Exportable Mango Production : निर्यातक्षम आंबा उत्पादनासाठी घ्यावयाची काळजी

Mango Production : या वर्षी भरपूर आणि उशिरापर्यंत झालेल्या पावसामुळे बहुतांश आंबा बागांमध्ये मोहर दहा - बारा दिवस उशिरा आला. सुरुवातीच्या काळात बऱ्यापैकी थंडी पडल्यामुळे त्याच प्रमाण भरपूर राहिले.
Mango Production
Mango ProductionAgrowon
Published on
Updated on

Mango Crop Management : या वर्षी भरपूर आणि उशिरापर्यंत झालेल्या पावसामुळे बहुतांश आंबा बागांमध्ये मोहर दहा - बारा दिवस उशिरा आला. सुरुवातीच्या काळात बऱ्यापैकी थंडी पडल्यामुळे त्याच प्रमाण भरपूर राहिले. मात्र मोहर उमलण्याच्या स्थितीत असताना सलग चार- पाच दिवस तापमान सात ते आठ अंश सेल्सिअसपर्यंत खाली राहिल्यामुळे उमललेल्या मोहराची सेटिंग झाली नाही.

हे वगळता अन्य काळातील मोहराची सेटिंग अतिशय चांगली झाली. त्यानंतर हिवाळा फारसा जाणवला नाही. खरेतर मोहर बाहेर पडेपर्यंतच थंडीची आवश्यकता असते. त्यानंतर थंडी न राहिल्यास फळाची वाढ चांगली होऊन प्रतही चांगली मिळण्यास मदत होते. या वर्षीही फळांची वाढ चांगली झाली. मात्र फळे लहान असतानाच फेब्रुवारीमध्येच तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यामुळे बऱ्याच प्रमाणात फळगळ झाली. या फळगळ बाबत आपण ‘ॲग्रोवन’मध्ये आधीच (२६ जानेवारी) इशारा देतानाच आवश्यक त्या उपाययोजनाही सुचवल्या होत्या. त्यावर अंमलबजावणी करणाऱ्या शेतकऱ्यांना फळगळीवर बऱ्यापैकी नियंत्रण ठेवता आले असेल.

Mango Production
Mango Orchard Management : आंबा मोहोरताना घ्यावयाची काळजी

गेल्या पंधरा दिवसांमध्ये विदर्भ, मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील (बारामती, सासवड, सातारा, कोल्हापूर, सोलापूर इ.) बागांना भेट देण्याचा योग आला. त्यात बहुतांश बागांमध्ये फळधारणा चांगली दिसते आहे. सेटिंगनंतर थंडी कमी राहिल्यामुळे फळांची वाढही छान (३० ग्रॅमपासून सव्वाशे ते दीडशे ग्रॅम वजनाची) झालेली आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांनी मोहर संरक्षणापासून ते बागेला मोकळे पाणी देणे, जीएचा वापर इ. बाबींवर काळजीपूर्वक लक्ष दिलेले दिसते. त्यामुळे आतापर्यंत हंगाम चांगला राहिला असून, निर्यातक्षम आंबा बागांमध्ये कोणती काळजी घेता येईल, या विषयी माहिती घेऊ.

बागेत आच्छादन करणे

बहुतेक शेतकऱ्यांनी आंबा बागेच्या जमिनीवर आच्छादन केले आहे. मात्र ज्यांनी अजूनही आच्छादन केलेले नाही, त्यांनी ते करून घ्यावे. शक्यतो उसाचे पाचट, सोयाबीनचे किंवा गव्हाचा भुस्सा या प्रकारच्या सेंद्रिय आच्छादनाला प्राधान्य द्यावे.

या सेंद्रिय अवशेषांचा किमान तीन ते चार इंचाचा थर द्यावा. त्यावर खोऱ्याने आजूबाजूच्या मातीचा हलका थर द्यावा. ठिबकच्या लॅटरल्स आच्छादनाखाली व मुख्य खोडापासून दूर मुळांच्या जारव्यामध्ये राहतील, याची काळजी घ्यावी.

सेंद्रिय आच्छादनामध्ये वाळवीचा प्रादुर्भाव होऊ शकतो, तो टाळण्यासाठी त्यावर शिफारशीत कीडनाशकाची एखादी फवारणी घ्यावी. (उदा. क्लोरपायरिफॉस तीन मिलि प्रति लिटर - वाळवी नियंत्रणासाठी शिफारस)

आच्छादनामुळे ओलावा दीर्घकाळ टिकून राहून पाणी कमी लागते. सोबतच मुळांच्या परिसरातील तापमान कमी राहिल्यामुळे पांढरी मुळे जिवंत आणि कार्यक्षम राहतात.

सेंद्रिय आच्छादन खालून व वरून मातीच्या संपर्कात राहते. ठिबकचा ओलावा व पुढे पावसाळ्यात मिळणारे चांगले एक दोन पाऊस यामुळे चांगल्या प्रकारे कुजते. पावसाळ्याआधी औताच्या साह्याने जमिनीत मिसळून दिल्यास कुजण्याच्या प्रक्रियेचा वेग वाढतो. त्याचे खत होऊन जमिनीचा पोत सुधारतो. विशेषतः हलक्या मुरमाड जमिनीचा पोत एकदम सुधारतो.

