Purandar News : गणपती उत्सवामुळे बहरलेला फुलांचा बाजार गौराई आगमनाच्या पार्श्वभूमीवर आणखीनच बहरला आहे. पुणे बाजारात सोमवारी (ता.९) हंगामातील सर्वाधिक बाजारभावाचा उच्चांक झाला. झेंडू दीडशे रुपये, तर भाग्यश्री शेवंती अडीचशे, बिजली साडेतीनशे रुपये प्रतिकिलोने विकली गेली. यामुळे शेतकऱ्यांसाठी गणेशोत्सव पर्वणी ठरला आहे.
गणपती बाप्पाच्या आगमनाने मागील चार दिवस फूल बाजारात मोठी तेजी झाली आहे. त्यातच गौराई आगमनाच्या पार्श्वभूमीवर फुलांना मोठी मागणी असताना आवक मात्र अपेक्षित प्रमाणात न झाल्याने सर्वच फुलांच्या बाजारात आणखीन वाढल्याचे पाहावयास मिळाली. गौराईसाठी शहरी व कोकण भागामध्ये घरोघरी मोठा उत्सव साजरा होत असल्याने या भागातील व्यापारी वर्गाने पुणे येथील फुलबाजारात फुलांच्या खरेदीसाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
यामुळेच फुलांच्या खरेदीसाठी सोमवारी व्यापाऱ्यांची झुंबड पाहावयास मिळाली. अनेक व्यापाऱ्यांना तेजीमुळे अपेक्षित प्रमाणात फुले खरेदी करताना कसरत करावी लागली. पुणे बाजारात झेंडू कोलकाता फुलांची विक्री सव्वाशे ते दीडशे रुपये विक्री होऊन काही ठिकाणी किरकोळ स्वरूपातली विक्री दोनशे रुपयापर्यंत देखील झाली.
पिवळ्या झेंडूला देखील आज मोठा उठाव होता. शेवंतीवर्गीय भाग्यश्री फुलांच्या बाबत देखील बाजारात होती. भाग्यश्री शेवंतीची बाजारात ठोक विक्री २०० ते अडीचशे रुपयापर्यंत झाली. काही किरकोळ स्वरूपातली विक्री २८० ते तीनशे रुपयेपर्यंत देखील झाली. शेवंती वर्गीय पेपर यलो, व्हाइट व पर्पल ही फुले ३०० ते ३५० रुपये किलोने दराने देखील विकली गेली. गुलछडी ७०० ते ९०० रुपये दरापर्यंत विकली गेली. कापरी शंभर ते दीडशे रुपये दराने विकली.
बिजली ‘कडाडली’
पुणे बाजारात बिजली फुलांचे बाजारभाव मात्र मोठ्या प्रमाणात कडाडले. बिजलीच्या फुलांची ३०० ते ३५० रुपये किलो दराने ठोक विक्री झाली. मध्यंतरीच्या पावसामुळे बिजलीच्या फडांचे मोठे नुकसान झाले असल्याने बाजारात बिजलीच्या फुलांची अत्यंत कमी प्रमाणात आवक होत आहे. यामुळे बिजलीची फुले मिळविण्यासाठी व्यापारी वर्गात देखील चुरस पाहावयास मिळत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.