Paddy Cultivation : देशी भात वाणांच्या लागवडीवर भर

Paddy Farming : रत्नागिरी जिल्ह्यातील खरवते (ता. राजापूर) येथे दयानंद चौगुले यांची वडिलोपार्जित शेती आहे. चौगुले कुटुंब पारंपरिक पद्धतीने भाताच्या देशी वाणांचे जतन करत आले आहेत.
Paddy Farming
Paddy FarmingAgrowon
Published on
Updated on

Paddy Farming Farmer Management :

शेतकरी नियोजन

पीक : भात

शेतकरी : दयानंद बाबाजी चौगुले

गाव : खरवते गावठाण वाडी, ता. राजापूर, जि. रत्नागिरी

एकूण शेती : १४ एकर

भात लागवड : अडीच एकर

रत्नागिरी जिल्ह्यातील खरवते (ता. राजापूर) येथे दयानंद चौगुले यांची वडिलोपार्जित शेती आहे. चौगुले कुटुंब पारंपरिक पद्धतीने भाताच्या देशी वाणांचे जतन करत आले आहेत. दरवर्षी अधिकाधिक क्षेत्रावर भाताच्या विविध देशी वाणांची लागवड करण्यावर त्यांचा भर असतो. त्यानुसार थोड्या थोड्या क्षेत्रात लागवडीचे नियोजन असते. भाताचे देशी वाण आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असल्याने त्यांचे संवर्धन, प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न दयानंद चौगुले करत आहेत.

देशी भात वाणांच्या लागवडीमध्ये उत्पादन वाढीसाठी सेंद्रिय घटकांच्या वापरावर अधिक भर दिला जातो. गतवर्षी पावणेचार एकर क्षेत्रातून साडेसात टन भात उत्पादन मिळाले होते. यावर्षी अडीच एकर क्षेत्रात भात लागवड केली आहे.

दरवर्षी उत्पादित भात बियाणांची विक्री केली जाते. तर काही भात घरी खाण्यासाठी राखून ठेवला जातो. सेंद्रिय पद्धतीने भात उत्पादन कसे घेता येईल यासाठी आमचा प्रयत्न असतो. त्यातूनही चांगले आर्थिक उत्पन्न मिळते. आगामी काळात भाताच्या देशी वाणांची ‘सीड बँक’ विकसित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. असे दयानंद चौगुले म्हणाले. या व्यतिरिक्त दरवर्षी हापूस आंब्याच्या ८०० पेट्या, काजू बागेतून काजू बी चे सुमारे ७ टन उत्पादन त्यांना मिळते. याशिवाय सागाच्या ८०० झाडांची लागवड आहे.

Paddy Farming
Organic Paddy Farming : सेंद्रिय भातशेतीसह देशी गोपालन, कुक्कुटपालन

रोपवाटिका नियोजन

साधारण अडीच एकरांत भाताच्या सुमारे २५ देशी वाणांच्या लागवडीचे नियोजन या वर्षी केले आहे. त्यानुसार रोपवाटिका तयार करण्याच्या कामांना सुरुवात केली.

एका वाणाची साधारण ३ ते ४ गुंठे क्षेत्रावर लागवडीचे नियोजन होते. त्यासाठी ४० गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका तयार करण्यासाठी पूर्वतयारी केली.

पहिला पाऊस झाल्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात घनजीवामृत (त्यात पालापाचोळा, शेण, गांडूळखत) चा वापर रोपवाटिकेसाठी निवडलेल्या जमिनीत केला. घनजीवामृतामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस चालना मिळते.

पेरणीपूर्वी बियाणास मिठाच्या पाण्याची प्रक्रिया केली. त्यानंतर जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया केली.

त्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात भात बियाणांची पेरणी केली. प्रत्येक वाणाची स्वतंत्र रोपवाटिका तयार करण्यात आली. प्रत्येकी २ ते ५ किलो या प्रमाणे बियाणे पेरणीसाठी लागले.

