Tomato Crop Damage : शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतरही केवळ बैठकांचा फार्स

Tomato Cultivation : टोमॅटो लागवडीनंतर साधारण ७५ दिवसांत पहिला तोडा तोडणीला येतो. यंदा मात्र वीस दिवस आधीच टोमॅटो तोडणीला आले. मात्र आलेली फळे खराब व बाधित असल्याने पीक हाती आले नाही आणि उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
Tomato Crop Damage
Tomato Crop Damage Agrowon
Published on
Updated on

१) कोल्हापूर जिल्ह्यात हिरव्या चाऱ्याची टंचाई (Fodder Shortage)

कोल्हापूर जिल्ह्यातील वैरण बाजारामध्ये हिरव्या चाऱ्याची आवक ४० टक्क्यांवर आली असून दरातही ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली. पावसाचे आगमन लांबल्यास पशुपालकांसह जनावरांच्या भुकेची व्याकुळता अधिक वाढणार आहे.

यावर्षीचा उन्हाळा सर्वांनाच असह्य करणारा ठरला. त्यात मॉन्सून लांबला असून उन्हाचा तडाखा काही कमी होताना दिसत नाही. अशातच नद्यांचे पात्र कोरडे झाले असताना चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नदीकाठची गवताचे दड्ड, कुरणे पाण्याविना करपली. त्यामुळे वैरण बाजारात चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे.

दररोज होणारी बैलगाड्यांची आवक कमालीची घटली आहे. गवताच्या बरोबरीला शाळूची जेमतेम आवक होऊ लागली आहे. पुरवठा कमी होत असल्याने दराची तीव्र झळही पशुपालकांना सहन करावी लागत आहे. चारा विक्रेत्यांनी गवत, शाळू पेंढीच्या दरात सरासरी ५ ते १० टक्क्यांनी वाढ केल्याचे पाहायला मिळते. पाण्याच्या कमतरतेमुळे चाऱ्याच्या गुणवत्तेवर परिणाम झाल्याचे दिसत आहे.

२) सांगली जिल्ह्यात खरिपाचा अवघा ४ टक्के पेरा (Kharif Sowing)

सांगली जिल्ह्यात गतवर्षी जूनच्या मध्यावर खरिपाचा २३ टक्के इतका पेरा झाला होता. मात्र यंदा पावसाने पाठ फिरवली. याचा फटका खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीवर झाला. यंदा अवघी ४ टक्के म्हणजे १० हजार ६३१ हेक्टवर पेरणी झाली.

धूळ वाफेवर झालेले भात पीकही अडचणीत आले. शेतकऱ्यांनी खरिपाची पूर्ण तयारी केली. मुळात, शिराळा तालुक्यात धूळ वाफेवर भात पेरणीसाठी शेतकरी पुढाकार घेतात. यंदाच्या हंगामात शिराळा तालुक्यात १० हजार ५१ हेक्टरवर भाताची पेरणी उरकली.

परंतू पावसाअभावी भात पीकही संकटात सापडले. त्यामुळे भात उत्पादक शेतकरी हवालदिल झाला. वेळेत पाऊस सुरू झाला नाही तर भात पिकाची दुबार पेरणी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Tomato Crop Damage
Pm Kisan Yojana KYC: पीएम किसानच्या लाभापासून राहावं लागेल वंचित; केवायसी कशी कराल?

३) पुणे जिल्ह्यात ८४ हजार शेतकऱ्यांची‘ई-केवायसी’प्रलंबित (KYC Update)

पुणे जिल्ह्यातील पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा चौदावा हप्ता लवकरच येणार आहे. त्यापूर्वी लाभार्थी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे गरजेचे आहे. पुणे जिल्ह्यातील तब्बल ८४ हजार ४२५ शेतकरी पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

जुन्नर, खेड, शिरूर, बारामती, दौंड या तालुक्यांत ई-केवायसीची प्रलंबित प्रकरणे मोठ्या संख्येने आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याच्या अनुषंगाने अनुषंगाने केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास योजनेच्या हप्त्याचा लाभ देण्याची कार्यवाही सुरू असून, त्यासाठी लाभार्थ्यांनी तत्काळ केवायसी प्रमाणीकरण करून घेणे गरजेचे आहे.

