Farmers Producers Company: ‘ग्रीनअप’मुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाला चालना

नगर जिल्ह्यातील ब्राह्मणी (ता. राहुरी) येथील ग्रीनअप शेतकरी उत्पादक कंपनीने सभासदांसह शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी निविष्ठा पुरवठा, अवजारे बॅंक, बाजारापेक्षा अधिक दर देत जागेवरच धान्यांची खरेदी असे उपक्रम राबवले आहे.
Farmers Producers Company
Farmers Producers CompanyAgrowon
Published on
Updated on

Nagar Story : राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी परिसरात धरणांमुळे पाण्याची बऱ्यापैकी उपलब्धता आहे. प्रामुख्याने उसासह अन्य नगदी पिके घेतली जातात. सप्टेंबर २०२० मध्ये येथील एकशे दहा शेतकरी एकत्र आले.

त्यांनी ग्रीनअप शेतकरी उत्पादक कंपनीची (Greenup Farmers Producers Company) स्थापना करताना प्रत्येकी शंभर रुपये आणि १० संचालकांनी प्रत्येकी १० हजार इतकी रक्कम भांडवल म्हणून गोळा केली. दोन लाखांचे प्राथमिक भांडवल उभे झाले.

संचालक मंडळामध्ये सचिन वसंतराव ठुबे यांच्यासह अनिलराव रखमाजी हापसे, सविता गोविंद हापसे, अर्जुन मच्छिंद्र ठुबे, किरण चांगदेव कदम, वैशाली दिगंबर शिंदे या संचालकांनी सभासदांच्या सोयाबीन, मका, कांदा, कापूस, गहू अशा शेतीमालाला अधिक दर मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.

त्यातून पहिल्या वर्षी दीड कोटीची रुपयांची उलाढाल झाली. ही प्रगती दिसताच अन्य शेतकरीही सहभागी होत गेले.

Farmers Producers Company
Farmer Loan Waive : दीड हजार शेतकरी ३१ मार्चपर्यंत कर्जमुक्त होणार

आज कंपनीची सभासद संख्या २२०० झाली असून, तीन वर्षांतील एकूण उलाढाल २३ कोटी झाली. या वर्षीची उलाढाल सोळा कोटीवर पोचली आहे. सुरुवातीला भाड्याच्या जागेमध्ये सुरू केलेल्या खरेदी केंद्राचा लाभ परिसरातील तीन हजार शेतकऱ्यांनी घेतला आहे.

कंपनीचे सभासदही राहुरी, श्रीरामपूर, नेवासा, नगर, पाथर्डी या पाच तालुक्यांतील ४१ गावात विखुरलेले आहेत.

आर्थिक स्तर उंचावत गेला

कंपनीने प्रथम उपलब्ध अल्प भांडवलावर सोयाबीन, कापूस आणि मका इ. ची खरेदी सुरू केली. त्यातून पहिल्याच २०२०-२१ मधील सहाच महिन्यांत ७८ लाख रुपयांची उलाढाल झाली. मात्र त्यात फारसा नफा राहिला नाही. अविश्‍वासामुळे काही शेतकरी सभासद दूरही झाले.

दुसऱ्या वर्षी (२०२१-२२) ४ कोटी ७९ लाख रुपयांची उलाढाल झाली. त्यात सभासदांचे सुमारे १० हजार क्विंटल धान्य खरेदी केले. सभासदांना बाजारभावापेक्षा २०० रुपये प्रति क्विंटल अधिक मिळाले. तरिही या व्यवसायातून कंपनीला १२ लाखांचा नफा राहिला.

२२ ते २३ मध्ये आतापर्यंत जवळपास ३२ हजार क्विंटल धान्य खरेदी केली असून, सोळा कोटींपर्यंत उलाढाल झाली. यंदा कंपनीला ४० लाखांपेक्षा अधिक नफा होण्याचा अंदाज आहे.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कंपनीची स्वतःची सुमारे साडेतीन कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता उभी राहिली आहे. सव्वा एकर जागेत कंपनीने प्रशस्त व कार्पोरेट कार्यालय उभे आहे.

