Arvind Gore : सहकारातील अवलिया

उस्मानाबाद जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अरविंद गोरे यांनी शनिवारी (ता. २९ ) ८२ व्या वर्षात पदार्पण केले.
Arvind Gore
Arvind GoreAgrowon

डॉ. श्रीकांत गोरे

उस्मानाबाद जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर (Dr. Babasaheb Ambedkar Co-operative Sugar Factory ) कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष ( Founder President) अरविंद गोरे (Arvind Gore) यांनी शनिवारी (ता. २९ ) ८२ व्या वर्षात पदार्पण केले. या कारखान्याच्या उभारणीमागची दृष्टी, विचार आणि एकूणच सहकारी चळवळीचे तत्त्व जगण्यात रूजवलेल्या, खऱ्या अर्थाने सहकारमहर्षी असलेल्या एका अवलियाच्या कर्तृत्वाचा हा छोटेखानी वेध.

Arvind Gore
वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यावर ‘प्राप्तिकर’चा छापा

अरविंद गोरे हे माझे मोठे भाऊ. उस्मानाबाद जिल्ह्यातील केशेगाव येथे मे २००० मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचा शिलान्यास त्यांनी केला. त्या वेळी मी पहिल्यांदा या कारखान्याच्या साईटवर आलो. त्या वेळी तिथलं वातावरण पाहून मी अचंबित झालो होतो.

Arvind Gore
Cotton MSP : कापसाला १२ हजार हमीभाव द्या

मी लातूरहून केशेगावला पोहोचलो. सकाळी ११ वाजता कारखाना साईटपासून एक किलोमीटर अंतरावरून रस्त्यावर नागरिकांचे लोंढे दिसत होते. ताशे वाजवत, मिरवणुकीने, सजवलेल्या बैलगाडीतून जात असलेली कुटुंबे, टाळ, मृदंगाच्या तालात भजने गात जाणारे जत्थे, ट्रॅक्टर ट्रॉलीत मध्यमवयीन शेतकरी, जीपमध्ये परीट घडीचे कार्यकर्ते, काठी टेकत शांतपणे रस्त्याच्या कडेने चालणारी ज्येष्ठ मंडळी... या सगळ्यांच्या चेहऱ्यावरील आनंदाचे, अभिमानाचे भाव, उत्सवाचे वातावरण भारुन टाकणारे होते. लोकांच्या चेहऱ्यावर एक आशा, विश्वास, आपलेपणा जाणवत होता. जुन्या हिंदी चित्रपटांतील जत्रेला जाणाऱ्या फिल्मी गावकऱ्यांची आठवण करून देणारे ते चित्र होतो. तो उत्साह पाहून मला आश्‍चर्य वाटले.

Arvind Gore
Soybean Rate : सोयाबीन बाजाराला पामतेलाचा आधार

वास्तविक उस्मानाबाद जिल्ह्यातील हा परिसर म्हणजे कोणत्याही कारखाना क्षेत्रात नसलेला, कमी पावसाचा भाग. पाऊस नाही तर ऊस नाही, अशी स्थिती. बरं पाऊस झाला की ऊस लावायचा, पण हक्काचा कारखाना नाही. म्हणजे ऊस गेला तरी खूप उशिरा जायचा. समर्थ नेतृत्वाचा अभाव होता. आणि प्रस्थापित नेतृत्वाचे या भागाकडे दुर्लक्ष होते. अरविंद गोरे यांनी मराठवाड्यातील पहिला सहकारी साखर कारखाना ‘तेरणा’ ११ वर्षे यशस्वीपणे चालवून कर्जमुक्त अवस्थेत आणून ठेवल्यानंतर तात्त्विक कारणासाठी तो कारखाना सोडला. त्यांनी या भागाची गरज ओळखून तेथे नवीन कारखाना सुरू करण्याचा चंग बांधला. कारखान्याचा प्रस्ताव १९९७ मध्ये मंजूर करून आणला. तत्कालिन केंद्रीय अर्थमंत्री मधू दंडवते यांचे याकामी मोठे सहकार्य लाभले.

