गवत काढून बागेची साफसफाई करावी. नंतर कीटकनाशकाची फवारणी करावी. एकाच कीटकनाशकाची सलग फवारणी घेऊ नये. काजू बागेतील कलमांसोबतच इतर स्थानिक झाडांवर देखील फवारणी करावी. त्यामुळे या किडींच्या प्रादुर्भावावर प्रभावी नियंत्रण मिळण्यास मदत होईल.
काजू पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येऊ शकतो. या रोगामुळे पानांवर करड्या पिंगट रंगाचे अनियमित आकाराचे ठिपके दिसून येतात. रोगाची तीव्रता वाढल्यास संपूर्ण पाने करपतात आणि
गळून पडतात. रोगाच्या नियंत्रणासाठी, मॅन्कोझेब २० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
बागेत मोहोर आल्यावर पाण्यात विद्राव्य १९:१९:१९ या अन्नद्रव्याची २० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. उत्पादन चांगली वाढ मिळते.
काजूची फलधारणा व उत्पादन वाढविण्यासाठी स्वस्त अशा सुकलेल्या माशांचा अर्क ५०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फुलोऱ्यात असताना पहिली फवारणी आणि त्यानंतर १० दिवसांनी दुसरी फवारणी करावी. (ॲग्रेस्को शिफारस)
काजू बियांचे उत्पादन व आकारमान वाढविण्यासाठी प्रति झाड ताज्या किंवा ८ दिवसांपर्यंत साठवलेल्या २५% गोमूत्राची फवारणी करावी. गोमूत्र १२५० मि.लि. प्रति ३७५० मि.लि. पाण्यात मिसळून
तयार झालेले ५ लिटर द्रावण एका झाडावरील फवारणीसाठी वापरावे. २५% गोमूत्राची झाडाच्या बुंध्यामध्ये जिरवणी १० लिटर द्रावण प्रति झाड या प्रमाणे ऑक्टोबर महिन्यापासून दर महिन्याला एकदा या प्रमाणे पुढील चार महिने करावी. (ॲग्रेस्को शिफारस)
कलिंगड
वाढीची अवस्था
कलिंगड पिकामध्ये नागअळीच्या प्रादुर्भाव दिसून
येत आहे. ही अळी पानाच्या आत शिरून
आतील भाग खाते. त्यामुळे पानावर नागमोडी रेषा दिसून येतात. प्रादुर्भाव दिसून येत असल्यास नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा
कडूनिंबयुक्त कीटकनाशक ॲझाडीरेक्टीन
(१० हजार पीपीएम) २० मि.लि. किंवा कारटॅप हायड्रोक्लोराईड (५० टक्के पाण्यात विरघळणारी भुकटी) १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. (टीप : लेबल क्लेम नाही, ॲग्रेस्को शिफारस).
आंबा (हापूस)
फुलोरा ते फळधारणा अवस्था
आंबा फळावरील फळमाशी या किडीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना ः झाडाखाली व बुंध्याजवळील जमीन हिवाळ्यात १० ते १२ सेमी खोल नांगरून घ्यावी. त्यामुळे फळमाशीचे सुप्त अवस्थेतील कोष नष्ट होतात. भविष्यातील प्रादुर्भावाची तीव्रता कमी राहण्यास मदत होते.
तुडतुडे : ढगाळ वातावरण व आर्द्रता यामुळे आंबा पिकावर तुडतुड्यांची पैदास वाढते. किडीने आर्थिक नुकसानीची पातळी (पालवी /मोहोर अवस्थेत १० किंवा त्यापेक्षा तुडतुडे प्रती पालवी / मोहोर) ओलांडली असल्यास पुढील प्रकारे फवारणीचे नियोजन करावे. (प्रमाण प्रति १० लिटर पाणी)
अ) पोपटी रंगाच्या पालवीवर - डेल्टामेथ्रीन (२.८ टक्के प्रवाही) ९ मि.लि.
ब) बोंगे फुटताना - लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ६ मि.लि.
क) मोहोर फुलण्यापूर्वीच्या अवस्थेत - इमिडाक्लोप्रीड (१७.८ टक्के प्रवाही) ३ मि.लि. किंवा ब्युफ्रोफेझीन (२५ टक्के प्रवाही) २० मि.लि.
