Solapur News : मंगळवेढा तालुक्यातील कायम दुष्काळी २४ गावांनी पाटकळ येथे बैठक घेऊन इशारा दिल्यानंतर सरकारने याची दखल न घेतल्याने येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यासह महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यावर अन्याय करत असल्याने लवकरच आमच्या भागातील २४ गावाचे शिष्टमंडळ कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याला भेटून या २४ गावांना कर्नाटकमध्ये सामावून घेण्याची मागणी करणार असल्याचा निर्णय निंबोणी येथील बैठकीत एकमताने करण्यात आला.
मंगळवेढातील दुष्काळी २४ गाव पाणी संघर्ष समितीचे निमंत्रक कृषिभूषण अंकुश पडवळे यांनी वरील दोन्ही ठराव मांडून २००९ ला लोकसभा निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार व त्यातून मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा मार्गी लागलेला विषय पंधरा वर्षे सगळ्या पक्षांची सरकारे येऊनी ही आमची योजना मार्गी लागली नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्रोश आहे.
मंगळवेढा तालुक्यात भीषण टंचाई असतानाही दुष्काळात मंगळवेढा तालुका बसला नसल्यामुळे सरकारने लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेची कॅबिनेट पुढे मंजुरी व निधीची तरतूद नाही केली तर येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच आचारसंहिता जाहीर होईल त्याच दिवशी २४ गावे जोडून घ्यावी यासाठी लवकरच २४ गावाचे शिष्ट मंडळ कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याच्या भेटीचे नियोजन करण्याचा ठरावही एकमताने करण्यात आला.
या बैठकीस मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले भुयार मठाचे मठाधिपती ह. भ. प. तुकाराम बाबा महाराज यांनी जत मधील ६५ गावांचे आंदोलन यशस्वी करून त्या गावांना मोठ्या प्रमाणावर मिळवून देण्यासाठी यशस्वी प्रयत्न केला, असल्याचे सांगितले. २४ गावांतील ग्रामस्थांनीही आपापसातील मतभेद विसरून व राजकारण विरहित ही चळवळ पुढे घेऊन जाऊ जावे.
यासाठी लागेल ती मदत मी करणार, असल्याचेही तुकाराम महाराजांनी सांगितले. बैठकीत बोलताना भाळवणीचे माजी उपसरपंच पांडुरंग चौगुले यांनी २००९ मध्ये टाकलेला बहिष्कार आंदोलनामुळे वीस गावची मंगळवेढा उपसा सिंचन योजना तयार झाली. दुष्काळी २४ गावांना दोन टीएमसी पाणी उपलब्ध झाली. आणि योजना अंतिम टप्प्यात आली, हे सर्व केवळ विविध आंदोलने व बहिष्कारामुळे झाले.
प्रास्ताविक करताना निंबोणीचे यावेळी लेंडवे चिंचाळ्याचे सरपंच गुंडा लेंडवे, रड्ड्याचे ॲड रवी कोळेकर, खुपसंगीचे माजी सरपंच शहाजहान पटेल, खडकीचे नानासाहेब कटारे, खवेचे संग्राम दुधाळ यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
या वेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रा. येताळा भगत, सजग नागरिक संघाचे अध्यक्ष संजय कट्टे, खडकीचे सरपंच संजय राजपूत, उपसरपंच अशोक जाधव हाजापुरचे माधवानंद आकळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, जित्तीचे माजी सरपंच शिवाजी सावंत, विष्णू मासाळ, चंद्रकांत गरंडे, येड्रावचे दौलत माने, रमेश पाटील, खुपसंगीचे ग्रापंचायत सदस्य रामचंद्र तांबे, भाळवणी माजी सरपंच ज्ञानेश्वर भंडगे, अशोक माने, महेश पाटील, सलीम शेख, चंद्रकांत ढगे, तुळशीदास मुठेकर, हिरालाल शेख, येसप्पा ढगे, नामदेव म्हारनूर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निंबोणीचे ग्रा. प. सदस्य विनायक माळी यांनी केले तर आभार ॲड. दत्तात्रय खडतरे यांनी मांनले.
शेतकऱ्यांनी जगायचे कसे : घोगरे
सरपंच बिरुदेव घोगरे म्हणाले, की मंगळवेढ्याच्या दुष्काळी २४ गावांत पाण्याची भीषण टंचाई आहे. येथील शेतकऱ्यांनी जगायचे कसे असा सवाल केला. दुष्काळाची येथे भीषण परिस्थिती असतानाही मंगळवेढा तालुका दुष्काळ यादीत बसला नाही, त्यामुळे शेतकरी संतप्त झाल्याचेही सांगितले. तर पाणी संघर्ष समितीचे ॲड. भारत पवार यांनी आंदोलनाशिवाय २४ गावांना न्याय मिळणार नसून राजकारणी विरहित ही चळवळ पुढे घेऊन जावा नक्की योजना मार्गी लागेल, असे सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.