Wild Boar
Wild BoarAgrowon

Wild Boar Control : रानडुक्कर नियंत्रणासाठी पर्यावरणस्नेही पद्धती

Wild Boar Rampage : रानडुक्कर हा कायद्यानुसार संरक्षित प्राणी असून, त्यांना मारणे किंवा हानी पोहोचविणे कायद्यानुसार शिक्षेस पात्र गुन्हा आहे. त्यामुळे त्यांच्या व्यवस्थापनासाठी त्यांना हानी न पोहोचविता पीक नुकसान करण्यापासून परावृत्त करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब करता येतो.
Published on

Wild Animal Crop Damage : रानडुक्कर भात, मका, ज्वारी, बाजरी, भुईमूग, भाजीपाला अशा विविध पिकांसह फळबागांमध्ये देखील मोठे नुकसान करतात. जंगलाजवळील लागवडीखालील क्षेत्रामध्ये रानडुकरांची समस्या अधिक दिसून येते. रानडुकरांमध्ये लांबवरून वास घेण्याची क्षमता (हुंगण्याची) ही जास्त असते. या हुंगण्याच्या क्षमतेच्या मदतीने ते एखाद्या क्षेत्रातील पीक दूरवरून फक्त वासाने ओळखतात.

रानडुकरे नेहमी दिवसापेक्षा पहाटे व रात्रीच्या वेळी कळपाने अधिक सक्रिय असतात. त्यामुळे शेतामध्ये प्रत्यक्ष जाऊन त्यांना पिकाचे नुकसान करण्यापासून रोखणे शक्य होत नाही. अशावेळी अन्य पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. रानडुक्कर वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ अंतर्गत परिशिष्ट ३ प्रजातींच्या यादीत नमूद केलेला प्राणी आहे.

रानडुक्कर हा कायद्यानुसार संरक्षित प्राणी असून त्यांना मारणे किंवा हानी पोहोचविणे कायद्यानुसार शिक्षेस पात्र गुन्हा आहे. त्यामुळे त्यांच्या व्यवस्थापनासाठी त्यांना हानी न पोहोचविता पीक नुकसान करण्यापासून परावृत्त करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी विविध पद्धतीचा अवलंब करता येतो.

अधिवास ः

  • रानडुकरे गवताळ ठिकाणी, विरळ झुडपांच्या रानात, वन व कृषी पर्यावरणात अधिवास करतात.

  • रानडुक्कर शाकाहारी, मांसाहारी म्हणजेच बहूअन्न भक्षक असून ते झाडाची मुळे, कंद, कीटक, साप व इतर लहान सस्तन प्राण्यांवर उपजीविका करतात.

  • रानडुक्कर कायम समूहाने राहतात. एक समूह १५ ते ३५ रानडुकरांचा असतो.

  • रानडुकरे पिकांचा वापर उपजीविका व निवाऱ्यासाठी करतात.

नुकसान ः

  • रानडुकरांची हुंगण्याची क्षमता विलक्षण असून पिकांची ओळख ते फक्त वासाने करू शकतात. त्यामुळे दूरवरूनच ते पिकाचा मागोवा घेऊ शकतात. त्यांची दृष्टी व ऐकण्याची क्षमता ही खूप कमी असते.

  • रानडुकरांची प्रजनन क्षमता ही जास्त असते. विशेषतः पावसाळ्यात ते जास्त प्रजनन करतात. एक मादी एका वेळी पावसाळ्यात ५ ते १२ पिलांना जन्म देऊ शकते.

व्यवस्थापनाच्या विविध पद्धती ः

भौतिक अडथळे निर्माण करणे ः

रानडुकरांची हुंगण्याची क्षमता चांगली असली, तरी त्यांची दृष्टी व ऐकण्याची क्षमता ही कमी असते. याच गोष्टींचा फायदा घेऊन रानडुकरांपासून पिकांचे संरक्षण करता येते.

Wild Boar
रानडुकरांचे पर्यावरणस्नेही व्यवस्थापन

तारांचे कुंपण ः

उपद्रव जास्त असलेल्या क्षेत्रात ३ पदरी कुंपण करून तीन पदरांतील अंतर एक फूट ठेवावे. या कुंपणामुळे भौतिक अडथळा निर्माण होऊन रानडुकरांना शेतामध्ये प्रवेश करण्यापासून रोखता येते.

