Kardai cash crop : करडईसुध्दा नगदी पीक म्हणून घेता येणे शक्य

आपल्या कृषिपरंपरेत करडई हे पीक (Safflower Crop) ज्वारीत मिश्रपीक म्हणून लावले जाते; परंतु खाद्यतेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे करडईचे मिश्रपीक (Mix Crop) न घेता शुद्ध पीक घेण्याचे प्रयोगही आम्ही केले.
Safflower Cultivation
Safflower Cultivation Agrowon

डॉ. आनंद कर्वे

माझ्या फलटण येथील वास्तव्यात मी १९७० ते १९८० अशी दहा वर्षे करडई (Safflower) या पिकावर संशोधन करीत होतो. भारतातील एकूण खाद्यतेलापैकी (Edible Oil) जेमतेम दीड टक्के तेल करडई पिकापासून मिळत असल्याने ते काही फारसे महत्त्वाचे खाद्यतेल समजले जात नसे.

पण मी काम सुरू केल्यापासून काही वर्षांतच माझ्या कामाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली.

युनायटेड नेशन्सच्या इंटरनॅशनल रॉस्टर ऑफ सॅफ्लॉवर एक्स्पर्टस या यादीत माझ्या नावाचा समावेश करण्यात आला. तसेच युनायटेड नेशन्सतर्फे अल्जीरिया या देशात करडईचा विशेषज्ञ म्हणून मी जायला तयार आहे का, अशी मला विचारणाही करण्यात आली होती.

पुढे काही कारणाने तो प्रस्ताव मागे घेण्यात आला आणि माझी नेमणूक युनायटेड नेशन्सतर्फे म्यानमारमध्ये भुईमूगतज्ज्ञ म्हणून करण्यात आली.

करडईत मी केलेले महत्त्वाचे काम होते ते म्हणजे करडईच्या वाणांचा संकर करण्याचे नवे तंत्र. आपल्याला हवे असणारे गुणधर्म जर दोन भिन्न वाणांमध्ये आढळत असतील तर ते एकत्र आणण्यासाठी आपल्याला त्या दोन वाणांचा संकर करावा लागतो.

करडई ही वनस्पती सूर्यफुलाच्याच (Sunflower) कुळातली असल्याने तिच्या एकेका फुलात ५० ते १०० लहान लहान फुले असतात. काटेरी पानांनी निर्माण केलेल्या एका घट्ट काटेरी आवरणात ती फुले बंदिस्त केलेली असतात.

पीक तयार झाल्यावर याच आवरणाचे बोंडात रूपांतर होते आणि प्रत्येक बोंडातून ५० ते १०० बिया मिळतात.

Safflower Cultivation
Safflower Sowing : मराठवाड्यात बावीस हजार हेक्टरवर करडई पेरणी

निसर्गतः करडईमध्ये स्वपरागीकरण होते. करडईच्या प्रत्येक फुलात पाच पुंकेसर असतात. हे पाच पुंकेसर एकमेकांना चिकटून त्यांची एक पुंगळी तयार झालेली असते. या पुंगळीतच स्त्रीकेसर दडलेला असतो.

सकाळी फूल उमलताना स्त्रीकेसराची लांबी वाढून तो पुंकेसरांच्या पुंगळीतून बाहेर पडतो. याच वेळी पुंकेसरातून परागकण बाहेर पडतात आणि त्यांच्याद्वारे पुंकेसरांच्या पुंगळीतून बाहेर पडणाऱ्या स्त्रीकेसराचे परागीकरण होते.

आपल्याला हाताने परागीकरण करून दोन वाणांचा संकर करता येतो. त्यासाठी ज्या फुलाचे परपरागीकरण करायचे आहे त्यातले पुंकेसर आदल्या दिवशी संध्याकाळी काढून टाकायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या फुलातील लांबी वाढलेल्या स्त्रीकेसरावर दुसऱ्या वाणाचे परागकण टाकायचे.

ही फुले अत्यंत लहान आणि नाजूक असतात. त्यामुळे आधी त्याना वेढणाऱ्या पानांचे आवरण सोलून काढावे लागते. मग त्यातल्या न उमललेल्या फुलांवर काळजीपूर्वक शस्त्रक्रिया करून त्यातले पुंकेसर काढून टाकावे लागतात.

या संपूर्ण खटाटोपात त्या फुलांना इतकी इजा होते की शेवटी हाताने संकर घडवून आणलेल्या बोंडातून आपल्याला प्रत्येकी जेमतेम फक्त चार-पाच बियाच मिळतात.

मी विकसित केलेली पद्धती अशी होती, की जर आपण आदल्या दिवशी संध्याकाळी करडईच्या फुलाला एका प्लॅस्टिकच्या पिशवीत बंदिस्त केले, तर त्या पिशवीत साठलेल्या आर्द्रतेमुळे दुसऱ्या दिवशी सकाळी त्या फुलातल्या पुंकेसरांचे परागकोश बंदच राहतात.

त्यामुळे त्यांच्यातून पराग बाहेर पडत नाहीत; पण स्त्रीकेसरांची लांबी मात्र वाढून ते परागांच्या पुंगळीतून बाहेर आलेले असतात. अशा स्त्रीकेसरांवर आपण दुसऱ्या वाणाचे पराग टाकले की त्यातून मिळणारे बी हे संकरित बीज असते.