लागवडीनंतर साधारण २१ दिवसांनी रोपे पुनर्लागवडीसाठी तयार झाली.

Paddy Farming
Paddy Variety : कर्जतच्या प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रातर्फे भाताचे तीन वाण विकसित

पुनर्लागवड नियोजन

अडीच एकरांत थोड्या थोड्या क्षेत्रात म्हणजेच ३ ते ४ गुंठे क्षेत्रात विविध भात वाणांची लागवड करण्याचे नियोजित होते. त्यानुसार पूर्वनियोजन करण्यात आले.

रोपांची पुनर्लागवड करण्यापूर्वी जमिनीची उभी आडवी नांगरणी करत चिखलणी केली. जीवामृताचा वाप केला.

पुन्हा पॉवर टिलरच्या मदतीने योग्यरीत्या चिखलणी करून घेतली.

पुनर्लागवडीसाठी साधारण एकवीस दिवसांची तयार रोपे निवडण्यात आली.

साधारण २८ जूनच्या दरम्यान मजुरांच्या मदतीने पुनर्लागवडीच्या कामांस सुरुवात केली. सर्व क्षेत्रातील लागवड पूर्ण होण्यास वीस दिवसांचा कालावधी लागला.

यंदा पाऊस समाधानकारक झाला आहे. मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने थोडा विलंब केला. तत्पूर्वी तणनियंत्रण करण्यात आले.

प्रायोगिक तत्त्वावर साधारण ३ गुंठे क्षेत्रावर पुनर्लावणीच्या १५ दिवसांनंतर रासायनिक खते आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या मात्रा दिल्या. मात्र सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन केलेल्या भात लागवडीच्या तुलनेत रासायनिक खते वापरलेल्या क्षेत्रात अपेक्षित बदल दिसून आले नाहीत. याउलट सेंद्रिय पद्धतीने लागवड केलेल्या क्षेत्रातील भात पीक चांगले बहरले आहे. त्यामुळे सेंद्रिय घटकांचा वापर अधिक करत आहे.

आगामी नियोजन

सध्या पीक सध्या फुलोरा अवस्थेत आहे. पाऊस चांगला झाला असून भात खाचरात पुरेसे पाणी उपलब्ध आहे.

परागीकीकरण चांगले होण्यासाठी जैविक घटकांची फवारणी घेणार आहे.

साधारणपणे दिवाळीच्या दरम्यान पीक कापणीस येईल.

बांधाच्या स्वच्छतेवर भर दिला जाईल. जेणेकरून किडींचा प्रादुर्भाव होणार नाही.

पिकावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास जैविक पद्धतीने नियंत्रण करण्याचा प्रयत्न असतो. मात्र त्यातून नियंत्रण न मिळाल्यास रासायनिक घटकांचा वापर केला जाईल.

विविध देशी वाणांची लागवड

फुले राधा, जस्मिन, काळा नमक, वारंगळ, आजरा घनसाळ, मधुराज, टायचण (कोकण), रक्तशाळी, बेला, वालय, सरवट, मुंडगा, बकासुळ, काळे भात, काळा जिरगा, इंद्रायणी, दिल्ली भात, सोरटी, कुडा, गोविंद भोग, गोरखपूर एसबीके, पटणी, आसाम बासमती, वाडा कोलम, चंपाकळी, भोगावती, बासमती, काळी गजरी, फुले समृद्धी अशा सुमारे २५ हून अधिक देशी वाणांची दरवर्षी लागवड केली जाते. या पैकी बहुतांश वाण हे मध्यम पावसात येणारे वाण आहेत. लागवड केलेल्या प्रत्येक क्षेत्राच्या बांधावर त्या वाणाविषयी माहिती देणारे फलक लावले जातात. त्या माध्यमातून शेतकऱ्यांना वाणांची माहिती होते.

दयानंद चौगुले ८३६ ९७१ २५३७

(शब्दांकन : राजेश कळंबटे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com