
कायगाव, जि. छत्रपती संभाजीनगर : तालुक्यात यंदा गत वर्षीच्या तुलनेत २३१ हेक्टर उसाचे क्षेत्र घटल्याने लवकरच गाळप हंगाम साखर आटोपला. त्यामुळे चार महिन्यापासून कामात व्यस्त असलेले ऊसतोड मजूर आपल्या गावी परतीच्या मार्गावर आहेत.
गोदावरी नदी आणि टेंभापुरी प्रकल्पाच्या पाण्याने समृद्ध असलेला गंगापूर तालुका हा ऊस उत्पादनासाठी ओळखला जातो. २०२३-२४ मध्ये लागवड झालेले व २०२४-२५च्या गाळपासाठी उपलब्ध होणारे आडसली, पूर्वहंगामी आणि खोडवा ऊस क्षेत्राची ९२३१ हेक्टर उसाची नोंद कृषी विभागाकडे होती. २०२४ -२५ मधील उसाचे क्षेत्र ९००० हेक्टर ऊस गाळपासाठी होते. गेल्या चार महिन्यापासून सुरू असलेल्या ऊस गळीत हंगामामध्ये तालुक्यात ८ हजाराच्यावर ऊसतोड मजूर दाखल झाले होते. त्यांनी आणि १८ हार्वेस्टिंग यंत्राच्या साहाय्याने साडेनऊ ते १० लाख टन ऊसतोडणी केली. गंगापूर तालुक्यातील
गोदावरी गंगथडीचा भाग ऊस पिकाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. बदलत्या हवामानात इतर पिकापेक्षा ऊस पहिल्यापासूनच फायदेशीर ठरत आल्याने पाण्याच्या पट्ट्यात हमखास ऊस लागवड होते. विशेषतः कायगाव जामगाव, नेवरगाव, शेंदूरवादा, वाळूज भागातून अनेक साखर कारखाने उसाची पळवापळवी करतात, ऊस गाळपास नेण्यास स्पर्धा करत ऊसतोडणी केली. यंदा उसाचे क्षेत्र कमी असल्याने १५ मार्चच्या आतच ऊसतोड संपली. त्यामुळे साखर कारखान्याचा पट्टा पडल्याने ऊसतोड कामगार, तोडणी वाहतूक मुकरदम, वाहन मालक यांचा म्हणावा असा धंदा झालाच नाही. सगळेच व्यवहारिक दृष्टया अडचणीत आले आहे.
कन्नड, गंगापूर, पैठण, नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, चाळीसगाव, अहिल्यानगर, गेवराई, बीड, बुलडाणा आदी भागातील मजुर गंगापूर तालुक्यात ऊस ऊसतोडणीला येतात. २०२४ मध्ये अतिवृष्टी झाली. परिणामी पिकाला अन्नद्रव्य घेण्यात क्षमता राहिली नाही. त्यामुळे ऊस वाढ झालीच नाही. त्यात ऊस लागवड कमी होती. तालुक्यातील विविध ठिकाणी १५ साखर कारखान्याच्या २२५ वाहन टोळ्या, २५० टँकर जुगाड आणि १८ ऊस तोडणी करणारे हार्वेस्टिंग यंत्र अहोरात्र कार्यरत होते. तसेच नव्याने सुरू झालेला पंचगंगा साखर कारखाना पूर्ण क्षमतेने चालल्यामुळे ऊस तोडणी क्षेत्र लवकर आटोपले.
त्यात तालुक्यातील मुक्तेश्वर शुगर मिल्स आणि जय हिंद शुगर मिल्स आणि बाहेर च्या काही साखर कारखान्यांनी मिळून दररोज ९ ते १० हजार मेट्रिक टन ऊस तोडणी केल्याने उसाचे क्षेत्र लवकर संपले. गंगापूर तालुक्यात गोदावरी नदी आणि पूर्ण क्षमतेने भरलेला टेंभापुरी प्रकल्प तसेच नांदूर मधमेश्वर मधून पाट चाऱ्यांना पाण्याचे रोटेशन यामुळे नविन ऊस लागवड १५ मार्च २०२५ पर्यंत ३५०० हेक्टर झाली. व पुढेही चालूच राहील. त्यामुळे पुढच्या वर्षी मार्च- एप्रिल पर्यंत साखर कारखाने चालण्याची शक्यता आहे.
मागच्या हंगामात उन्हाळ्यात सर्व प्रकल्प कोरडेठाक झाले होते.उसाचे पीक कमी झाले.खोडव्याचे प्रमाण ७० टक्के होते.अतिवृष्टीमुळे बुरशी वाढली,वाढ खुंटली.परिणामी उत्पादनात घट झाली.त्यामुळे या वर्षी ऊस गाळपाचे दिवस कमी झाले.
नंदकुमार कुंजर, मुख्य शेतकी अधिकारी, मुक्तेश्वर शुगर मिल्स ली. धामोरी बुद्रूक, ता. गंगापूर.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.