ॲग्रोवन वृत्तसेवा
Crop Damage : मुंबई : आठवडाभरापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे रायगड, पालघर, ठाणे, डहाणूमधील भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कर्जत, पनवेल, माणगाव, सुधागड-पाली, तळा तालुक्यांत आठवडाभरापासून शेतांत पाणी साचून राहिले आहे. येथील भातशेतीच्या नुकसानीचे अद्याप पंचनामे झालेले नाहीत.
रायगड जिल्ह्यात लावलेली रोप पाण्याखाली गेल्यामुळे कुजली असून डोंगराळ भागात काही ठिकाणी भातशेतीत माती, चिखल वाहून आले आहे. पावसाचा जोर ओसरल्यानंतर झालेले नुकसान दिसू लागले आहे. कृषी विभागाने केलेल्या नजरपाहणी अहवालात १५६ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचे नुकसान झाल्याची प्राथमिक नोंद करण्यात आली आहे, तर काही तालुक्यांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. गेल्या १५ दिवसांपासून सखल भागातील भातशेतीत पाणी साचले आहे. नुकतेच लावलेली रोपे कुजल्याने दुबार लावणीचे संकट ओढवल्याचे शेतकरी सांगतात. बुधवार, गुरुवारी पावसाचा जोर कमी झाल्यावर खलाटीतील पाणी कमी होऊ लागल्याने झालेले नुकसान दिसू लागले.
मोखाड्यातील वाघ प्रकल्प तुडुंब
मोखाडा तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पाऊस पडत असून पळसपाडा येथील वाघ प्रकल्प पूर्ण भरला आहे. बुधवारी (ता. २४) सांडव्यातून विसर्ग सुरू झाला. त्यामुळे मोखाडा आणि जव्हार तालुक्यातील, वाघ नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सांडव्यातून २१ घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. पालघरमधील धामणी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून या धरणाचे आठ दरवाजे बुधवारी (ता. २४) उघडले आहेत. धामणी आणि कवडास या दोन्ही धरणांतून पाण्याचा विसर्ग होत असल्याने सूर्या नदी किनारी असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सूर्या नदीला पूर आल्याने काठावरील वेती, वरोती, वाघाडी, कासा, चारोटी, घोळ, पेठ, म्हसाड, नानिवली, आंबेदे या गावांसह आजूबाजूच्या पाड्यांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.