
Pune News : राज्यातील चारही कृषी विद्यापीठांअंतर्गत शासकीय आणि निमशासकीय कृषी पदविका महाविद्यालयांतून दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडलेल्या हजारो विद्यार्थ्यांना नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे.
त्यातच कृषी, महसूल, कृषी संस्था, कृषी विद्यापीठे, बँका अशा विविध विभागात कृषी पदविकाधारकांना डावलेले जात असल्याने आज उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने विविध विभागातील नोकर भरतीत प्राधान्य देण्याची मागणी कृषी आयुक्तांकडे कृषी पदविकाधारकांनी केली.
राज्यातील कृषी पदविका धारकांच्या वतीने कृषी आयुक्त सूरज मांढरे यांना विविध मागण्याचे निवेदन गुरुवारी (ता. ९) देण्यात आले. त्यात म्हटले आहे, की शेतकरी कुटुंबातील हे विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळे दहावीनंतर नोकरीच्या आशेने कृषी पदविका घेतात. मात्र शासनाच्या बदलत्या धोरणांमुळे त्यांच्या स्वप्नांचा चुराडा होत आहे. पूर्वी ग्रामसेवक भरती ही केवळ कृषी पदविकाधारकांसाठी होती.
तसेच कृषी विभागात कृषी सेवक भरती, कृषी विद्यापीठात कृषी सहायक भरती आणि जलसंपदा विभागात नोकरीच्या संधी कृषी पदविकाधारकांना मिळत होत्या. खते आणि बियाणे परवान्यासाठीही ही पदविका आवश्यक मानली जात असे. याच उद्देशाने हजारो विद्यार्थ्यांनी हे शिक्षण घेतले, पण आता त्यांना अनेक ठिकाणी डावलेले जात असल्याने त्यांच्या वाट्याला फक्त निराशा येते, अशी भूमिका पदविकाधारक मांडत आहे.
अलीकडच्या काळात झालेल्या बदलांमुळे या विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय झाला आहे. ग्रामसेवक भरतीमध्ये बारावी पास विद्यार्थ्यांना संधी देऊन कृषी पदविकाधारकांना डावलण्यात येत आहे. त्यामुळे कृषी पदविका झाल्यानंतर नोकरी किवा काहीच फायदा होत नसेल तर शासनाने असे कृषी पदविकेचे कोर्सेस बंद करावेत. एकतर कृषी सेवक भरतीमध्येही परिस्थिती बिकट आहे.
२०१९ मध्ये अभ्यासक्रम पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील (डिग्री व पीजी लेव्हलचा) असल्यामुळे केवळ दोन ते तीन टक्के पदविकाधारकांची निवड होऊ शकली. २०२३ मध्ये तर, संपूर्ण अभ्यासक्रम बँकिंग एएफओ स्तराचा केल्यामुळे दोन टक्के विद्यार्थ्यांनाही निवड होण्याची संधी मिळाली नाही. या गंभीर समस्येकडे राज्य सरकारने गांभिर्याने लक्ष देऊन कृषी पदविकाधारकांना न्याय मिळवून देणे आवश्यक आहे, असे कृषी पदविकाधारक नीलेश कोऱ्हाळे पाटील, प्रा. विलास पवार आदींचे म्हणणे आहे.
कृषी पदविकाधारक विद्यार्थ्यांनी केलेल्या मागण्या
कृषी पदविकाधारकांना नोकरभरतीसाठी वयोमर्यादा ३-५ वर्षापर्यत वाढवून द्यावी.
सर्व शासकीय कृषी विद्यापीठे, ग्रामसेवक, तलाठी, जलसंपदा, कृषी संस्थाच्या विभागामध्ये वरील निकष लावून भरतीत प्राधान्य द्यावे
कृषी सेवा केंद्र परवान्यासाठी प्राधान्य देण्यात यावे
कृषी सेवक भरतीसह इतर नोकर भरतीमध्ये कृषी विद्यापीठाप्रमाणे कृषी पदविका व पदवीधर ६०:४० याप्रमाणेच भरती करावी
२०१२ पूर्वी ग्रामसेवक भरतीमध्ये फक्त कृषी पदवीकाधारकांना संधी होती, त्याच पद्धतीने यापुढेही कृषी पदविकाधारकांना संधी द्यावी
जलसंधारण विभागात कालवा निरीक्षक यासारख्या इतर पदासाठी कृषी पदविका विद्यार्थ्यांना संधी द्यावी
शालेय शिक्षणात कृषी हा विषय तत्काळ समाविष्ट करून कृषी पदविकाधारकांना संधी द्यावी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.