गोलाकार टोकदार पात्याचे कुंपण ः

पिकापासून एक फूट अंतरावर पिकाच्या चारही बाजूंनी टोकदार पात्यांचे कुंपण लावल्यास रानडुकरांचे व्यवस्थापन करणे सोयीचे होते. भाजीपाला व फळपिकांच्या बागांचे रानडुकरांपासून दीर्घकाळ संरक्षणासाठी ही पद्धत अतिशय फायद्याची ठरते.

साखळी जोडणीयुक्त कुंपण

पिकाच्या चारही बाजूंनी पिकापासून एक फूट अंतरावर ३ फूट उंचीचे साखळी जोडणीयुक्त कुंपण लावल्यास भौतिक अडथळा निर्माण होतो. अशा भागात रानडुकरे प्रवेश करीत नाहीत.

Wild Boar
सामुहिक पद्धतीने करा रानडुक्करांचे नियंत्रण

सौरऊर्जा चलित कुंपण ः

तारेतून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहामुळे जीवितहानी होत नाही किंवा कुठलाही अपाय होत नाही. परंतु विद्युत प्रवाहाच्या झटक्यामुळे तारेच्या संपर्कात येण्यापासून प्राणी घाबरतात. शेतामध्ये सौरऊर्जा चलित कुंपणाचा वापर रानडुक्कर व इतर वन्य प्राण्यांच्या व्यवस्थापनाकरिता पर्यावरण स्नेही आहे. या कुंपणांच्या तारेतून १२ व्होल्ट इतका विद्युत प्रवाहाचे वहन होते.

मत्स्य जाळे कुंपण ः

पिकाच्या चारही बाजूंनी पिकापासून एक फूट अंतरावर मत्स्य जाळे कुंपण म्हणून लावले जाते. त्यामुळे रानडुकरांसाठी भौतिक अडथळा निर्माण होतो. ही पद्धत अत्यंत साधी, स्वस्त व सोपी आहे.

चर किंवा खड्डा पद्धत ः

शेताभोवती २ फूट रुंद आणि दीड फूट खोल खड्डा किंवा चर खोदून ठेवावेत. जेणेकरून रानडुक्करे शेतापासून दूरच राहतील. या खोदलेल्या चराचा उपयोग पाणी अडवून जलसंधारणासाठी देखील होतो.

पर्यावरणस्नेही ध्वनिवाहक यंत्रे ः

निरनिराळ्या आवाजांचा वापर करून वन्य प्राण्यांना मानवी वसाहती व पिकांपासून दूर लावण्याची ही जुनी पद्धत आहे. सध्या बाजारात काही आधुनिक ध्वनिवाहक यंत्रे उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करून पक्षी, माकडे, नीलगाय यांसारख्या प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करता येते. ध्वनिवाहक यंत्राद्वारे विविध परभक्षी प्राणी, पक्ष्यांचे नैसर्गिक आवाज, विशिष्ट प्राण्यांचे यातना सूचक आवाज यातून निघतात. या आवाजामुळे रानडुक्कर तसेच इतर वन्य प्राणी भयभीत होऊन पिकांपासून दूर पळतात.

अन्य पद्धती ः

अंड्याच्या मिश्रणाची फवारणी ः

रानडुकरांची हुंगण्याची क्षमता लक्षात घेऊन पिकाभोवती अंड्याच्या मिश्रणाची फवारणी केल्यास रानडुकरांना शेताजवळ येण्यापासून रोखता येते. त्यासाठी मुख्य पिकाभोवती उघड्या ओल्या जमिनीवर अंड्याच्या मिश्रणाची फवारणी करावी. या वासामुळे रानडुकरे मुख्य पिकाचा शोध घेऊ शकत नाहीत. ही फवारणी १० ते १२ दिवसांच्या अंतराने केल्यास रानडुकरांपासून बऱ्याच अंशी पिकाचे संरक्षण करता येते.

स्थानिक पाळीव डुकरांच्या शेणाची फवारणी

रानडुकरांमध्ये विशिष्ट प्रादेशिकता (अधिवासीनता) जास्त असल्यामुळे ते इतर प्राण्यांच्या निवासी भागात जात नाहीत. त्यामुळे स्थानिक पाळीव डुकरांच्या शेणाची फवारणी पिकाभोवती केल्यास शेणाच्या वासामुळे जंगली रानडुक्करे पाळीव डुकरांनी त्या क्षेत्रात प्रवेश केल्याच्या संभ्रमात पडतात. त्यामुळे ते अशा ठिकाणाहून स्थलांतर करतात.

