Kolhapur News : मजुरांची अनुपलब्धता, कृषी निविष्ठांच्या वाढत्या किमती व घटणारे उत्पादन यांचा विचार करता येणाऱ्या काळामध्ये आधुनिक शेती अवजारांचा व यंत्रांचा वापर पीकलागवड खर्चात बचत आणि अधिक उत्पादन वाढीसाठी गरजेचा आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले.
राजर्षि छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयात आयोजित कृषी यांत्रिकीकरण दिवस व आधुनिक कृषी यंत्रे व अवजारे प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार आबिटकर बोलत होते. भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्ली यांच्या अखिल भारतीय समन्वित कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प, राजर्षि छत्रपती शाहू महाराज कृषी महविद्यालय, कोल्हापूर, कृषी विभाग आणि कृषी अवजारे उत्पादक संघटना (महाराष्ट्र) यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील म्हणाले, की कोल्हापुरात कृषी यंत्रे अवजारे परीक्षण केंद्र उभे राहिले तर नक्कीच कृषी क्षेत्राबरोबरच इथल्या औद्योगिक विकासाला चालना मिळेल. विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार यांनी गटशेती आणि शेतकरी गटांच्या माध्यमातून शेतीसाठी लागणाऱ्या मोठ्या संयंत्रांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभाग प्रयत्न करत असल्याचे सांगितले.
डॉ. सचिन नलावडे, डॉ. धर्मेंद्रकुमार फाळके, डॉ. तुळशीदास बास्टेवाड, तमिळनाडू राज्याच्या कृषी अभियांत्रिकी विभागाचे मुख्य अभियंता डॉ. आर. मुरुगेसन यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. कृषी विस्ताराच्या आणि पीक उत्पादनात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शेतकऱ्यांचा व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. महाविद्यालयामार्फत प्रकाशित मृदगंध या मासिकाचे आणि कृषी अवजारांची देखभाल या घडीपत्रिकेचे प्रकाशन या वेळी करण्यात आले.
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे सदस्य दत्तात्रय उगले, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, ‘रामेती’चे प्राचार्य उमेश पाटील, कार्यक्रमाचे आयोजक व महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे, अखिल भारतीय समन्वित महाराष्ट्र कृषी अवजारे उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भरत पाटील,
संघटनेचे सचिव संजय जाधव, विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. शैलेंद्र कांबळे, पशुविज्ञान व दुग्धशास्त्र विभागप्रमुख डॉ. शिवाजीराव पाचपुते, उद्यानविद्या विभागप्रमुख डॉ. संग्राम धुमाळ, विस्तारशिक्षण विभागप्रमुख डॉ. भारत कोलगणे, कृषी अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. मोहन जाधव, कृषी विद्या विभागप्रमुख डॉ. रेणुका शिंदे, वनस्पती रोगशास्त्र विभाग प्रमुख सुनीता वाघमारे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. मनीषा मोटे यांनी केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.