
Indapur News: युरोपातून सुमारे पाच ते सहा हजार किलोमीटर लांबीचा प्रवास करुन हजारोंच्या संख्येने भोरड्या इंदापूर तालुक्यात दाखल झाल्या आहेत. भक्षाच्या शोधातील दिवसभराचा भिरभिराट संपल्यानंतर कळस (ता. इंदापूर) परिसरातील दाट काटेरी झाडीवर रात्रीच्या मुक्कामाअगोदर या भोरड्यांच्या आकाशातील मावळतीच्या सोनेरी प्रकाशातील कवायती लक्षवेधी ठरत आहे. भोरड्यांच्या कवायतीचे हे नयनरम्य दृष्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे.
गेल्या काही वर्षांपासून उजनीच्या पाणलोट क्षेत्रातील दाट काटेरी झाडीवर रात्रीचा मुक्काम आटोपणाऱ्या या युरोपीय भोरड्यांनी मागील काही वर्षांपासून कळस गावाच्या गावठाणातील दाट काटेरी झाडांचा आधार घेतल्याचे आढळून येत आहे. गावठाणातील निर्जन स्थळावरील ही काटेरी झाडी या पक्षांच्या मुक्कामासाठी सुरक्षित ठिकाण झाले आहे.
यामुळे येथे हजारोंच्या संख्येने भोरड्या रात्रीचा मुक्काम करत आहेत. मुक्कामापूर्वी मावळतीच्या सोनेरी सूर्यप्रकाशात या भोरड्यांची नयनरम्य कवायत सुरू असते. ज्वारी, किटक, छोटी फळे यांसारखे खाद्यान्न मिळविण्यासाठी रात्रीचा मुक्काम उरकल्यानंतर या भोरड्या छोट्या-छोट्या थव्यांमध्ये विभागून मार्गस्थ होतात. दिवसभर खाद्यान्न मिळविण्याची कसरत आटोपून मावळतीला मुक्कामाच्या ठिकाणी परतल्यानंतर या भोरड्यांची कवायत सुरू होते.
सकाळी विभागून मार्गस्थ झालेले छोटे थवे यावेळी एकत्रित मिसळत मोठा थवा व आवाज करत आकाशात भिरभिरत असतात. मुक्कामाच्या ठिकाणाच्या झाडीवर बसलेल्या इतर पक्षांना हुसकावण्याबरोबर शत्रुला ताकदीचे दर्शन घडविण्याचा या भोरड्यांचा हेतू असतो असे पक्षी अभ्यासक सांगतात.
पक्षी निरीक्षक रामकृष्ण येकाळे म्हणाले, भोरड्यांना शेतकऱ्याचा मित्र म्हणून ओळखले जाते. या पक्षांकडून बीज प्रसाराचे काम मोठ्या प्रमाणावर होते. मुक्कामापूर्वी भोरड्या उथळ पाण्याच्या ठिकाणी अंघोळ करतात. यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी उंच आकाशात त्यांची कवायत सुरू होते.
पाण्यातील काटेरी झाडे, काटेरी झाडे, वड, पिंपळासारख्या मोठ्या झाडांवर भोरड्या मुक्काम करतात. उजनी पाणलोट क्षेत्रामुळे पक्षी विविधतेचा वारसा इंदापूर तालुक्याला लाभला आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने शेकडो प्रजातीचे पक्षी येथे स्थलांतरित होत असतात. अलीकडच्या काळात पाणलोट क्षेत्राबरोबर तालुक्यातील बहुतांश गावांत विविध परदेशी पक्षांचे कमी-अधिक प्रमाणात दर्शन घडत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.