सतीश खाडे
देशातील आणि महाराष्ट्रातील पाण्याचा दुष्काळ तसेच पाण्याच्या विविध समस्या मानवनिर्मित आहेत, याचा प्रत्यय अनेकदा येतो. एका कार्यशाळेत इस्राईल कृषी तज्ज्ञ म्हणाले, की मुंबईच्या निम्मा जरी पाऊस आमच्या देशात पडला तर आम्ही पूर्ण जगावर कृषी व्यापाराचे राज्य करू शकतो.
या विचारांचा संबंध आहे पाणी व्यवस्थापनाशी. पाणी अव्यवस्थापनेचा संबंध आहे स्वयंबेशिस्त आणि माहितीच्या अभावाशी. तसेच थोडंफार बौद्धिक आळसाशी! यावर प्रबोधन, व्याख्यान, कार्यशाळा, लेखन अशा उपायांबरोबरच अधिक प्रभावी ठरू शकेल असा पर्याय वाटतो तो म्हणजे कृतीतून अनुभव आणि अनुभवातून शिकणे!
महात्मा गांधी यांच्या भाषेत ‘कर के देखो’! त्यातूनच निर्माण झाली ‘डिजिटल वॉटर मॅनेजमेंट’ उपक्रमाची संकल्पना. या उपक्रमात पाण्याच्या अनेक अंगासंबंधी कृती, निरीक्षणे, अनुमान आणि त्यावर आधारित परिस्थिती बदलण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा कृती कार्यक्रम आहे.
पाणलोट क्षेत्रातील व्यवस्थापन
एखादे गाव किंवा पाणलोट क्षेत्रातील पाण्याचे व्यवस्थापन करायचे असेल, तर त्यासाठी कोणती माहिती लागेल? याची थोडक्यात नोंद घेऊयात.
पाणलोटात / गावात पडणाऱ्या सरासरी पावसामुळे एकूण किती पाणी उपलब्ध होते आणि किती अडवलेले आहे? या पाण्याचे एकूण आकारमान, त्याचा शेती, जनावरे आणि माणसांसाठीचा वापर तसेच दर महिन्याला या भूपृष्ठजलाची प्रत्यक्ष स्थिती तपासणे आणि त्या आनुषंगिक व्यवस्थापन करणे.
भूजलाच्या प्रत्यक्ष स्थितीच्या नोंदी ठेवून भूजलाची उपलब्धतेवर लक्ष ठेवणे आणि वापराबद्दलचे व्यवस्थापन करणे.
पिकांना गरजेप्रमाणे काटेकोर पाणी देणे आवश्यक असते. याचे नियोजन व व्यवस्थापन हे हवामानाच्या विविध बाबींवर अवलंबून असते. त्यासाठी हवामानाच्या विविध घटकांच्या नोंदी ठेवणे आवश्यक आहे.
पिण्यासाठी, घरगुती वापरासाठी, शेतीसाठी लागणाऱ्या पाण्यात लागणारे घटक काही सारखे तर काही वेगवेगळे असतात. तसेच त्यात दूषित व प्रदूषित घटक असू शकतात. त्यामुळे पिण्यासाठी असो की शेतीसाठी ते सुरक्षित असणे गरजेचे आहे. त्यासाठी पाणी तपासणी आवश्यक आहे.
वातावरणातील विविध घटकांचे योग्य मोजमाप झाल्यामुळे पिकांवर पडणाऱ्या संभाव्य किडीचे नियंत्रण वेळेत होणे आवश्यक आहे. त्यामुळे कीटकनाशकांचा वापर कमी होऊ शकतो. त्यामुळे होणारे माती, पाणी प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. गावातल्या गावात हवामान बदल समजून घेण्यास आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी मदत होणार आहे.