ही पद्धती वापरून मी एकेका हंगामात कित्येक किलोग्रॅम संकरित बी निर्माण करू शकलो. करडईत संकर घडवून आणण्याची ही प्रक्रिया ‘कर्वे पद्धती’ या नावाने प्रसिद्ध झाली. ती शिकण्यासाठी आमच्याकडे अनेक परदेशी शास्त्रज्ञही येत असत.

करडई हे पीक महाराष्ट्राच्या दुष्काळी भागात रब्बी हंगामात कोरडवाहू पीक म्हणून घेतले जाते. या पिकाला कोणी कधी रासायनिक खते घालीत नाही आणि पाणीही देत नाही.

आमच्या संकरित करडईला आम्ही रासायनिक खते आणि पाणी देण्यास सुरुवात केली. करडई पीक अत्यंत कोरड्या वातावरणात वाढत असल्याने त्याला पाणी दिले की त्यात अनेक बुरशीजन्य रोग उद्‍भवतात.

Safflower Cultivation
Safflower Sowing : मराठवाड्यात बावीस हजार हेक्टरवर करडई पेरणी

आमच्याकडे असलेली सर्व वाणे तपासल्यावर मला असे आढळले, की सायप्रस देशातून आलेल्या एका वाणाला बुरशीजन्य रोग अत्यंत कमी प्रमाणात येतात. आपल्याकडे पालेभाजी म्हणूनही करडईचा वापर केला जातो आणि त्या उद्देशानेही आम्ही करडईचा अभ्यास करीत असू.

त्या अभ्यासात आम्हाला असे आढळले की सायप्रसमधील या वाणाच्या पानांची भाजी अत्यंत तुरट आणि कडू होते; कारण त्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात टॅनिन असते.

पानांमधील टॅनिनमुळे वनस्पतींचा बुरशीजन्य रोगांपासून बचाव होतो हे पाठ्यपुस्तकातले तत्त्व प्रत्यक्षातही सत्य असल्याचे या अभ्यासातून दिसले.

वनस्पतींची रोगप्रतिकारशक्ती जाणून घेण्याच्या प्रचलित पद्धतीत ती वनस्पती शेतात लावून तिच्यावर बुरशीचे बीज टाकून तिला तो रोग होतो की नाही हे पाहिले जाते. पण आम्ही पानांमधील टॅनिनवर आधारित अशी एक चाचणी शोधून काढली.

तिचा वापर करून आम्ही आता प्रयोगशाळेत बसून वाणांच्या रोगप्रतिकारशक्तीचा अंदाज घेऊ शकतो. ही पद्धती केवळ करडईतच नव्हे तर अनेक प्रकारच्या अन्य वनस्पतींमध्येही वापरता येते.

करडई या पिकावर मी केलेल्या कामाबद्दल मला १९८० मध्ये ऑइल टेक्नॉलजिस्ट्स असोसिएशन ऑफ इंडियाकडून प्रोफेसर जे. जी. काणे पुरस्कार देण्यात आला. तसेच युनायटेंड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ अग्रिकल्चरतर्फे (यूएसडीए) सर्टिफिकेट ऑफ मेरिट देण्यात आले.

आपल्या कृषिपरंपरेत करडई हे पीक ज्वारीत मिश्रपीक म्हणून लावले जाते; परंतु खाद्यतेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे करडईचे मिश्रपीक न घेता शुद्ध पीक घेण्याचे प्रयोगही आम्ही केले. करडई ही एक अत्यंत काटेरी वनस्पती असते.

खतपाणी देऊन वाढवलेले शुद्ध पीक दाट तर वाढतेच पण त्यातल्या काट्यांमुळे काढणीसाठी त्यात शिरणेही अवघड जाते. यासाठी करडई पिकाच्या कापणी आणि मळणीसाठी आम्ही गव्हासाठी वापरले जाणारे कंबाइन हार्वेस्टर हे यंत्र वापरण्यास सुरुवात केली. कंबाइन हार्वेस्टरच्या सोयीमुळे आता बरेच शेतकरी करडईचे शुद्ध पीक लावू लागले आहेत.

Safflower Cultivation
Rabbi Crop Sowing : २४ हजार हेक्टरवर करडई आणि १० लाख ८७ हजार हेक्टरवर हरभरा

करडई तेलातील मेदांम्लामध्ये ८० टक्के लिनोलेइक आम्ल असल्याने ते बियांपासून वेगळे काढल्यानंतर टिकत नाही. जेथे करडई पिकते तेथील लोक हे तेल महिन्याच्या महिन्याला थेट तेल्याकडून विकत घेतात.

बांगलादेशातून आलेल्या एका वाणात आम्हाला ८० टक्के ओलेइक व केवळ २० टक्के लिनोलेइक आम्ल आढळले. त्यामुळे या तेलाचा टिकाऊपणा वाढतो;

पण यातली गंमत म्हणजे करडईच्या तेलाचे मुख्य वैशिष्ट्य असणारे जे लिनोलेइक आम्ल तेच या वाणात कमी प्रमाणात असल्याने हे तेल करडईचे तेल म्हणून विकण्यावर सरकारने बंदी आणली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com