Avanti Kulkarni : दूधदुभतं अन् म्हशींची दिवाळी

Article by Avanti Kulkarni : कोल्हापुरातलं दूधदुभतं काय आहे हे इथं एकदा येऊन गेलेल्या माणसाला समजतंच! म्हशी म्हणजे कोल्हापूरचा राष्ट्रीय प्राणी आहे असं आम्ही लहानपणी गंमतीनं म्हणत असू.
Avanti Kulkarni
Avanti KulkarniAgrowon

Article : कोल्हापुरातलं दूधदुभतं काय आहे हे इथं एकदा येऊन गेलेल्या माणसाला समजतंच! म्हशी म्हणजे कोल्हापूरचा राष्ट्रीय प्राणी आहे असं आम्ही लहानपणी गंमतीनं म्हणत असू. इथले दूध संघ, इथल्या मोठ्या प्रमाणात कार्यरत असलेल्या गोकुळ, वारणासारख्या डेअऱ्या, त्यांची देशभरात चवीनं चाखली जाणारी उत्पादनं ही कोल्हापूरची खासियत आहे. इतकंच कशाला आजही कोल्हापूरची ओळख सांगताना इथल्या दूधकट्ट्यांचा उल्लेख हटकून येतोच!

माझ्या माहितीत कोल्हापूरखेरीज कुठल्या दुसऱ्या शहरा-गावात हा असा दूधकट्टा नसेल. म्हणजे असं, की नुसतं पिण्यासाठी, विक्रीसाठी दूध ठेवणारे ठेले किंवा टपऱ्या किंवा दुकानं अनेक ठिकाणी असतात. पण रस्त्यावरच म्हशीचं ताजं दूध तुमच्यासमोर काढून ते मिळायची ठिकाणं दिसणार नाहीत कोल्हापूर खेरीज इतरत्र. कोल्हापूरच्या निरनिराळ्या पेठांमधून आजही दूधकट्टे दिसतात.

हे दूधकट्टे गेल्या दोन शतकांपासून आहे तिथं आहेत. कोल्हापूर मल्लविद्येसाठी, कुस्तीसाठी आणि म्हणून इथं वास्तव्याला असलेल्या पैलवानांसाठीही खूप प्रसिद्ध आहे. दूरदूरच्या राज्यांमधून अनेक मल्ल इथं कुस्ती शिकायला, खेळायला येत. आणि यांच्या रोजच्या पोषक आहाराचा, खुराकाचा महत्त्वाचा भाग म्हणजे दूध. निसर्गाचं वरदान लाभलेल्या कोल्हापुरात पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय उत्तमरीत्या सुरू आहे गेली अनेक वर्षं. तर आपल्या गावच्या मल्लांना खुराकात कसलीही कमतरता नको म्हणून कोल्हापूरच्या लोकराजा छत्रपती शाहूराजांनी दूधकट्टे बांधून दिले. हे कट्टे दगडी बांधकाम असलेले आहेत.

महिन्याच्या महिन्याला पैसे द्यायचे अन् म्हशीवाले किंवा गवळ्याकडं रतीब लावायचं हे पैलवानांचं इथं कट्ट्यावर ठरलेलं असतं. म्हशीवाले, गवळी आपापल्या म्हशी घेऊन आपापल्या ठरलेल्या कट्ट्यावर सकाळी आणि रात्री जातात. पारंपरिक शेतीव्यवसायाबरोबर आणि शेती व्यवसाय नसला तरी गवळी काम करणारी अनेक कुटुंबं दुग्ध व्यवसायात आहेत.

Avanti Kulkarni
Avanti Kulkarni : मऊ मनाचं रांगडं कोल्हापुर - भाग २

शेतीव्यवसाय नसणारे गवळी विकतचा चारा घेऊन म्हैसपालन करतात. कोल्हापुरात कपीलतीर्थ मंडई, उत्तरेश्‍वर पेठ या भागांत भाजीबरोबरच चारासुद्धा विक्रीसाठी येतो. गवळीलोक आपल्याला लागेल तेवढा चारा बहुतेक वेळा ताजा ताजाच खरेदी करतात. म्हशीला वैरण किंवा चारा आपापल्या घरीच दिला जातो आणि दूधकट्ट्यावर आल्यावर कडबा-पशुखाद्य दिलं जातं.

म्हशींचे पुष्कळ लाड पुरवले जातात कोल्हापुरात.

म्हशी कट्ट्यावर घेऊन येताना गवळीलोक स्वतःच्या डोक्यावर कडबा-कोंड्याचं घमेलं, पितळी कासंडी, पेला असं सामान घेऊन म्हशींना मधूनच आंजारत गोंजारत घेऊन भररस्त्यावरून, रहदारीतून निवांत येत असतात. काही वेळा बसायसाठी बसका चौरंग किंवा स्टूल घेऊनही येतात.

म्हशीला पिळायला बसण्यापूर्वी ‘हैय्या याऽऽऽ!’ अशी हाळी ठोकून म्हशीला पाणी मारून चुचकारून पिळायला घेतात. म्हशीची धार काढल्यानंतर दूध थेट ग्लासमध्ये भरून ग्राहकाला दिलं जातं. गवळी आपल्याबरोबर घेऊन येतो त्या पेल्यात अंदाजे चारशे मिलि दूध मावतं. पंचवीस ते तीस रुपयांना हे पेलाभर दूध मिळतं. शून्य पाणी असलेलं अगदी ताजं असं हे धारोष्ण दूध अत्यंत चवदार लागतं.

