Farmer Feelings : उद्योजकतेला जोड उन्नत भावनांची

Types of Emotion : शेतकऱ्याला उद्योजकता वाढवायची असेल तर तीनही प्रकारच्या भावना ओळखणे आणि त्यांचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे.
Agriculture
AgricultureAgrowon

डॉ. आनंद नाडकर्णी

Identify and Validate the Three Types of Emotions : मागील लेखात आपण आदिम, प्रगत आणि उन्नत भावनांबद्दल बोललो. आपल्या शेतकऱ्याला उद्योजकता वाढवायची असेल तर तीनही प्रकारच्या भावना ओळखणे आणि त्यांचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे.

आदिम भावना : जीवशास्त्रीय संकटात जाणवणाऱ्या, ‘मी’ केंद्रित, स्वत:पुरत्या विचारातून येणाऱ्या.

प्रगत भावना : संघ-समूहाचा विचार करणाऱ्या, ‘मी’कडून ‘आम्ही’कडे जाणाऱ्या, स्वहित आणि परहित जोडून घेणाऱ्या.

उन्नत भावना : प्रगत भावनांना परिपक्व, सुस्थिर करतात, आदिम भावनाना शांत करतात.

आपल्याला तिन्ही प्रकारांतील भावना जाणवतील; पण सगळ्यात फायद्याच्या भावना म्हणजे उन्नत भावना आणि काही प्रमाणात प्रगत भावना. आदिम भावना १००-१५० हजार वर्षे जुन्या आहेत, तर प्रगत भावना ५०-६० हजार वर्षे आणि उन्नत भावना ७-८ हजार वर्षे जुन्या आहेत. आपल्याला उन्नत भावनांचा जास्त सराव करणे गरजेचे आहे. त्यासाठीच्या सूत्राच्या पायऱ्या पुढीलप्रमाणे आहेत

स्वतःच्या भावानांवर सतत लक्ष ठेवणे, त्या ओळखायला शिकणे.

आदिम भावनांचे नियमन करणे – म्हणजेच या भावनांची तीव्रता, कालावधी आणि वारंवारिता कमी ठेवणे.

अतिसह्य भावनांवरून सह्य भावनांकडे येणे, असह्य भावनांवरून सुसह्य भावनांकडे येणे.

उन्नत भावनांचा सराव करणे.

थोडक्यात, आदिम भावना आणि प्रगत भावनांची सांगड घालून त्यांना उन्नत भावनांची फोडणी द्यायची. उन्नत भावनांची फोडणी प्रगत भावनांना मिळाली तर आदिम भावना आहेत तिथेच विसावतात. उन्नत भावना ‘आम्ही''च्या पुढे जाऊन ‘आपण’ असे सर्वांकडे बघायला शिकवतात. ‘आम्ही –तुम्ही’ यात थोडं द्वंद्व आहे, द्वैत आहे. उन्नत भावनांमधला ‘आपण'' म्हणजे त्यात सगळेच आले.

शेतकरी धान्य पिकवतो, पॅक करतो, बाजारपेठेत विकतो. पण हे करायला त्याला इतर अनेकांची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत लागते. आपण अन्न पिकवणारे असलो तरी या सर्व प्रक्रियेत परस्परावलंबित्व आहे, याची जाणीव महत्वाची. जोवर हा ‘आम्ही’ भाव आहे तोवर साखळी छान व्यवस्थित चालेल. आता या ‘आम्ही’च्या पुढे जाऊन ‘आपण’ हा विचार आला तर? पिकवतो तो मी, मला मदत करतात ते सगळे आणि ज्याच्यापर्यंत हे पोहोचते तो ग्राहक - सगळेच आपले आहेत. या वाटण्यात ‘आम्ही’मधून येणारी कार्यक्षमता तर आहेच, त्याबरोबरीने ‘आपण’ यातून आलेला जिव्हाळादेखील आहे.