Arvind Gore
Cotton Picking : कापसाची वेचणी कशी कराल? | ॲग्रोवन

आंबेडकर कारखान्यात काम करत असता अरविंद दादांनी सुरुवातीपासूनच गावपुढाऱ्यांना दूर ठेवले. स्वतः शेती करणारे, सज्जन, सत् प्रवृत्त, गावात मान-सन्मान असणारे, कारखान्याच्या विकासात सर्वासोबत आपलाही विकास या संकल्पनेवर श्रद्धा असणारे, साधी माणसे सहकारी म्हणून शोधले. त्यासाठी कारखाना क्षेत्रातील दोनशेपेक्षा अधिक गावांना अनेक वेळा भेटी दिल्या. वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या शेतात, घरी बैठका घेऊन सभासदांशी संवाद साधला. या संपर्कातून हेरलेल्या व्यक्ती तसेच सहकार/ बँकिंगमधील सेवानिवत्त झालेले कारखान्याचे सभासद शोधून त्यापैकी काही जणांना घेऊन संचालक मंडळ बनवले. त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून घेतला. संचालक निवडताना त्यांच्या राजकीय, आर्थिक परिस्थितीचा शून्य विचार केला. सत्तेच्या राजकारणाचा विचार सहकारात न करण्याचे धोरण मान्य असणाऱ्या, विविध पक्षांशी संबंधित व्यक्ती या संचालक मंडळात घेतल्या. त्यातून विविध पक्षांतील प्रस्थापित नेतृत्वाला स्थान नसलेले, तरीही सर्व पक्षीय, जातीय,धर्मीय तसेच स्त्रियांना अनिवार्यतेपेक्षा अधिक प्रतिनिधित्व देणारे संचालक मंडळ आकाराला आले. ही निवड करत असता प्रस्थापित पुढारी न निवडता त्याचा मित्र/ नातेवाईक- जो आपल्या विचारांशी बांधील आहे- असा निवडून प्रस्थापितांचे उपद्रवमूल्य कमी केले.

Arvind Gore
Soybean Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन सुधारले

उस्मानाबाद जिल्ह्यातील वजनदार, प्रस्थापित राजकीय नेतृत्वाने या कारखान्याला जाहीर विरोध केला. हा कारखाना आम्ही होऊ देणार नाही, असे जाहीर सभांमध्ये सांगितले. बँकांनी कारखान्याला सहकार्य करू नये, यासाठी दबाव आणला. परंतु अरविंद दादांची ‘तेरणे’तील शिस्त, भ्रष्टाचार मुक्त प्रशासन याबद्दल लोकमानसात रुजलेल्या विश्वासाने या तगड्या राजकीय विरोधावर मात केली. ज्या भागात अरविंद दादांचे पूर्वी काम नव्हते, तेथील १० हजार शेतकऱ्यांनी रांगा लावून रोखीने कारखान्याचे शेअर्स खरेदी केले. इतर कोणत्याही सहकारी साखर कारखान्यापेक्षा महिला (१६००), दलित (१८००) यांची लक्षवेधी संख्या त्यात आहे.

Arvind Gore
Cotton Picking : कापसाची वेचणी कशी कराल? | ॲग्रोवन

अरविंद दादांनी शेतकऱ्यांकडून गोळा केलेल्या भागभांडवलाचे सगळे पैसे राष्ट्रीयीकृत बँकेत मुदत ठेवींमध्ये (एफ.डी.) ठेवले. कारखान्याला मंजुरी मिळाल्यानंतर इतर बाबींची पूर्तता करण्यात प्रस्थापितांच्या विरोधामुळे काही वर्षे गेली. त्या काळात बँकेतील ‘एफ.डी़.’वर जमा झालेल्या व्याजाच्या पैशातून कारखान्यासाठी ३०० एकर सलग जमीन खरेदी केली. जमीन खरेदीसाठी सर्व शेतकऱ्यांशी एकत्रित चर्चा करून एकच भाव कायम केला.

Arvind Gore
Soybean Rate : सोयाबीनचे वाढलेले दर टिकतील का?

