
बंगालचे उपसागरावरील हवेचे दाब (Air) कमी झालेले असून चक्रीय वादळाचे मध्यावर ९९९ ते १००० हेप्टापास्कल व बाजूस १००४ ते १००६ हेप्टापास्कल राहणे शक्य आहे. हे चक्रीय वादळ पूर्व किनारपट्टीवर आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) भूमीवर धडकणे शक्य आहे. त्यामुळे त्या भागात तसेच चेन्नईच्या भागात वादळी वारे व पाऊस होईल.
वादळाची तीव्रता कमी असेल; मात्र पूर्व किनारपट्टीचे त्या भागात नुकसान होणे शक्य आहे. उद्या (ता. २१) आंध्रप्रदेशच्या किनारपट्टी भागात त्याचा प्रभाव जाणवेल. मंगळवार (ता.२२) रोजी ते पश्चिम भागात सरकेल आणि बुधवार (ता.२३) रोजी दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत त्याचा प्रभाव जाणवेल. विशेषतः कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत चक्रिय वादळाचा प्रभाव जाणवेल.
महाराष्ट्रावर या आठवड्यात १०१० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. मात्र उत्तरेकडून आणि ईशान्येकडून अति थंड वारे वाहतील. त्यामुळे पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम, अमरावती, मध्य विदर्भातील नागपूर तसेच पश्चिम विदर्भातील भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांत आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यासह मराठवाड्यातील बीड, जालना, औरंगाबाद जिल्ह्यात किमान तापमान १३ अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक घसरणे शक्य आहे.
या सर्व जिल्ह्यात थंडीचा प्रभाव जाणवेल. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची व दुपारची सापेक्ष आर्द्रता साधारणच राहील. त्यामुळे हवामान थंड व कोरडे राहील. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत वाऱ्याचा वेग साधारणच राहील. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमानातही घसरण होईल. सध्याचे हवामान रब्बी पिकांच्या वाढीसाठी अनुकूल राहील. ऊस व द्राक्ष फळामध्ये साखरेचे प्रमाण वाढण्यास हवामान अनुकूल आहे.
कोकण
सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमानात घसरण होऊन ते ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस,, तर सिंधुदुर्ग, ठाणे व पालघर जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत आकाश संपूर्णपणे ढगाळ राहील.
ठाणे व पालघर जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ५४ टक्के,, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ४३ ते ४६ टक्के राहील. त्यामुळे दुपारी हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते ९ किमी आणि दिशा ईशान्येकडून राहील.
उत्तर महाराष्ट्र
कमाल तापमान धुळे व जळगाव जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस,, तर नंदूरबार व नाशिक जिल्ह्यांत ३० ते ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान जळगाव जिल्ह्यात १३ अंश सेल्सिअस,, तर धुळे व नंदूरबार जिल्ह्यात १४ अंश सेल्सिअस, नाशिक जिल्ह्यात १५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३३ ते ३९ टक्के,, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १६ ते १९ टक्के राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. हे हवामान कापूस वेचणीस अत्यंत अनुकूल राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ६ किमी व दिशा ईशान्येकडून राहील.
मराठवाडा
कमाल तापमान औरंगाबाद जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस, तर जालना जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. लातूर, बीड जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस, तर उस्मानाबाद, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान बीड, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत १३ अंश सेल्सिअस, तर नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत १४ अंश सेल्सिअस राहील.
मात्र उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत किमान तापमान १५ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश पूर्णतः ढगाळ राहील. औरंगाबाद जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता लातूर, नांदेड व औरंगाबाद जिल्ह्यांत ५३ ते ५७ टक्के, तर उस्मानाबाद, बीड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ४१ ते ४८ टक्के राहील. सर्वच जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रतेत घट होऊन ती २२ ते ३० टक्के राहील. हवामान थंड व कोरडे राहील. कापूस वेचणीस हवामान अनुकूल राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते १२ किमी व दिशा ईशान्येकडून राहील.
पश्चिम विदर्भ
कमाल तापमान बुलडाणा जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस, तर अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत १३ अंश सेल्सिअस राहील. अकोला व वाशीम जिल्ह्यांत आकाश पूर्णतः ढगाळ, तर बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांत अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४२ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २१ टक्के राहील. त्यामुळे हवामान थंड व कोरडे राहील. कापूस वेचणीस ते अत्यंत अनुकूल राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ६ किमी राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.
मध्य विदर्भ
यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नागपूर जिल्ह्यात १३ अंश सेल्सिअस, वर्धा जिल्ह्यात १४ अंश सेल्सिअस आणि यवतमाळ जिल्ह्यांत १५ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४४ ते ५४ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २७ ते ३१ टक्के राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ९ किमी आणि दिशा ईशान्येकडून राहील.
पूर्व विदर्भ
कमाल तापमान भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत १३ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५१ ते ५८ टक्के राहील.
दुपारची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर जिल्ह्यात ३१ टक्के, तर गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात २१ ते २६ टक्के राहील. हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ८ किमी राहील. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा ईशान्येकडून व चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात ती आग्नेयेकडून राहील.
पश्चिम महाराष्ट्र
कमाल तापमान नगर जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस, सातारा जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस, तर सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नगर जिल्ह्यात १४ अंश सेल्सिअस, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत १५ अंश सेल्सिअस, तर सांगली व सातारा जिल्ह्यांत १६ ते १७ अंश सेल्सिअस आणि कोल्हापूर जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस राहील.
आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४६ ते ५४ टक्के व दुपारची सापेक्ष आर्द्रता २१ ते २७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते १० किमी आणि वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. हवामान अत्यंत कोरडे व थंड राहील.
(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ,
सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी
फोरम फॉर साउथ आशिया)
कृषी सल्ला
निमगरव्या व गरव्या भात जाती परिपक्व होताच कापणी, मळणीची कामे करून धान्य उन्हात वाळवावे. काजू बागेतील गवत, रोगग्रस्त फांद्या काढून बागेची साफसफाई करावी. सुपारीची काढणी घडाची संपूर्ण फळे नारंगी रंगाची झाल्यावर करावी. काढणी केलेल्या फळांवरील सालीचे पट्टे काढावेत. फळे उन्हात ४० ते ४५ दिवस वाळवावेत. करडईची पेरणी वेळेत पूर्ण करावी. उशिरा पेरणी केल्यास पिकावर मोठ्या प्रमाणात मावा किडीचा प्रादुर्भाव होतो.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.