Agriculture
Human Psychology : भावनाओंको समझो

कुठलीही रचना उत्तम प्रकारे बनायला, चालायला कार्यक्षमता (efficiency) लागते. कार्यक्षमता असली की ती रचना दर्जेदार होईल. रचना नीट कार्यक्षम असेल पण जिव्हाळा नसेल तर? किंवा खूप जिव्हाळा आहे, पण कार्यक्षमता नसेल तर? या दोन्ही रचना उपयोगाच्या नाहीत. कार्यक्षमता आणि जिव्हाळा दोन्ही एकत्र येतील तेव्हा त्या रचनेचा ‘वारसा’ तयार होतो.

केवळ धनाची अपेक्षा करतो तो व्यापारी. पण उद्योजक हा संपत्तीचे निर्माण करतो. संपत्तीसोबत ज्ञान निर्मिती, अनुभव निर्मिती, कौशल्य निर्मिती, माणसांचा विकास, रचना निर्मिती या सर्व गोष्टी उद्योजक करतो. उद्योजक बनणे म्हणजे एका व्यक्तीवर अवलंबून नसणारा साचा निर्माण करणे. उद्योजक बनणे म्हणजे ‘स्व’च्या स्वामित्वाचा भाग नष्ट होणे आणि वारसा निर्माण होणे.

धन आणि नंतर संपत्ती निर्माण झाली की समाजाचे उत्तरदायित्व म्हणून उद्योजकाने काम करावे. उदाहरणार्थ, समाजाच्या गरजेप्रमाणे शाळा, हॉस्पिटल काढणे, नवे उद्योजक घडवणे. हे तो स्वत:च्या नावासाठी करत नाही, तर चांगल्या कार्यातून त्याचा वारसा निर्माण करतो. हीच ती आपण बघितलेली उन्नत भावनांची फोडणी. वारसा म्हणजे निर्माण केलेली रचना, पद्धत, ज्ञान आणि माणसं. व्यक्तीने एकदा हा वारसा निर्माण केला की ती व्यक्ती हयात नसताना, तिच्या पश्‍चातही हा वारसा व्यक्त होत राहतो. हे खऱ्या उद्योजकाचे लक्षण आहे.

उन्नत भावना कुठल्या आहेत?

आस्था (Empathy)ः स्वत:ला समोरच्याच्या भावनेत ठेवणे.

आस्था असते तेव्हा आपले विचार सुरू असतात, पण त्यात त्या व्यक्तीला काय अपेक्षित आहे हे समजून घेतलेले असते आणि हवे असेल ते न सांगता किंवा मागता देणे हा प्रयत्न असतो. आस्थेतून माणसं जोडली जातात. परस्पर अनुबंध वाढतात.

करुणा (Compassion)ः समोरच्या व्यक्तीची वेदना, दु:ख समजून घेणे. दुसऱ्याची वेदना समजून घेऊन ती कमी करण्याचा सतत प्रयत्न करायला उद्युक्त करणारी भावना म्हणजे करुणा. दुसऱ्याची वेदना / त्रास कमी करण्याच्या प्रयत्नात एक उच्च किंवा दाता आणि दुसरा घेणारा, याचक किंवा कनिष्ठ दर्जाचा असा भाव असेल तर ती झाली दया. करुणा म्हणजे आपण दोघेही सम पातळीवर आहोत हा भाव. गौतम बुद्ध, भगवान महावीर, बाबा आमटे अशा अनेक सत्पुरुषांमध्ये ही भावना आपल्याला दिसून येते.

तन्मयता ः मी जी कृती करतो आहे त्यामध्ये एकरूप होणे. कामात तन्मयता असली की कृतीचा दर्जा वाढतो.

Agriculture
Agriculture GST : जाच ‘जीएसटी’चा!