एकरी एक शेअर व उर्वरित रोख रक्कम, कारखाना चालू होईपर्यंत मूळ मालकाला जमीन कसण्याचा अधिकार, कारखान्याच्या गरजेनुसार उपलब्ध व्यक्तींच्या कुवतीनुसार- ज्यांनी सर्व जमीन कारखान्यास विकली त्यांना प्राधान्याने- नोकरी असं पॅकेज दिलं. कारखाना सुरू होण्याचा कालावधीचा अंदाज नसल्यामुळे, या नियोजनाने शेतकऱ्याचा फायदा झाला. तसेच कारखान्याचा जमीन सांभाळण्याचा खर्च व जबाबदारी टळली. स्थानिक शेतकऱ्यांचे सहकार्य व प्रतिसाद जबरदस्त होता. जमीन खरेदी प्रक्रिया काही आठवड्यात पूर्ण झाली.

स्थानिक राजकारण्यांनी घेतलेल्या विरोधी भूमिकेमुळे उस्मानाबाद जिल्हा बँकेचे सहकार्य मिळाले नाही. चंद्रपूर, सिंधुदुर्ग, पुणे, लातूर अशा दूरच्या जिल्हा बॅँका तसेच उस्मानाबाद जनता सहकारी बँक, सांगली नागरी सहकारी या बॅंका अर्थसाह्यासाठी पुढे आल्या. त्यानंतर महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेने म्हणजे शिखर बँकेने ‘लीड रोल'साठी मान्यता दिली. कारखान्याचे काम अडत नाही हे लक्षात आल्यावर या शेवटच्या टप्प्यात उस्मानाबाद जिल्हा बँकेने पत्र दिले. ही एक प्रकारे अरविंद दादांच्या ‘तेरणे'तील कार्यकर्तृत्वाची महाराष्ट्रातील सहकारी चळवळीने घेतलेली दखल होती.

दादांनी कारखाना चालू होण्याची पूर्ण खात्री झाल्याशिवाय सभासदाच्या भागभांडवलातून एकही पैसा खर्च केला नाही. इतर सहकारी साखर कारखान्यांच्या अनेक सुरस आणि चमत्कारिक कहाण्या बघायला मिळायच्या. अनेकांनी भागभांडवल जमा केले, कार्यालय उघडले, अध्यक्षांनी गाडी घेतली, कर्मचारी नियुक्ती केली, काही वर्षांत भागभांडवल संपवले आणि कारखाना काही उभाच राहिला नाही, अशी अनेक उदाहारणे होती. या पार्श्‍वभूमीवर आंबेडकर कारखान्याने आपलं वेगळेपण सुरुवातीपासूनच जपलं.

यानंतर कारखान्याच्या पायभरणीचा कार्यक्रम करण्याचे निश्‍चित झाले. त्या वेळच्या चर्चा, सूचना अगणित. पण अरविंद दादांचा विचार पक्का होता. कारखाना यशस्वी करण्यासाठी सर्व सभासदांचे सहकार्य, आपुलकी, शिस्त, विश्‍वास आवश्यक आहे. सभासदांना हा कारखाना माझा आहे, अशी भावना असली पाहिजे. ती निर्माण करण्यासाठी पायाभरणी सामान्य सभासदाच्या हस्ते करायची. राजकीय नेते बोलावून कोणत्याही पक्षाचे, गटाचे लेबल लावून घ्यायचे नाही. कारखान्याचे पक्ष-गट निरपेक्ष स्वरूप जपायचे.... हा दादांचा दृष्टिकोन होता. त्या अनुषंगाने ज्या सभासदाने आपली सर्व जमीन कारखान्याला विकली, जो कारखान्याच्या शेतात शेतमजूर म्हणून काम करतो, अशा हरिभाऊ पवार या दुर्लक्षित समाजातील शेतकऱ्याच्या हस्ते पायाभरणी करण्याचे निश्‍चित केले.

Arvind Gore
Cotton Market: खानदेशात जिनिंग प्रेसिंग कारखान्यांची धडधड सुरू

या कार्यक्रमाचे आयोजनही हटके होते. फक्त २०० पत्रिका छापल्या. त्याही अर्थसाह्य करणारे, सहकाराशी संबंधित कार्यालये व रेकॉर्डकरिता. सभासद असणाऱ्या गावात पत्रिकेचे एक बॅनर. चार दिवस आधी वर्तमानपत्रात पत्रिका व निमंत्रणचे जाहीर आवाहन.