ड) मोहोर फुलल्यानंतर कणी अवस्थेत असताना - थायामेथोक्झाम (२५ टक्के दाणेदार) १ ग्रॅम.
भुरी : या रोगाच्या नियंत्रणासाठी हेक्झाकोनॅझोल (५ टक्के) ५ मि.लि. किंवा गंधक (पाण्यात विरघळणारे ८० टक्के) २० ग्रॅम.
टीप : मोहोर नुकताच फुलत असताना ते फलधारणा होईपर्यंत कीटकनाशकाची फवारणी शक्यतो टाळावी. फवारणी गरजेचीच असल्यास बागेतील परागीकरण करणाऱ्या कीटकांवर होणारा परिणाम टाळण्यासाठी परागीकरणाचा कालावधी (सकाळी ९ ते १२) वगळून फवारणी करावी. कीटकनाशक किंवा बुरशीनाशकाची फवारणी शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळच्या वेळेस करावी.
किमान तापमानात होणाऱ्या घटीमुळे आंब्याच्या फळे धरलेल्या फांद्यावर पुन्हा नवीन मोहोर येण्याची शक्यता असते. त्यामुळे अन्नाचे वहन नवीन मोहोराकडे होऊन जुन्या मोहोराला असलेली वाटाणा/ गोटी आकाराच्या फळांची गळ दिसून येते. यासाठी मोहोर अवस्थेत असलेल्या आंबा झाडावर पुरेसा मोहोर आला असल्याची खात्री केल्यानंतरच व मोहोर पूर्ण उमललेला असताना पुढील पुनर्मोहोर येण्याची प्रक्रिया टाळण्यासाठी जिबरेलिक ॲसिड (५० पी.पी.एम.) (म्हणजेच १ ग्रॅम प्रति २० लिटर पाणी) आणि पुढे फळे मोहरीच्या आकाराची झाल्यावर स्वतंत्र फवारणी करावी. जिबरेलिक ॲसिडची पावडर पाण्यात अविद्राव्य असून, प्रथम ती थोड्या अल्कोहोलमध्ये विरघळून घेतल्यानंतर पाण्यात मिसळावी.
कमी झालेल्या किमान तापमानामुळे व इतर हवामान घटकांच्या अनुकूलतेमुळे काही ठिकाणी आंबा पिकामध्ये मोहोर धारणा होत आहे. अशा ठिकाणी फळगळ कमी होऊन चांगली फळधारणा होण्यासाठी आम्रशक्ती या विद्यापीठ निर्मित मुख्य व सूक्ष्म विद्राव्य अन्नद्रव्य मिश्रणाची १ लिटर प्रति १९ लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. हे २० लिटर द्रावण चार मोहरलेल्या झाडांसाठी वापरावे. (ॲग्रेस्को शिफारस)
मोहोर धारणा होऊन १५ ते २० दिवस झालेल्या आंबा बागांमध्ये काही ठिकाणी फळधारणा होऊन फळे कणी व वाटाणा आकाराची आहेत. अशा बागांमध्ये पोटॅशिअम नायट्रेट (१%) म्हणजेच १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फळे वाटाणा, गोटी व अंडाकृती अवस्थेत प्रत्येकी एक या प्रमाणे एकूण ३ फवारण्या कराव्यात.
वाढणारे किमान तापमान लक्षात घेता हापूस आंब्यामध्ये फळगळ कमी करण्यासाठी फळे वाटाण्याच्या आकाराची झाल्यावर नॅप्थील ॲसिटीक ॲसिड (२० पीपीएम) म्हणजेच १ ग्रॅम प्रति ५० लिटर पाणी या प्रमाणे मोहोरावर फवारणी करावी. दुसरी फवारणी फळे गोटीच्या आकाराची झाल्यावर १ ग्रॅम प्रति ५० लिटर प्रमाणेच घ्यावी. नॅप्थील ॲसिटीक ॲसीड प्रथम थोड्या अल्कोहोलमध्ये विरघळून घेतल्यानंतर पाण्यात मिसळावे.
डॉ. विजय मोरे, ९४२२३७४००१
(नोडल अधिकारी, कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा योजना, दापोली)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.