कृतज्ञता (Gratitude) ‘मी आज जिथे आहे त्यामागे अनेक जण आहेत. त्यांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागाने / सहकार्याने मी इथवर पोहोचू शकलो, काही साध्य करू शकतो. त्या सर्वांवर माझे अवलंबित्व आहे’ हा विचार व्यक्तीला नम्र बनवतो. अहंकार येऊ देत नाही. यातून येणारी उन्नत भावना म्हणजे नम्रता. मी शेतीविषयक अभ्यास, ज्ञानार्जन आणि प्रयोग करत असेन तर मी इथवर येण्यामागे किती जणांचे योगदान आहे! अगदी जॉर्ज कार्व्हर, जगदीशचंद्र बोस, डॉ. खानखोजे, इतर देशातले कृषितज्ज्ञ, तंत्रज्ञ, माझे वडीलधारे, आजूबाजूचे शेतकरी अशा अनेकांकडून मला अनुभवाचा ठेवा मिळतो. नम्रता ही भावना परस्परावलंबित्व आणि परस्पर अनुबंध यांना जोपासणारी आहे.

क्षमा : कोणतेही किल्मिष मनात न बाळगता चूक दुरुस्त करणे. उन्नत भावनेत ‘आपण’ हा विचार असताना, मी आणि दुसरा जर एकच आहोत, तर मी चूक केली की त्याने चूक केली यापेक्षा ‘चूक झाली’ असे म्हणणे जास्त हिताचे. निव्वळ सॉरी म्हणणे एकवेळ सोपे आहे, पण किल्मिष न ठेवता क्षमा करायला शिकण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात.

निग्रह : मला आदिम भावनांकडे नेण्यासाठी उत्तेजित करत असताना मी ठामपणे प्रगत भावनांवर उभे राहणे. इतरांच्या कृतीमुळे मी आदिम भावनांकडे ढकलला जाईन. राग यावा अशी स्थिती निर्माण होईल. पण समोरच्याला असेल किंवा नसेल, मला ध्येय काय आहे याची स्पष्टता आहे. म्हणून मी आदिम भावनांकडे जाणार नाही. त्याला निदान प्रगत भावनेकडे आणायचा प्रयत्न करेन.

सहिष्णुता : माणसांचे विचार वेगवेगळे असू शकतात. ते सर्वच विचार एकमेकांना पटतील असं नाही. पटणाऱ्या विचारांच्या आधारावर समान ध्येयाकडे जाता येईल, न पटणाऱ्या भागापुरते मतैक्य निर्माण करता येईल. तरीही जे मतभेद राहतील त्यांचा स्वीकार करून पुढे जाता येईल.

मग या उन्नत भावना पेरायच्या आणि जोपासायच्या कशा?

या नव्या भावनांचा सराव करताना, आपल्याला त्या भावना सहजवृत्ती बनवणे कदाचित जमणार नाही. पण अधूनमधून शक्य तिथे क्षमा, आस्था, करुणा या भावना पेरता येतील. ते झाले तर सहकाराच्या प्रगत भावनेला उजाळा मिळेल आणि आदिम भावना शांत होतील.

शेतकऱ्यांबाबत बोलायचं तर रोज मातीत राबणारे हात, झाड, माती, पाणी, सूर्य यांचं नातं हे परस्परावलंबित्व आणि परस्पर अनुबंध यांचंच आहे. शेतकरी या सगळ्यांशी अगदी जन्मापासून जोडला आहे. शेतकऱ्याचे सामर्थ्य आहे उन्नत भावनांची पेरणी करणे, सहकार वाढवणे, कर्ता उद्योजक बनणे. येऊ घातलेल्या ‘२०२४’ या नव्या वर्षात उन्नत भावनांचा अधिक सराव करण्याचा संकल्प आपण करूया.

- डॉ. आनंद नाडकर्णी , संशोधन आणि शब्दांकन : डॉ. सुवर्णा बोबडे व शिल्पा जोशी

kartashetkari@gmail.com

आजच्या लेखाशी संबंधित भाग बघण्यासाठी लिंक –

https://www.youtube.com/watch?v=OYRdmKfPeWU&list=PLc6RbyUBWjXzt5A-SRFZTwKWk0s1e4ZdA&index=42

कर्ता शेतकरी मालिकेचे सर्व भाग बघण्यासाठी यू-ट्यूबवर सह्याद्री फार्म्स किंवा आवाहन आय.पी.एच. या चॅनेलना सबस्क्राइब करा आणि “कर्ता शेतकरी” ही प्लेलिस्ट बघा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com