गावोगावी शेकडो बैठका घेऊन अरविंद दादांनी सभासदांना आवाहन केले, ‘हा कारखाना आपला आहे. आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून व सहकार्याने सुरू करायचा आहे. कौटुंबिक आपुलकीच्या भावनेने चालवायचा आहे. याची पायाभरणी आपल्याच हस्ते करायची आहे. आपण सर्वांनी हजर राहून या कार्याला बळकटी द्यावी. मी कुटुंब प्रमुख या नात्याने सर्वांच्या हिताचे निर्णय घेऊन काम करणार आहे. त्याचे यश आपले सहकार्य व सहभाग यावर अवलंबून आहे. आपण सर्वांनी स्वतः या कार्यक्रमात सहभागी व्हावे. आपलाच कार्यक्रम आहे. सर्वांनी शिस्त पाळायची आहे. आपली एकजूट जगासमोर मांडायची आहे.’


सहकारी, हितचिंतक चिंतेत पडले होते. वैयक्तिक पत्रिका, निमंत्रण न देता कार्यक्रमाला कोण येईल? हे जाहिरातीचे जग आहे. गाड्यांची सोय केली पाहिजे. मोठ्या नेत्याला बोलावले तर आपोआप गर्दी जमा होते. सरळमार्गी माणसाचे आजच्या जगात काही चालत नाही. तुम्ही तेरणा कारखाना ११ वर्षे उत्तम प्रकारे चालवला, उसाला चांगला भाव मिळून दिला तरीही तुम्हाला बाजूला करण्यात आले. चांगल्याची किंमत कोणी करत नाही. हे कलियुग आहे... या भावनेचे अनेक सल्ले अरविंद दादांनी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून दिले. ठरल्याप्राणे हरिभाऊ पवार यांच्या हस्ते पायभरणी कार्यक्रम पार पडला.

Arvind Gore
Cotton Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर दबावात

मी काही मित्रांसमवेत कारखाना साईटवर पोहोचलो. मे महिन्याच्या कडक उन्हात सात-आठ हजार शेतकरी मोकळ्या मैदानावर बसून होते. एक वाजेपर्यंत १० हजार लोक जमा झाले. कार्यक्रम सुरू होताच सर्वत्र शांतता पसरली. अरविंद दादांचे भाषण लोकांनी लक्षपूर्वक ऐकले. कार्यक्रम संपल्यानंतर नाश्त्याचे पाकीट व पाण्याच्या पाऊचसाठी शिस्तबद्ध रांगा लागल्या. मैदानात बसून नाश्ता करून गप्पा मारत लोक परतले. पोलिस बंदोबस्त नव्हता. काही कार्यकर्ते शांततेने या मंडळींना मार्गदर्शन करत होते.

ही शिस्त, हा समंजसपणा कोठून आला? अरविंद दादांच्या सहकारातील वाटचालीला सामान्य शेतकऱ्यांनी दिलेली ती दाद होती. त्यांच्यावरील विश्‍वासाची ती पावती होती. त्यांच्या कडकं शिस्तीला मान्यता देऊन लोकांनी तिचा अंगीकार केल्याचं दिसत होतं.

संध्याकाळी दादांचा फोन आला. त्यांनी ‘कार्यक्रमाचे फलित काय?’ असे विचारले. बराच ऊहापोह झाल्यावर ते म्हणाले, ‘‘माझ्या मते, माझ्या सहकाऱ्यांचा चांगूलपणावरील विश्‍वास दृढ झाला, हे याचे फलित आहे.’’

कारखाना उभारणीमध्ये अनेक अडचणी होत्या. सर्वांत मोठी अडचण वीजपुरवठ्याची. स्थानिक प्रस्थापित राजकीय नेते ऊर्जामंत्री होते. त्यांचा कारखान्यास विरोध. वीजजोडणी वेळेत मिळण्याची शक्यता कमी होती. त्यामुळे स्वतःची वीज स्वतःच निर्माण करणे भाग होते. कारखान्याने पहिली खरेदी केली ती जनरेटरची. संपूर्ण कारखाना उभारणी त्यावर केली गेली.