ज्यांच्याकडे सेंद्रिय आच्छादन उपलब्ध नाही आणि आर्थिकदृष्ट्या शक्य आहे असे शेतकरी बागेमध्ये प्लॅस्टिक आच्छादनही करू शकतात. मात्र प्लॅस्टिकचे पुनर्चक्रीकरण होत नाही. त्याच्या विल्हेवाटेअभावी आपली शेती आणि गावखेड्यातील पर्यावरणासाठी नवीनच

समस्या निर्माण होऊ शकते, हे लक्षात ठेवले पाहिजे.

विरळणी

काही बागांमध्ये मोठ्या फळांसोबतच नवीन मोहर आणि अतिलहान फळे थोड्याफार प्रमाणात दिसत आहेत. या वर्षी हे प्रमाण फारच कमी आहे. मात्र असा नवीन मोहर आणि ज्वारी, बाजरीच्या आकाराची फळे काढून घ्यावीत. ही फळे लिंबाच्या आकाराची होईपर्यंत एप्रिल उजाडलेला असेल व त्या काळातील सलग तापमान ४० अंशांपेक्षा जास्त राहिल्यास फळे गळून जाण्याची शक्यता असते. तोपर्यंत ही फळे वाढीसाठी मोठ्या फळांसोबत स्पर्धा करत राहून त्यांचाही आकार वाढण्यास अडथळा ठरू शकतात. त्यामुळे आताच हा मोहर व ज्वारी बाजरीच्या आकाराची ही फळे काढून घेण्यास प्राधान्य द्यावे.

निर्यात योग्य फलोत्पादनासाठी...

विरळणी :

बागेतील खराब, डाग पडलेली फळे, आकाराने लहान किंवा वेडीवाकडी फळे आताच काढून टाकावीत. गुच्छामध्ये चार - पाच फळे आलेली असल्यास त्यातील चांगली दोन किंवा फार तर तीनच फळे ठेवावीत.

फळाच्या बाजूला मोहराचा फळधारणा न झालेला दांडा कैचीने अलगद कापून टाकावा. पुढे तेच शेजारच्या फळांना घासून फळांवर डाग पडतात.

पीक संरक्षण :

कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रामध्ये असेच वातावरण राहिल्यास रोग व किडीचा प्रादुर्भाव फारसा जाणवणार नाही. मात्र या वर्षी पावसाळा भरपूर झाल्यामुळे काही प्रमाणात फळमाशीचा प्रादुर्भाव जाणवू शकतो. तो टाळण्यासाठी फळ काढणीच्या ४५ दिवस आधी पुढील उपाययोजनांवर भर द्यावा.

दर आठवड्याला गळून पडलेली प्रादुर्भावग्रस्त फळे गोळा करून नष्ट करावीत.

मिथाईल युजेनॉलचे सहा संरक्षक सापळे प्रति एकरी लावावेत.

फळकाढणीच्या तीन आठवडे आधी डेल्टामेथ्रीन अर्धा मिलि अधिक ॲझाडिरेक्टीन (१० हजार पीपीएम) दोन मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

प्रति रक्षक सापळा पाचपेक्षा अधिक फळमाश्या आढळल्यास डेल्टामेथ्रीन दोन मिलि अधिक गूळ ३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात चांगल्या प्रकारे मिसळून विषारी आमिष म्हणून बागेमध्ये फवारणी करावी. (ॲग्रेस्को शिफारस).

अतिघन लागवडीच्या बागेत फळांना हाताने बॅगिंग करणे शक्य होते. बॅगिंग करताना तारखेच्या खुणा करून ठेवल्यास काढणीच्या वेळी एकाच पक्वतेची फळे समजून येतात. एकाच पक्वतेच्या फळांची काढणी सोपी होते.

सध्याच्या परिस्थितीत फळांवर ०-०-५० (पोटॅशिअम सल्फेट) दहा ग्रॅम प्रतिलिटर अधिक जीए वीस पीपीएम यांची फवारणी घ्यावी. (ॲग्रेस्को शिफारस). त्याचबरोबर जमिनीतून ०-०-५० (पोटॅशिअम सल्फेट) एकरी दीड किलो या प्रमाणात आठ दहा दिवसांच्या फरकाने ठिबकमधून द्यावे.

फळांच्या उत्तम पोषणासाठी ठिबकद्वारे द्यावयाच्या खताचे वेळापत्रक तंतोतंत पाळावे.

बागेभोवती वारा प्रतिबंधक म्हणून सदाहरित उंच वाढणारी झाडांची लागवड केलेली असल्यास बागेमध्ये गारवा टिकून राहतो. त्याचा फळांचा उष्णतेच्या झळांपासून बचावासाठी आणि आकार वाढीसाठी फायदा होतो. अशी वारा प्रतिबंधक झाडांची लागवड केलेली नसल्यास शेडनेट लावू शकता. मात्र येत्या पावसाळ्यात अशा झाडांची नक्की लागवड करून घ्यावी.

- डॉ. भगवानराव कापसे, ९४२२२९३४१९

(लेखक निवृत्त फळबाग शास्त्रज्ञ आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com