Dr. Yashwant Nene : भारतीय कृषी इतिहासाचे प्रणेते : डॉ. यशवंत नेने

Asian Agri History Foundation : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ, इक्रिसॅटचे माजी उपमहासंचालक डॉ. यशवंत नेने यांनी एशियन अॅग्री हिस्ट्री फाउंडेशनच्या माध्यमातून भारताचा प्राचीन कृषी वारसा जगासमोर आणण्याचे मूलगामी कार्य केले.
Dr. Yashwant Nene
Dr. Yashwant NeneAgrowon
Published on
Updated on

विजय सांबरे

Indian Agricultural History : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ, इक्रिसॅटचे माजी उपमहासंचालक डॉ. यशवंत नेने यांनी एशियन अॅग्री हिस्ट्री फाउंडेशनच्या माध्यमातून भारताचा प्राचीन कृषी वारसा जगासमोर आणण्याचे मूलगामी कार्य केले. हजारो वर्षांच्या कृषी परंपरेत विविध भाषांत ज्ञानाचे भांडार आहे, ते प्रत्यक्ष शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे, हे त्यांनी कृषी संशोधन क्षेत्राला पटवून दिले. डॉ. यशवंत नेने यांच्या सहाव्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचे हे स्मरण...

सुमारे साठ वर्षांपूर्वीची ही गोष्ट. पंचविशीतील एक मराठी कृषी पदवीधर तरुण अमेरिकेतील नामवंत विद्यापीठात संशोधनासाठी गेला. ही त्या काळातील मोठी उपलब्धी होती. एकेदिवशी तो विद्यापीठाच्या आवारात भारतीय मित्रांशी गप्पागोष्टी करत असताना, एक ज्येष्ठ प्राध्यापक जवळून जात होते. त्यांनी मराठी तरुणाला एक खास अमेरिकन शैलीत उपरोधिक प्रश्‍न केला, की... तुम्ही म्हणता ना आमच्या भारत देशाची परंपरा खूप प्राचीन आहे.

पण जगाच्या कृषी इतिहासात तुमच्या या महान देशाचं काहीच योगदान नसावं, हे कसं काय बरं..? प्राध्यापक महाशयांची ही टिपणी ऐकून त्या विद्यार्थ्याचा अहंकार दुखावला आणि देशाभिमान जागृत झाला. माहितीच्या अभावामुळे त्याला भारतीय शेती परंपरेविषयी उत्तर देता आले नाही. पुढे संशोधन कार्य आटोपून तो मायदेशी परतला. उत्तर प्रदेशातील पंतनगर येथील कृषी विद्यापीठात रुजू झाला. शेती संशोधनात मोठे कार्य केले. हैदराबाद येथील इक्रिसॅट (ICRISAT) या आंतरराष्ट्रीय कृषी संशोधन संस्थेत उपमहासंचालक पदापर्यंत तो मराठी तरुण पोहोचला.

अमेरिकन प्राध्यापकाचे ते उपरोधिक वाक्य तो विसरलेला नव्हता. सेवेतून निवृत्तीला पाच वर्षे शिल्लक असताना त्याने गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीचा राजीनामा दिला. भारतीय कृषी इतिहास व परंपरेचा अभ्यास व संशोधन कामासाठी स्वत:ला वाहून घेतले. हैदराबादच्या आपल्या राहत्या घरी १९९४ मध्ये एशियन ॲग्री हिस्ट्री फाउंडेशन संस्थेची स्थापना केली. त्या कृषी इतिहासकाराचे नाव होते डॉ. यशवंत लक्ष्मण नेने.

सरकारच्या मदतीशिवाय स्वकमाई खर्ची करून डॉ. नेने यांनी पुढील वीस वर्षे भारतीय कृषी इतिहास व वारसा विषयात संशोधन केले. विविध प्राचीन ग्रंथ व हस्तलिखितांचे इंग्रजी मराठीसह इतर प्रादेशिक भाषांत अनुवाद करून ते प्रकाशित केले. ऋषी-मुनींचे प्राचीन कृषी ज्ञान जगापुढे आणले. भारतीय कृषी संस्कृतीचे नवे दालन खुले केले.

Dr. Yashwant Nene
Indian Agriculture : अशांत शेतकरी, निवांत सरकार

कौटुंबिक पार्श्वभूमी

डॉ. यशवंत नेने यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९३६ रोजी ग्वाल्हेर येथे झाला. आईचे नाव लक्ष्मी आणि वडील लक्ष्मण नेने. नेने कुटुंब मूळचे कोकणातील रत्नागिरी जवळील मावळुंगे गावाचे. वडील स्वातंत्रपूर्व काळात नोकरीच्या निमित्ताने ग्वाल्हेरला गेले. ते ग्वाल्हेर संस्थानात शिक्षण विभागात अधिकारी होते. संस्थानातील सर्व घटकांना त्यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. आजमितीला डॉ. नेने यांचे पुत्र सुधांशू डॉक्टर असून अमेरिकेत स्थायिक आहेत, तर कन्या पौर्णिमा रास्ते या पुण्यात राहतात. त्या एशियन ॲग्री हिस्ट्री फाउंडेशनच्या विश्‍वस्त आहेत.