कृषी विभागाच्या योजनांमधून प्रोसेसिंग युनिट, ३०० मेट्रिक टनाचे अंतर्गत साठवणूक गृह उभारले आहे. अधिक शेतीमाल साठवणीसाठी ६०० मे. टनाचे गोदाम उभारणीचे काम सुरू आहे. संचालकांनी स्वतःच्या भांडवलातून १००० मेट्रिक टन क्षमतेचे विपणन गृहही उभारले आहे.

ब्राह्मणीसह श्रीरामपूर येथेही कंपनीचे विभागीय कार्यालय सुरू केले आहे.

पहिल्या तीन वर्षी मिळालेल्या नफ्याचा वापर पुढील व्यवसाय वृद्धीसाठी करण्याबाबत संचालक मंडळाने ठराव केला आहे. त्यामुळे कंपनीकडे आतापर्यंत ३० लाख रुपयांचे भागभांडवल तयार झाले आहे.

ग्रीनअप कंपनीने शेतकरी ते कार्पोरेट कंपनी यातील अंतर कमी करणारे विपणन मॉडेल उभे केले आहे. राज्यभरातून दोन हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी ते समजून घेण्यासाठी भेटी दिल्‍या आहेत.

Farmers Producers Company
Abdul Sattar : कृषिमंत्री सत्तारांचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान; शेतकरी आत्महत्येवर असंवेदनशील वक्तव्य

कंपनीला वसंतराव नाईक जिल्हास्तरीय पुरस्कार, आदर्श कंपनी व्यवस्थापन पुरस्कार, छत्रपती कृषी पुरस्कार, कलारत्न प्रतिष्ठानचा कृषी रत्न पुरस्कार मिळाले आहेत.

व्यवसाय व उद्योगासाठी आवश्यक तिथे कृषी विभाग, आत्मा विभागातील अधिकारी, महात्मा फुले कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, महिला व आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, महाराष्ट्र राज्य पणन महामंडळ, महाॲग्री एफपीसी फेडरेशन, सह्याद्री फार्मर प्रोड्यूसर कंपनी, आयटीसी, नागपूर डिव्हिजन, समुन्नती फायनान्शिअल समूह, किसानधन ॲग्री समूह, नवी दिल्ली यांची मदत घेतली जाते.

शेतकऱ्यांना असा झाला फायदा ः

-थेट बांधावरून शेतीमालाची खरेदी केली जात असल्याने शेतकऱ्यांच्या वाहतूक, हमाली व अन्य खर्चामध्ये बचत होते. त्याच वेळी बाजारभावापेक्षा किमान शंभर रुपये प्रति क्विंटल अधिक दर यामुळे शेतकऱ्यांच्या माल विक्रीसाठी हंगामामध्ये दोन दोन कि.मी. पर्यंतच्या रांगा लागतात.

- सभासदांमध्ये विविध पिके घेणारे, सेंद्रिय शेती करणारे, प्रयोग व उपक्रमशील शेतकऱ्यांसोबतच दुग्धउत्पादक, शेळीपालक, पोल्ट्री उत्पादक आणि शेतमजूर अशा सभासदांचीही संख्या मोठी आहे.

या प्रत्येक घटकाला कंपनीपासून आर्थिक लाभ मिळेल, यासाठी प्रयत्न केले जातात. कृषी विभाग व अन्य शासकीय संस्थांच्या मदतीने निविष्ठा खते, बियाणे मोफत किंवा कमी दरामध्ये पुरवण्यात आले. त्यामुळे गहू, सोयाबीन, हरभरा, मका इ. पिकांचे बियाणे व अन्य निविष्ठांचा सुमारे ९०० शेतकऱ्यांनी लाभ घेतला. त्यात त्यांची १३ लाख ३१ हजार २०० रुपयांची आर्थिक बचत झाली.

- कंपनीमुळे परिसरातील ४० कामगारांना रोजगार मिळाला आहे.

पशुखाद्य, पोल्ट्री खाद्य निर्मितीचे नियोजन ः

ग्रीनअप शेतकरी कंपनीच्या सभासदांच्या सुमारे बाराशे एकर क्षेत्रावर गहू, मका, सोयाबीन व अन्य शेतमालाची पेरणी, लागवड होते. त्यात ७५० एकरवर सोयाबीन, पावणे तीनशे एकरवर गहू, याशिवाय हरभरा, मका या पिकांचे उत्पादन घेतले जाते.