४) रत्नागिरी जिह्यात रोपवाटिका जगविण्यासाठी धडपड (Ratnagiri Rain News)

पाऊस लांबल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पेरणी खोळंबली आहे. भात रोपांसाठी केलेल्या धूळपेरण्यांना पाऊस न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे. अनेक ठिकाणी रोपे रुजून आली नाहीत. त्यामुळे पुन्हा पेरण्या करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे.

काही शेतकऱ्यांनी रोपवाटिका जगवण्यासाठी पंपाद्धारे पाणी देण्यास सुरुवात केली आहे. पाऊस कमी झाल्याचा परिणाम जिल्ह्यातील भातशेतीवर दिसू लागले आहेत. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर संगमेश्‍वर, राजापूर या दोन तालुक्यांत धूळपेरण्या केल्या जातात.

१ जूनपासून पूर्वमोसमी पाऊस पडल्यामुळे पेरण्या केलेल्या रोपांना आपसूकच पाणी मिळते. यंदा पूर्वमोसमी पाऊसच न झाल्यामुळे धूळपेरण्या केलेल्या शेतकऱ्यांची पंचाईत झाली.

Tomato Crop Damage
Tomato Damage : सदोष बियाण्यांमुळे टोमॅटोचे मोठे नुकसान

५) नगर जिल्ह्यात सदोष बियाण्यांमुळे टोमॅटोचे मोठे नुकसान (Tomato Damage)

टोमॅटो लागवडीनंतर साधारण ७५ दिवसांत पहिला तोडा तोडणीला येतो. यंदा मात्र वीस दिवस आधीच टोमॅटो तोडणीला आले. मात्र आलेली फळे खराब व बाधित असल्याने पीक हाती आले नाही आणि उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. सदोष बियाण्यांमुळे नुकसान झाल्याचा आरोप अकोले, संगमनेर तालक्यांतील शेतकऱ्यांनी केला आहे.

उत्पादन खर्चही निघाला नसल्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी केली आहे. त्यासाठी शेतकरी संघटनेचे नेते बैठका घेत आहेत. कृषी विभागाकडून मात्र दुर्लक्ष केले जात असल्याचे शेतकऱ्यांचे विभागाचे म्हणणे आहे. नगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, कोपरगाव व पारनेर तालुक्यांच्या काही भागांत उन्हाळी टोमॅटोचे पीक घेतले जाते.

शेजारच्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर, तसेच नाशिकमधील अनेक भागांत टोमॅटोचे उत्पादन घेतले जाते. साधारण मार्च-एप्रिलमध्ये टोमॅटो तोडणीला सुरुवात होते. मात्र दरवर्षीपेक्षा यंदा २० दिवस हंगाम आधीच सुरूच झाला. मात्र पहिल्याच तोडीला आलेली फळे खराब आली. टोमॅटोवर यंदाही व्हायरसचा प्रादुर्भाव दिसून आला.

शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल घ्यावी आणि मदत मिळावी यासाठी शेतकरी आणि शेतकरी नेते आक्रमक आहेत. केवळ सदोष बियाण्यांमुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाल्याचा आरोप करत शेतकरी नेते सुरेश नवले यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सोबत घेऊन कृषी विभागासोबत बैठका घेतल्या.

निळवंडे धरणाच्या पाणी चाचणीवेळी मुख्यमंत्र्यांसमोर आंदोलन करण्याचाही इशारा दिला होता. त्यानंतर दोन-तीन वेळा कृषी विभागासोबत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बैठकाही झाल्या, मात्र कृषी विभागाने सदोष बियाण्यांबाबत काहीही कारवाई केली नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com