दुसरी अडचण होती पाण्याची. पाटबंधारे खातेही याच स्थानिक मंत्र्याकडे. धरणातून पाणी मिळण्याची शक्यता कमीच होती. कारखान्याने धरणाखाली दोन एकर जमीन खरेदी केली. मोठी विहीर खणली. स्वतःचे स्रोत तयार झाले. दुष्काळी भाग असल्यामुळे कारखाना चालवण्यासाठी पाण्याचा प्रश्‍न नेहमीच भेडसावणारा. तो सोडवण्यासाठी उसातील अतिरिक्त पाण्याचे शुद्धीकरण करून पुनर्वापर करण्याचा प्रयोग करणारा हा पहिला कारखाना ठरला. हे अतिरिक्त पाणी कारखाना चालवून शिल्लक राहते. त्याचा वापर कारखान्याच्या शेतीसाठी केला जातो. साखर कारखाना चालवण्यासाठी खूप पाणी लागते हे संकल्पना इतिहास जमा झाली.

अशा प्रकारे प्रस्थापित वजनदार स्थानिक राजकीय नेतृत्वाचा (अ)सहकार कारखान्यास स्वयंपूर्णतेकेडे नेण्यासाठी उपयुक्त ठरला. त्यातूनच को-जनरेशन करणारा मराठवाड्यातील पहिला कारखाना होण्याचा सन्मान प्राप्त झाला. आज कारखाना २० मेगावॉट वीजनिर्मिती करून त्यापैकी ११ मेगा वॉट तसेच १ मेगावॉट सौरऊर्जा महावितरण कंपनीला देते.

पाच वर्षांनंतर निवडणूक लागली. अरविंद दादांनी सहकारातील निवडणुकीत नवीन पायंडा पाडला. निवडणूक खर्चाला फाटा दिला. निवडणूक कार्यालय नाही. प्रचार भोंगे, गाड्या बंद. भिंती रंगवणे नाही. गावात एक बॅनर. मोठ्या गावात दोन. उस्मानाबादेत पाच. याशिवाय उमेदवाराच्या घरावर एक. बस्स. बाकी वर्तमानपत्रात जाहिरात नाही. जाहीर सभा नाही. माझा मतदार शेतात राहतो, बरेच जण पेपर वाचत नाहीत... असं दादांचं म्हणणं. प्रचाराचा भर सभासदांच्या बैठकांवर. त्याही संचालक नसणाऱ्या सभासदाच्या घरी किंवा शेतावर. शेती सोडून गावात येणारे सभासद कमीच. बैठकीत आजवर केलेल्या कामाचा आढावा, पुढील नियोजन, तुम्हाला योग्य वाटत असेल, तुमचे सहकार्य असेल तर आम्ही पुढेही काम करायला तयार आहोत ही भूमिका मांडणे.

परंतु विरोधकांच्या प्रचाराप्रमाणे आपणही प्रचार केला पाहिजे, शेवटी ही निवडणूक आहे, असे काही सभासद सांगत. त्यांना अरविंद दादांचे उत्तर असे, ‘‘आपले सर्व उमेदवार शेती हा एकमेव व्यवसाय करणारे आहेत. विरोधकांचे उमेदवार व्यावसायिक आहेत, शेती हा त्यांचा जोडधंदा आहे. त्यांना यातून पैसे मिळवायचे आहेत म्हणून ते आता खर्च करीत आहेत. भांडवल गुंतवत आहेत. तुम्ही त्यांना ओळखता. त्यांनी यापूर्वी कधी तुमच्यासाठी खर्च केला आहे का? नाही ना? मग आताच काय झाले? आम्हाला खर्च करायला सांगून वसुली करण्यासाठी तुमच्याच पैशाचे नुकसान करायला का सांगताय? त्यांच्या प्रचारात फिरणाऱ्यांपैकी शेतकरी किती? सभेला जमा होणाऱ्यात मतदार किती होते, हे पहा. माझा तुमच्यावर विश्‍वास आहे. तुम्ही विचारी आहात. तुम्ही योग्य निर्णय घेण्यास समर्थ आहात.’’

