Soybean Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन सुधारले

Anil Jadhao 

देशातील बाजारात सोयाबीनची आवक आता हळूहळू वाढत आहे. त्यातच मागील आठवडाभरापासून सोयाबीन उत्पादक पट्ट्यात पाऊस नाही. त्यामुळे सोयाबीनमधील ओलावा कमी होण्यास मदत होत आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात काहीशी सुधारणा झाली होती.

राज्यात मागील आठवडाभरापासून पावसानं उघडीप दिली. त्यामुळे ऐन दिवाळीच्या काळातही शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीच्या कामाला वेग दिला. मराठवाडा, विदर्भ आणि इतर इतर सोयाबीन उत्पादक भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी पावसानं पिकाची गुणवत्ता कमी झाली.

सध्या सोयाबीनमध्ये ओलावा जास्त असल्याने या मालाला प्रतिक्विंटल ४ हजार २०० रुपयांपासून ४ हजार ६०० रुपयांपर्यंत दर मिळतोय. तर दुसरीकडे ऊन वाढल्याने शेतकरी सोयाबीन वाळवत आहेत.

तिकडे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात आज काहीशी सुधारणा झालेली दिसली. सोयाबीनच्या दराने १४ डाॅलरचा टप्पा गाठला होता. आज सोयाबीनचे डिसेंबरचे वायदे १४०० सेंट प्रतिबुशेल्सने पार पडले.

मागील दोन महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा दर प्रतिबुशेल्स १३ ते १४ डाॅलरच्या दरम्यान आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे दर सुधारल्यास देशातील बाजारालाही आधार मिळू शकतो, असं जाणकारांनी सांगितलं.

देशातील बाजारात सोयाबीनचा किमान दर काहीसा वाढला आहे. तर एफएक्यू दर्जाच्या सोयाबीनला ५ हजार ते ५ हजार २०० रुपयांपर्यंत दर मिळतोय. सध्याची मागणी आणि पुरवठ्याची परिस्थिती पाहता पुढील काही दिवस सोयाबीनला प्रतिक्विंटल ५ हजार ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान सरासरी दर मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

cta image