Kolhapur Flood Water : कोल्हापूर जिल्ह्यात होत असलेल्या पावसाने जवळपास ७० हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. ग्रामीण भागातील ग्रामस्थांचे स्थलांतर होत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामध्ये अनेक गावांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील १५ हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेले आहे. यामध्ये ९ हजार हेक्टर ऊस पीक पाण्याखाली आहे तर खरिप हंगामातील भात, सोयाबीन, भुईमूग यासह अन्य पीक ६ हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली आहे. ऊस पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांची घालमेल वाढली आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आल्याने शिवार लालभडक दिसत आहे.
कोल्हापूर जिल्हा कृषी अधिक्षक अजय कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील ७० हून अधिक गावांना पुराच्या पाण्याचा थेट फटका बसत आहे. यामध्ये ऊस, भात, भुईमूग यासारखी पिके पाण्याखाली गेली आहेत. ८ दिवसांहून अधिक पाणी राहिल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे. अजून पाऊस सुरूच असल्याने नेमके किती क्षेत्र पाण्याखाली आहे, याचा अंदाज येणार नसल्याची माहिती कुलकर्णी यांनी दिली.
लाखो लिटर दूध पुरवठा ठप्प
गोकुळ आणि वारणा संघांसारख्या संस्थांचा लाखो लिटरचा दुधाचा पुरवठाही ठप्प झाला आहे. दूध संकलनातही घट झाली आहे. कालपर्यंत गोकुळचे ४० हजार लिटर दूध संकलन कमी झाले होते यामध्ये आज आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच जनावरांच्या हिरव्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनत चालला आहे. काही ठिकाणी साठवण केलेला सुका चारा पावसाने भिजल्याने कुजण्याची प्रक्रीया होत आहे. यामुळे जनावरांसह पशुपालकांची पुरामुळे वणवण होत असल्याचे चित्र आहे.
पाणीपातळी वाढत असल्याने जिल्ह्यातील १ हजार ३६७ कुटुंबांतील ५ हजार ८४५ नागरिकांचे आणि ३ हजार ४१५ जनावरांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले. त्याच दरम्यान २४० कच्च्या व पक्क्या घरांची पडझड झाली. २४ गोठ्यांची पडझड होऊन सुमारे ८० लाखांचे नुकसान झाले. यामध्ये शहरातील १०० हून अधिक नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच एनडीआरएफच्या जवानांकडून पूरप्रवण भागातील लोकांना आवाहन करत आहेत.
६ हजार नागरिकांचे स्थलांतर
धरण क्षेत्रात होणारा पावसाचा जोर कमी झाल्याने राधानगरी धरणाचे सहा पैकी दोन स्वयंचलित दरवाजे बंद झाले. मात्र, सायंकाळनंतर धरण क्षेत्रात पुन्हा धुवाँधार पाऊस सुरू झाला. तसेच काळम्मावाडी धरणाचेही दरवाजे उघडण्यात आले आहेत पंचगंगेची तासा-तासाला वाढणारी पाणीपातळी अनेक भागांतील लोकांच्या हृदयाचा ठोका वाढवत आहे. जिल्ह्यातील सुमारे ५ हजार ८४५ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले. तर १५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पीक पाण्याखाली गेले आहे.
पाणी पातळीत वाढ
राजाराम बंधाऱ्यावरील पंचगंगेची पाणीपातळी आज ( ता.२७) सकाळी ११ वाजता ४७.३ फूट इतकी होती. दरम्यान राधानगरी धरणाच्या चार दरवाजांमधून ७,२१२ क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढच होत आहे. तसेच शिरोली येथील राष्ट्रीय महामार्गालगत पाणी आले आहे परंतु पाणी पातळीत २ फुटांनी वाढ झाल्यास महामार्ग पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.