कोल्हापुरात शिवाजी पेठेत बलभीम बॅंकेजवळ, निवृत्ती चौकात, उत्तरेश्‍वरात, गंगावेशेत, मिरजकर तिकटी या ठिकाणी सकाळी आणि रात्री दोन्ही वेळेला दूधकट्ट्यावर दूध मिळतं, तर पापाच्या तिकटीला रात्री दूध मिळतं. सकाळी दहापर्यंत आणि संध्याकाळी सात ते रात्रीच्या एक-दोनपर्यंत दूधकट्टा सुरू असतो. त्यामुळं कधीही उशिरा गावात जावं यावं लागलं तरी या म्हशी आणि दूधकट्ट्याची अगदी जाग असते सावध अशी.

Avanti Kulkarni
Avanti Kulkarni : कोल्हापुर म्हणजे कृषी संस्कृती जपणारं गाव

कोल्हापुरात म्हैसपालन तर होतंच! इथं म्हशींचे फार लाड पुरवले जातात. यातच एक म्हशींची दिवाळीही असते. गायी, म्हशी, बैल हा कोल्हापूरच्या वैभवात भर घालणारा घटक आहे. पशुपालन करणारे तर या त्यांच्या गायी-म्हशी-बैलांवर घरातल्या सदस्याप्रमाणे माया करतात. दिवाळी आली की इकडं या गायी-म्हशी-बैलांना फार छान सजवतात. विशेष करून म्हशींची सजावट बघत राहावी अशी असते.

म्हशींना स्वच्छ अंघोळ घालतात. तिच्या अंगावरची लव वस्तऱ्यानं भादरून एकसारखी करतात. तिची कांती अगदी तुकतुकीत करतात. नंतर तिची शिंगं रंगवली जातात. आणि मग शिंगांना रिबीनी, गोंडे, मोरपिसं, घुंगरं, झेंडू-शेवंतीच्या फुलांचे गजरे गुंडाळले जातात. काही म्हशींच्या अंगावर नक्षीही काढली जाते. गवताचे, शेणामातीचे, निवडुंगाच्या पात्याचे दिवे करून त्यानं या धनाची- या त्यांच्या गायी-म्हशींची- पूजाआरती केली जाते. त्यांना मऊ, लुसलुशीत गवतभारा, चांगल्या प्रतीचा डाळीधान्यांचा कोंडा खायला देऊन नैवेद्यच जणू दाखवला जातो. आणि मग रोजची कामं सुरू होतात.

दिन दिन दिवाळी गायी, म्हशी ओवाळी

गायी, म्हशी कुणाच्या, लक्षमणाच्या

लक्षमण कुणाचा, आईबापाचा

दे गं मायी खोबऱ्याची वाटी

वाघराच्या पाठी घालीन काठी...

या ओळी म्हणत गुरराखी दिवाळी मागायला काही घरी जात. पूर्वी शेतात बिबळे येत असत. ते लहान वासरं, रेडकं पळवून नेत. म्हणून मग वाघराच्या पाठीत काठी घालून त्याला पळवून लावून आम्ही तुमच्या गायीगुरांचं रक्षण करून देतो, असं सांगणं असायचं. हा प्रकार आता दिसत नाही. आता फक्त म्हशी रंगवून सजवून, त्यांचा उच्च प्रतीचा चारापाणी देऊन सण साजरा करतात.

सकाळी पंचगंगेवर म्हशींना अंघोळ घातली जाते. आणि वर लिहिलंय त्याप्रमाणे सजवल्या जातात. म्हशींच्या अंगावर नक्षीबरोबरच अनेकदा काहीतरी सामाजिक संदेशही लिहिलेला असतो. त्यानंतर या नटलेल्या म्हशींना कोल्हापुरातल्या सागरमाळावरच्या सागरदेवीच्या देवळात नेलं जातं. तिथून मग म्हशींची पळण्याची स्पर्धा भरवली जाते. त्याबरोबरच म्हशींची सौंदर्यस्पर्धाही भरवली जाते. स्पर्धेत सामील असलेल्या म्हशी गावभरातून फिरवून आणल्या जातात. जिंकलेल्या म्हशीवर गुलाल उधळून तिचा माणूस तिचे अधिक लाड करतो. कोल्हापूरकर त्यांचं म्हशींवरचं प्रेम हे असंही दाखवून देतात.

इथल्या लोकसंस्कृतीत पोळा/बेंदूर यालाही खूप महत्त्व आहे. हा सण इथं जोरात साजरा होतो. त्यात बैलांना सजवून त्यांना पूर्ण विश्रांती दिली जाते त्यादिवशी. त्यांना पुरणाच्या दिव्यांनी ओवाळलं जातं. पुरणाचा नैवेद्य होतो. चारापाणी होतं. आपल्यासाठी हा जीव अखंड राबत असतो याचं भान ठेवून त्याच्याप्रती कृतज्ञताही व्यक्त केली जाते. त्या दिवशी इथल्या शाळांना, काॅलेजना सुट्ट्या असतात. मुलांना आपली लोकसंस्कृती समजावी याकरिता सुट्टी का आहे हे सुट्टीच्या आदल्या दिवशी शाळांमधून सांगितलं जातं. इंटरनॅशनल, ग्लोबल शिक्षणाबरोबरच मातीशी, निसर्गाशी जोडल्या गेलेल्या लोकपरंपरा, सणवार याविषयी मुलांना थोडीफार माहिती आजही कोल्हापुरात दिली जाते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com