Wild Boar
Wild Boar Crop Damage : कळंबमध्ये उसाचे रानडुकरांकडून नुकसान

मानवी केसांचा वापर ः

रानडुकरांची दृष्टी व ऐकण्याची क्षमता ही अत्यंत कमजोर असते. त्यामुळे त्यांना स्थलांतराकरिता आणि खाद्य शोधण्याकरिता अति विकसित व विलक्षण हुंगण्याची क्षमतेवर पूर्णपणे अवलंबून राहावे लागते. याचा फायदा घेऊन शेताभोवती चारही बाजूंनी मानवी केस पसरून टाकल्यास खाद्याच्या शोधात हुंगत आलेल्या रानडुकरांच्या नाकात हे केस अडकले जातात. ते रानडुकरांना टोचतात यामुळे नाइलाजाने ते तिथून पळ काढतात.

पिकाभोवती विविध रंगांच्या साड्यांचा वापर ः

पिकाच्या चारही बाजूंनी विविध रंगांच्या साड्या बांधून ठेवल्यास पिकाभोवती वेगवेगळ्या रंगांना पाहून रानडुकरे मानवी हालचाली होत असल्याचे समजतात. अशा क्षेत्रात रानडुक्कर प्रवेश करणे टाळतात. परंतु ही पद्धती त्या प्रमाणात रानडुकरांपासून पिकाचे संरक्षणात तितकी प्रभावी आढळून येत नाही.

स्थानिक डुकरांच्या शेणाच्या गोवऱ्यांचा

जाळून धूर करणे ः

स्थानिक डुकरांच्या वाळलेल्या शेणाच्या गोवऱ्या जाळून मातीच्या भांड्यात संध्याकाळी धूर करावा. या वासामुळे जंगली रानडुकरे पाळीव डुकरांच्या निवासी क्षेत्रात प्रवेश केल्याच्या संभ्रमात पडतात व अशा ठिकाणाहून स्थलांतर करतात.

जैविक अडथळे/ जैविक कुंपण ः

जैविक कुंपणाचा वापर करून वन्य प्राण्यांचा शेतामध्ये शिरकाव होण्यापासून रोखला जातो. शिवाय या कुंपण पिकापासून अतिरिक्त उत्पन्न मिळते. ही पद्धत पर्यावरण स्नेही असून पिकांचे डुकरांपासून संरक्षणासाठी फायदेशीर आहे.

पिकाभोवती करडई लागवड ः करडई पीक हे काटेरी असून या पिकाच्या चार ते पाच ओळी मुख्य पिकाच्या चारही बाजूंनी लागवड कराव्यात. काटेरी करडईमुळे रानडुकरांना शेतामध्ये येण्यापासून मज्जाव होतो. तसेच करडईचे पीक एक विशिष्ट रसायन सोडते. त्यामुळे देखील रानडुकरांना मुख्य पिकाचा वास घेण्यास अडचण निर्माण होते. तसेच या पिकामुळे अतिरिक्त उत्पन्नसुद्धा मिळते.

पिकाभोवती एरंडी लागवड ः मका पिकामध्ये एरंडी पिकाच्या चार ते पाच ओळी चारही बाजूंनी लावाव्यात. एरंडीच्या झाडापासून निघणाऱ्या रसायनाच्या वासामुळे रानडुकरे मका पिकाचा मागोवा घेऊ शकत नाहीत. तसेच रानडुकरे मुख्य पिकाच्या शेताजवळ आले तरी एरंडीचे पीक खाण्यायोग्य नसल्यामुळे नासाडी होत नाहीत. आणि मुख्य पिकाचे होणारे नुकसान टाळले जाते.

पिकाभोवती झुडूपवर्गीय काटेरी झाडांची लागवड ः मुख्य पिकाच्या भोवती करवंद, कोरफड, घायपात, बोर, काटेरी निवडुंग (नागफणा) यांसारख्या काटेरी झुडपांची लागवड केल्यास रानडुकरांपासून संरक्षण मिळते. या वनस्पतीच्या लागवडीमुळे मुख्य पिकाचे होणारे नुकसान दीर्घ कालावधीकरिता टाळता येते. याशिवाय करवंदसारख्या पिकापासून अतिरिक्त उत्पन्नही मिळते.

- डॉ. प्रमोद मगर, ७७५७० ८१८८५

(विषय विशेषज्ञ (कीटकशास्त्र), कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com