शैक्षणिक कारकीर्द

बालपणी यशवंत नेने यांना वनस्पतिशास्त्र व विज्ञानाची आवड होती. शालेय जीवनात घरातील कुंडीत बिया लावून निरीक्षण करण्याचा छंद त्यांना जडला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण ग्वाल्हेरमध्येच झाले. पुढे १९५५ मध्ये ग्वाल्हेर येथील कृषी महाविद्यालयातून त्यांनी पदवी संपादन केली. त्यांनी १९५७ मध्ये कानपूर येथील शासकीय कृषी महाविद्यालयातून वनस्पती रोगनिदान (Plant Pathology) विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली.

अमेरिकेतील जगप्रसिद्ध इलीनिओस विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. केली. जी. बी. पंत कृषी विद्यापीठात सहायक प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले. आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी पंतनगर विद्यापीठात विविध पदावर काम केले. विद्यार्थिप्रिय शिक्षक म्हणून नावलौकिक मिळवला. उत्तर प्रदेशातील तराई क्षेत्रात भातावर पडणाऱ्या खैरा रोगावर संशोधन करून रोग निर्मूलनाचे विशेष काम केले. शेतकऱ्यांपर्यंत ज्ञान तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी ते नेहमी तत्पर असत.

१९७४ मध्ये डॉ. नेने इक्रिसॅट संस्थेत रुजू झाले. वनस्पती रोगनिदान व डाळवर्गीय पिके सुधारणा कार्यक्रमाचे प्रमुख शास्रज्ञ म्हणून त्यांनी काम केले. आपल्या कार्य- कर्तृत्वाच्या जोरावर ते १९८९मध्ये इक्रिसॅट या संस्थेचे उपमहासंचालक झाले. त्यांनी हरभरा व तूर या पिकांवर विशेष लक्ष केंद्रित करून लोकोपयोगी संशोधन केले. रोग प्रतिकारक जाती विकसित केल्या.

Dr. Yashwant Nene
Indian Agriculture : शेती : व्यवसाय की समाजसेवा?

एशियन अॅग्री हिस्ट्री फाउंडेशनची (AAHF) उभारणी

ऋग्वेदातील ‘कृषिमित कृषिस्व’ (तू शेतीच कर...!) या अर्थपूर्ण सूक्तातून डॉ. नेने यांनी प्रेरणा घेतली. भारतासह दक्षिण-पूर्व आशियातील कृषी परंपरेचा धांडोळा घेणे, हा प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवून, १९९४ मध्ये सिकंदराबाद येथील राहत्या घरी एशियन अॅग्री हिस्ट्री फाउंडेशनची स्थापन केली. वर्तमानातील आधुनिक संदर्भाला पारंपरिक कृषी ज्ञानाची जोड देत व्यावहारिक कृषी तंत्रज्ञान विकसित करण्याचे आव्हानात्मक कार्य डॉ. नेने यांनी सिद्ध करून दाखवले.

त्यांनी अनेक प्राचीन ग्रंथ नव्याने प्रकाशित केले. त्यात पहिल्या शतकातील ‘कृषी-पराशर’, आठव्या शतकातील काश्यपीय कृषी सुक्ती, सोळाव्या शतकातील संस्कृत संहिता ‘कृषी वल्लभ’, दहाव्या शतकातील ‘वृक्ष-आयुर्वेद’, तसेच सतराव्या शतकातील दाराशुको लिखित ‘नुस्खा-द-फन्नी फसाहत उर्फ कृषी-कला’ या फारसी भाषेतील संहितेचे इंग्रजीत भाषांतर केले. प्रचलित भारतीय कृषी तंत्रज्ञानाचे नानाविध पैलू या पाच संहितांच्या माध्यमातून जगापुढे आले.

‘एशियन अॅग्री हिस्ट्री’ नावाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे त्रैमासिक सलग आठ वर्षे नियमित प्रकाशित झाले. एकूण बत्तीस अंक प्रकाशित केले. तेही अत्यंत मोजक्या मनुष्यबळात. बी-बियाणे जतन संवर्धनाची पारंपारिक पद्धती ते बासमती विषयी पेटंटच्या संदर्भात पुराणकालीन धागेदोरे तसेच पंचांगातील हवामान अंदाजाचे शास्रीय अवलोकन,असे विविध विषय चर्चिले गेले. कृषी तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाचा प्राचीन भारतीय वारसा जगापुढे आला.

