Drought in Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात दुष्काळ भीषणता! ११७ गावे व १२८ वाड्यांना पाणीपुरवठ्याची व्यवस्था

Drought Condition : गडहिंग्लज आणि हातकणंगले तालुक्यात राज्य सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.
Drought in Kolhapur
Drought in Kolhapuragrowon

Kolhapur Drought Condition : कोल्हापूर जिल्ह्याला पाणीदार जिल्हा म्हणून ओळखला जातो परंतु मागच्या वर्षी अल् निनोच्या स्थितीमुळे पाऊस कमी झाला. यामुळे एप्रिल ते जून दरम्यान पाणीटंचाईच्या झळा कोल्हापूर जिल्ह्यातील ११७ गावे व १२८ वाड्यांना बसण्याची शक्यता आहे. १९ गावे व ३५ वाड्यांना थेट टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग सज्ज झाला आहे. त्यासाठी तीन कोटी ८० लाख रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे.

मागच्या वर्षी चंदगडमधील केवळ दोन गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. परंतु यंदा दुष्काळ परिस्थिती असल्याने जिल्ह्यातील अनेक गावात टँकरद्वारे पाणी पुरवण्यासाठी मोठी यंत्रणा सज्ज करावी लागणार आहे. गडहिंग्लज आणि हातकणंगले तालुक्यात राज्य सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. तर अन्य तालुक्यात नद्यांची पात्रे कोरडी पडल्याने यंदा पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे.

गतवर्षी पावसाचे प्रमाण अल्प राहिल्याने यंदा जिल्ह्यातील गावांना पाण्याची टंचाई भासणार, या अनुषंगाने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने तालुकानिहाय सर्वेक्षण केले आहे. जानेवारी ते मार्च दरम्यानच्या सर्वेक्षणातच टंचाई भासणाऱ्या गावांसाठी खासगी विहिरींचे अधिकार ग्रहण व नवीन जलकूपनलिकांचे नियोजन केले आहे.

मार्चअखेरपर्यंत कागल, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ तालुक्यांतील २३ ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. एप्रिलनंतर टंचाईची झळ अधिकच दाट होणार असल्याचे अनुमान काढण्यात आले आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी दोन कोटी २० लाख, खासगी विहिरींच्या अधिग्रहणासाठी ९१ लाख १७ हजार, तर नवीन जलकूपनलिकेसाठी ६९ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

Drought in Kolhapur
Kolhapur Drought Condition : पाणीदार जिल्ह्यातील अनेक गावात नद्या झाल्या कोरड्या, शेतकरी ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता

राधानगरी तालुक्यात विंधन विहीर खोदाई

राधानगरी तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई भासणाऱ्या पंधरा वाड्या आणि एका गावातील उपाययोजनेसाठी २८ लाख ५० हजार रुपये खर्चाचा पाणीटंचाई निवारण व प्रतिबंधात्मक कृती आराखडा तयार केला आहे. संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रामुख्याने नवीन विंधन विहीर खोदाईची उपायोजना प्रस्तावित करण्यात आली आहे.

मार्चअखेरीपर्यंत म्हासुलीपैकी पादुकाचा वाडा, रातंबीचा वाडा, बाजारीचा वाडा, मलुंगडे वाडा, मधला वाडा, पाल खुर्द हुंबे वाडा या सात वाड्यांत पाणीटंचाई उद्भवणार आहे. तर एप्रिल ते पावसाळा सुरू होईपर्यंत फराळे धनगरवाडा हणबरवाडी, शिंदेवाडी, आडोली चर्मकार वसाहत, सावरदे पैकी बागलवाडी, राऊतवाडी, राणोशीवाडी, बौद्धवाडी या आठ वाड्यांत आणि चाफोडी तर्फे ऐनघोल गावाला पाणीटंचाईची झळ बसणार आहे. या वाड्यात नवीन विंधन विहीर खोदाई होणार आहे.

दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. परिणामी, गतवर्षी पाण्याची टंचाई भासली नाही. गतवर्षी मात्र पावसाचे प्रमाण अल्प राहिल्याने यंदा टंचाईचे चित्र भीषण असेल, असा अंदाज आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासह अन्य पर्याय उपलब्ध केले आहेत. - एम. व्ही. तिवले, प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com