
Jalgaon News : खानदेशात आगाप हंगामातील पपईची लागवड सुरू झाली आहे. यंदा क्षेत्र घटेल, असे संकेत असून, पपई रोपांचे दरही आवाक्यात असल्याची स्थिती आहे. खानदेशात पपईसाठी नंदुरबार जिल्हा आघाडीवर असून, २०२३-२४ मध्ये जिल्ह्यात पाच हजार २०० हेक्टरवर पपईची लागवड झाली होती.
नंदुरबारातील शहादा तालुक्यातील लागवड साडेचार हजार हेक्टरवर झाली होती. जळगाव जिल्ह्यात सुमारे १२०० हेक्टर आणि धुळ्यातही सुमारे एक हजार हेक्टरवर लागवड झाली होती. खानदेशात ७८६ व १५ नंबर पपई वाणांची लागवड केली जाते. त्यात ७८६ वाणावर रोगराई वाढत असल्याने गत हंगामात १५ नंबर वाणाच्या लागवडीला अनेकांनी पसंती दिली.
परंतु कमी पाऊस व नैसर्गिक समस्या यामुळे पपईचे उत्पादन कमी आले. मागील वेळेस रोपांची टंचाई होती. यामुळे अनेक शेतकरी वेळेत पपईची लागवड करू शकले नाहीत. यामुळे उत्पादन डिसेंबरमध्ये सुरू झाले. दरही कमी मिळाले. ऑक्टोबरमध्ये सरासरी ३५ रुपये प्रतिकिलो, नोव्हेंबरमध्ये सरासरी २० रुपये प्रतिकिलो आणि डिसेंबरमध्ये सरासरी चार रुपये प्रतिकिलोचा दर पपईला शेतकऱ्यांना जागेवर मिळाला. दरात मोठी पडझड झाली.
उठावही नव्हता. यामुळे पपई पिकात नुकसान सहन करावे लागले. ही समस्या लक्षात घेऊन अनेकांनी पपई पिकावर खानदेशात नांगर फिरविला. यामुळे नव्या हंगामात म्हणजेच २०२४-२५ मध्ये लागवडीबाबत फारसा उत्साह शेतकऱ्यांमध्ये नाही.
परंतु परंपरेनुसार नंदुरबारमधील शहादा, तळोदा, जळगावातील चोपडा, यावल, जामनेर भागात आगाप लागवड सुरू झाली आहे. धुळ्यातील शिरपुरातही काही शेतकरी पपईची लागवड करीत आहेत. पुढे उष्णता सुरू होईल. त्यापूर्वी पीक बऱ्यापैकी स्थिर होवून वाढीस लागावे व पुढे चांगले दर मिळावेत, असेही नियोजन आगाप लागवडीमागे आहे. यातच पपईचे दर बाजारात अद्याप कमी आहेत. यामुळे इतर अनेक शेतकऱ्यांनी लागवडीचे नियोजन स्थगित केले आहे. यंदा पपईची लागवड सुमारे ५०० ते ६०० हेक्टरने कमी होऊन साडेसहा हजार हेक्टरवर होईल असा अंदाज आहे.
आंतरपीक म्हणून लागवड
काही शेतकऱ्यांनी आगाप लागवडीसंबंधी नियोजन केले होते. ती लागवड या आठवड्यात सुरू झाली आहे. अनेक शेतकरी कलिंगडात पपईची आंतरपीक म्हणून लागवड करीत आहेत. तर काही शेतकरी मुख्य पीक म्हणून पपईची लागवड करीत आहेत. पपईची रोपेही खानदेशात सध्या मुबलक आहेत. रोपवाटिकांमध्ये त्यासंबंधी शेतकऱ्यांनी बुकिंग केले होते. त्यांचा वेळेत पुरवठा सुरू आहे. १० ते १२ रुपये प्रतिरोप, असे दर आहेत. लागवड सात बाय आठ, पाच बाय आठ, आठ बाय नऊ फूट या अंतरात गादीवाफ्यावर केली जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.