
Chh. Sambhajinagar News : जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत एक डिजिटल इंडिया सेवा केंद्र बनविण्यात येणार आहे. ८७० ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश आहे. प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात एक अत्याधुनिक असे सेवा केंद्र बनविण्यात येणार आहे.
केंद्रशासनाच्या इलेक्ट्रॉनिक व सूचना प्रौद्योगिकी मंत्रालयाच्या वतीने डिजिटल इंडिया आपले सेवा केंद्र (DICSC- Digital India Common Service Centre) हा नवीन पथदर्शी प्रकल्प राज्यातून एकमेव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या जनजागृती मोबाइल व्हॅनला बुधवारी (ता. १५) जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले.
सद्यःस्थितीत हा प्रकल्प पथदर्शी प्रकल्प म्हणून देशभरात १० जिल्ह्यांत राबविण्यात येत आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातून छत्रपती संभाजीनगर या एकमेव जिल्ह्याचा समावेश आहे. असे केंद्र बनविण्यासाठी संबंधित सेंटर चालकाकडील एकूण आवागमनाचा आधार घेतला जाणार आहे. त्यानुसार निवड करून असे केंद्र उभारण्यात येईल.
या केंद्राची उभारणी करतांना त्यात दिव्यांग व्यक्तींना सुकर असणारे केंद्र बनविण्यात येणार आहेत. या केंद्रांवर बॅंक ग्राहक सेवा केंद्र, आधार अद्यावतीकरण केंद्र यांचीही सेवा उपलब्ध असेल. या प्रकल्पाबद्दल जनमानसात जागृती व्हावी यासाठी जिल्ह्यातील सर्व ८७० ग्रामपंचायतीत एक डिजिटल प्रचार रथ फिरणार आहे.
एका दिवसात पाच ग्रामपंचायतींना हा रथ भेट देणार आहे. या प्रचार रथात सुद्धा आधार अद्यावतीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिवाय विविध योजनांचा प्रचार, एलईडी स्क्रीनवर फिल्म्स दाखवून करण्यात येणार आहे.
एक आधार संच आणि एक कर्मचारी या वाहनासोबत आहे. ज्या ज्या गावात हा रथ जाईल तेथे लोकांनी आपले आधार अपडेट करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी केले. निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, तहसीलदार पल्लवी लिगदे, जिल्हा समन्वयक प्रशांत तमखाने, शुभम सोनवणे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी या वेळी उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.