यासाठी आवश्यक त्या सर्व निविष्ठा कंपनीकडून पुरवल्या जातात. दरवर्षी कंपनीकडून किमान ६ ते ७ हजार टन मालाची खरेदी होते. खरेदीनंतर प्रतवारी केली जाते. उत्तम दर्जाचा माल विक्रीसाठी जातो.

खराब किंवा कमी प्रतीच्या धान्यापासून पशुखाद्य, कोंबडी खाद्य तयार करण्याचे नियोजन केले आहे. याशिवाय स्मार्ट योजनेतून धान्य प्रक्रिया, प्रतवारी, अवजारे बॅंक तयार करण्यात आली. तर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतून ८१ लाखाचा तेल निर्मिती प्रकल्प आणि स्मार्ट योजनेतून पन्नास टनी वजनकाटा उभारणीचेही काम सुरू आहे.

सोनामोती गहू आणि विपननाचे अनोखे मॉडेल

दोनशे वर्षांपूर्वी वापरात असलेल्या आणि मध्यंतरी दुर्मीळ होत चाललेल्या ‘सोनामोती’ या देशी गहू उत्पादनाला कंपनीने चालना दिली. गुजरात, पंजाब राज्‍यांत काही प्रमाणात टिकून राहिलेला हा वाण कंपनी परिसरात १५० एकरांवर घेतला जात आहे.

महाराष्ट्रातील गहू जातीपेक्षा वेगळा दिसणाऱ्या या गव्हाचे एकरी १२ ते १४ क्विंटल उत्पादन होते. त्याची खरेदी साधारण सहा ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल या दराने केली जाते. शेतकऱ्यांना तीन पटीने आर्थिक फायदा मिळत आहे.

सोनामोती या देशी गहू वाणामुळे कंपनीला राज्यभरामध्ये ओळख मिळाली आहे. तसेच कंपनीने शेतकरी ते कार्पोरेट कंपनी यामध्ये विपननाचे मॉडेल उभे केले आहे. त्यामुळे कंपनीची उलाढाल वाढली, सभासद संख्या वाढली आणि कंपनीला महाराष्ट्रामध्ये नावलौकिक वाढला.

Farmers Producers Company
MCA Portal : ‘एमसीए’च्या संकेतस्थळामुळे शेतकरी उत्पादक कंपन्या हैराण

अवजारे बॅंक, फवारणीला ड्रोन

ग्रीनअप शेतकरी उत्पादक कंपनीने आतापर्यंत ६० लाख रुपये खर्चून विविध अवजारे, यंत्रे खरेदी केली. या अवजारे बॅंकेतून सभासदांना अल्प दरात उपलब्ध केली जातात.

फवारणीसाठी आधुनिक ड्रोनची खरेदी १० लाख रुपये खर्चून केली आहे. तसेच मशागतीसह हार्वेस्टिंगपर्यंतची विविध यंत्रे, खरेदी केली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत होत आहे.

जिद्दीचे कौतुक...

ग्रीनअप कंपनी सुरू करण्यासाठी पुढाकार घेणारे सचिन ठुबे यांना कोरोना प्रादुर्भाव व त्यानंतरच्या म्युकर मायकोसिस सारख्या गुंतागुंती निर्माण झाल्या. सुमारे तब्बल साडेपाच महिने ते रुग्णालयात होते. तोंडाची गंभीर शस्त्रक्रिया करावी लागली.

आजही त्यांना द्रवरूपातील अन्न घ्यावे लागते. बोलण्यातही अडचण येते. व्यवस्थापकीय संचालक आजारी असल्याने कंपनीच्या कामकाजावरही विपरीत परिणाम झाला होता.

मात्र बरे होताच बोलता येत नसताना सोशल माध्यमाच्या साह्याने संवाद साधत सचिन यांनी झपाट्याने काम सुरू केले. त्यांच्या जिद्दी व झपाटलेल्या नेतृत्वामुळेच कंपनी या उंचीपर्यंत पोचली असल्याचे कौतुक शेतकऱ्यांमध्ये आहे.

संपर्क, अनिल रखमाजी हापसे (चेअरमन), ९७६६५९२१७७

सचिन वसंतराव ठुबे (व्यवस्थापकीय संचालक), ९८९००११८९२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com