प्राचीन कृषी वारसा जपणारे अनुयायी त्यांनी निर्माण केले. आज घडीला पंतनगर विद्यापीठात एशियन अॅग्री हिस्ट्री फाउंडेशनचे काम सुरू आहे. प्रा. प्रभाकर तांबोळी, डॉ. चौधरी, डॉ. बेनिवाल तसेच पौर्णिमा रास्ते फाउंडेशनचे काम पुढे नेत आहेत. अनेकदा एखाद्या व्यक्तीने सुरू केलेले संस्थात्मक कार्य अनुयायांअभावी थांबते, पण नेने यांच्या बाबतीत असे घडले नाही, यामागे त्यांची दूरदृष्टी दिसते. फाउंडेशनमध्ये एकूण निधीच्या पन्नास टक्के रक्कम ही वैयक्तिक डॉ. नेने यांची आहे.

आज डॉ. नेने यांच्या कार्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. पंतनगर कृषी विद्यापीठात अॅग्री हिस्ट्री हा विषय पदवी अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे. त्यांची पुस्तके विद्यापीठाने स्वीकारली आहेत. डॉ. नेने यांच्या कन्या पौर्णिमा रास्ते यांना वडिलांचा भावलेले विविध गुण म्हणजे इतिहासाविषयीचे प्रेम, उत्तम वाचन, पाठांतर, कामात अचूकपणा, ते नेहमी सहकारी व विद्यार्थ्यांनी सांगत, की शेतीशी आपले पहिले नाते हे पेरणीतून तयार होते, त्यात शेतकऱ्यांचा सहभाग कमी होत आहे, हे दुर्दैवी आहे, तो पेरणीत प्रत्यक्ष सहभागी असेल, तरच पिकाकडे आईच्या मायेने पाहू लागतो.

डॉ. नेने हे खऱ्या अर्थाने भारतीय विचारधारेचा अभिमान बाळगणारे कृषी शास्रज्ञ होते. शेती क्षेत्रातील भारतीय वारसा, प्राचीन ग्रंथ, पारंपरिक लोकज्ञान यांचा त्यांना आदर होता. पाश्‍चात्त्यांनी निर्माण केलेल्या कृषिज्ञानाला आपण क्रेडिट का द्यायचे? हजारो वर्षांच्या कृषी परंपरेत विविध भाषांत ज्ञानाचे भांडार आहे व ते प्रत्यक्ष शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे, हे त्यांनी कृषी संशोधन क्षेत्राला पटवून दिले. सरकारी मदतीशिवाय एशियन अॅग्री हिस्ट्री फाउंडेशनचे काम पुढे नेले. पद्म पुरस्कारासाठी नामांकन होऊनही त्यांना त्याने हुलकावणी दिली.

प्राचीन कृषी साहित्य म्हणजे केवळ अंधश्रद्धा, पुराणातील भाकड कथांचा वर्तमानात काय उपयोग, असा मतप्रवाह रूढ होता. पण आपल्या भारतीय उपखंडातील प्राचीन ज्ञान पण शास्त्रशुद्धच आहे, हे डॉ. नेने यांनी सिद्ध करून दाखवले. आज घडीला देशात शाश्‍वत शेती पद्धती विकसित होत असताना प्राचीन अशा पारंपरिक ज्ञानाला मान्यता मिळाली आहे. याचे श्रेय डॉ. यशवंत नेने व समविचारींना जाते. विद्यार्थिदशेतील अमेरिकन विद्यापीठातील प्रोफेसर डेव्हिड गॉरलिब यांचे उपरोधिक वाक्य मला प्रेरणादायी ठरले व त्यातून जीवनाच्या उत्तर कालखंडात प्राचीन कृषी परंपरेचा वेध घेता आला, असे डॉ. नेने आवर्जून सांगत.

१५ जानेवारी २०१८ रोजी हैदराबाद येथे त्यांनी देह ठेवला. डॉ. नेने यांचे सहाव्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने स्मरण आवश्यक आहे. इतिहासाचे विस्मरण समाजाला रसातळाला घेऊन जाते. त्यामुळे या महान कृषी-इतिहासकाराचे मूलगामी कार्य लक्षात ठेवून त्यापासून नवीन पिढीने प्रेरणा घ्यायला हवी. त्यांना हीच खरी आदरांजली ठरेल.

९४२१३२९९४४

(लेखक शेती, पशुपालन व शाश्वत विकास या विषयांचे अभ्यासक आहेत.)

vijayasambare@gmail.com

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com