विरोधकांनी प्रचाराचा धुरळा उडवला. प्रचंड वातावरण निर्मिती केली. गाड्या, भोंगे, निवडणूक कार्यालये, जेवणावळी, बॅनर, पोस्टर, पॅम्पलेट्स, रंगवलेल्या भिंती, पेड न्यूज. बिगर सभासदांची महिनाभर दिवाळी, निकालात मात्र विरोधकांचे दिवाळे वाजले. हाच सिलसिला पुढेही कायम राहिला. वरचेवर विरोधकांचा उत्साह कमी होत गेला. मागील निवडणुकीत त्यांना पूर्ण पॅनेलही उभे करता आले नाही. पण निवडणूक बिनविरोध काढण्याचा प्रयत्न करून असंतुष्टांचे, वेगळ्या विचारांच्या लोकांचे महत्त्व वाढवायचे नाही, तसेच निवडणुकीच्या माध्यमातून सभासदांकडून होणारे संचालक मंडळाचे परीक्षण टाळायचे नाही, यावर अरविंद दादा ठाम राहिले आहेत.


प्रत्येक वेळी २० पैकी सहा-सात नवीन संचालक जुन्या संचालकांच्या सल्ल्याने निवडले गेले. माजी संचालकांना विद्यमान संचालकाचे अधिकार व वागणूक दिली जाते. संचालक होणे हा सन्मान समजला जातो. त्यामुळे नाराजी निर्माण न होता माजी संचालकांना ज्येष्ठतेचा सन्मान मिळतो. आपण सगळे एकाच कुटुंबातील सदस्य आहोत, या भावनेने आपुलकीने सर्व आजी-माजी संचालक वावरताना दिसून येतात.

कारखान्याची मुहूर्तमेढ रोऊन आज २२ वर्षे झाली तरी यात फरक पडलेला नाही. आता बदल एवढाच की प्रत्येकाच्या हातात त्याचे स्मार्ट कार्ड ओळख पत्र होते. उघड्याऐवजी शेडमध्ये सभा होती. या सर्वसाधारण सभेत तीच शिस्त, विश्‍वास, आपलेपणाची भावना जाणवत होती. उपस्थित सभासदांमध्ये परीट घडीतील कोणीही दिसत नव्हते. स्त्री सभासदांची संख्या मोठी होती. खरोखर शेतात राहून शेती करणारा, हा कारखाना माझा आहे या भावनेने कार्यक्रम लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहणारा, ऐकणारे सभासद ही खरी कारखान्याची ताकद.

‘तेरणे’मध्ये काम करत असता अरविंद दादांवर महत्त्वाचा आक्षेप होता, की ते लोकांची (खरे तर कार्यकर्त्यांची) कामे (नियमबाह्य) करत नाहीत. त्यामुळे लोक(कार्यकर्ते) नाराज आहेत. सहकारात सर्वांना सोबत घेऊन चालावे लागते...वगैरे. सामान्य सभासद मात्र म्हणत, ‘‘त्यांनी माझे काम केले नाही, पण त्याबरोबर इतर कोणाचेही नियमबाह्य काम केले नाही, हेही खरे आहे. कारखान्याच्या हितासाठी ते कोणाचेही नियमबाह्य काम करत नाहीत.’’
गौतम बुद्ध, महात्मा गांधी, महात्मा फुले यांचा काळ वेगळा होता; आजकाल असे चालत नाही, लोक बिघडले आहेत. तडजोड करावीच लागते, अन्यथा यश मिळूच शकत नाही.... या प्रकारच्या पळवाटांना अरविंद दादांनी कृतीतून दिलेले हे उत्तर आहे. लोक तेच आहेत, तसेच आहेत. बुद्ध, गांधी, फुले यांच्या काळातही लोक हेच बोलत होते. आपला स्वतःचा चांगुलपणावर किती दृढ विश्‍वास आहे, श्रद्धा आहे यावर यश अवलंबून आहे, हाच या सगळ्याचा मथितार्थ आहे.
-----------
(लेखक आर्थोपेडिक सर्जन, निवृत्त प्राध्यापक व शेतकरी आहेत.) ९२८४४७७४२८

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com