मातीतील प्रदूषित घटकांमुळे भूजल व भूपृष्ठजल प्रदूषित होते. तसेच प्रदूषित पाण्यामुळे माती प्रदूषित होते. या बाबी पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी घातक आहेत. त्यामुळे मातीची ही गुणवत्ता वरचेवर तपासली पाहिजे. त्यावर आधारित माती आणि पाण्याच्या गुणवत्तेचे व्यवस्थापन करणे शक्य होईल.
या उपक्रमात मातीमधील सूक्ष्मजीवांची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे मातीमध्ये असलेल्या सूक्ष्मजीवांचे प्रमाण समजण्यास मदत होणार आहे. ही मातीची सुपीकता मोजण्याची मोजपट्टी आहे. यावर आधारित आवश्यक खते आवश्यक प्रमाणात देता येतील. त्यामुळे विनाकारण जास्त खते जमिनीत जाऊन होणारे माती, पाण्याच्या प्रदूषणावर नियंत्रण राहील.
लोकसंख्या वाढ आणि जीवनशैलीतील बदलामुळे पाणी वापरात मोठी वाढ आहे. त्यातून सांडपाणी मोठ्या प्रमाणात तयार होते. सांडपाण्याचे शुद्धीकरण आणि त्याच्या व्यवस्थापनातून वापरण्यासाठी आणि शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होते. व्यवस्थापन कोणते ही असो आणि कशाचेही असो, त्यासाठी मोजमाप असायलाच हवे.
मनुष्यबळाचे नियोजन
ही सर्व निरीक्षणे करण्यासाठी, नमुने गोळा करण्यासाठी, पाच गावामध्ये शालेय विद्यार्थी आणि पाच गावांमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी स्वयंसेवक आणि अभ्यासक झाली आहेत. प्रत्येक गावासाठी सात गट काम करणार असून, प्रत्येक गटात किमान पाच मुले आहेत. ते गटागटाने काम करून गावाची पाण्यासंबंधी वरील प्रमाणे प्रतिनिधिक माहिती नोंदवणार आहेत.
मनुष्यबळ क्षमता विकास
नियोजनाच्या प्रत्येक विषयासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या व्यावसायिक संस्था आणि त्यांचे तज्ज्ञ मदत करत आहेत. त्यांनी ही जबाबदारी सामाजिक बांधिलकीतून घेतली असून कोणत्याही प्रकारची फी किंवा पैसे त्यांनी आकारलेले नाहीत. भूजलासाठी ‘वॉटर लॅब लिमिटेड, पुणे’ भूपृष्ठ जलासाठी ‘अर्थसाइट फाउंडेशन, पुणे’ हवामान निरीक्षणासाठी ‘सिंचन संशोधन विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि पाणी व माती परीक्षणासाठी फाउंडेशन फॉर एन्व्हायर्न्मेंट मॉनिटरिंग, बंगरूळ या संस्थेतील तज्ज्ञ मार्गदर्शन करत आहेत.
डिजिटल पाणी शाळा
या उपक्रमाची सुरुवात ऑनलाइन प्रशिक्षणाने होऊन फेब्रुवारी २०२५ पर्यंत ही ऑनलाइन व्याख्याने सुरू राहतील. त्याला आम्ही ‘डिजिटल पाणी शाळा’ असे नाव दिले आहे. विविध संस्थांच्या तज्ज्ञांबरोबरच इतरही अनेक तज्ज्ञांचे मार्गदर्शन याबाबतीत घेतले जाणार आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये पूर्ण दिवसाची एक कार्यशाळा ही पुण्यात इंद्रधनुष्य सभागृहात आयोजित केली होती. या कार्यशाळेत सर्व प्रकारची प्रात्यक्षिके मुलांना करून दाखवली आणि मुलांकडून करवून घेण्यात आली.
उपक्रमाचे नियोजन
ऑगस्ट २०२४ ते फेब्रुवारी २०२५
दर आठवड्याला डिजिटल पाणी शाळेचे आयोजन.
प्रत्यक्ष गावात निरीक्षण व कृती कार्यक्रम.
मार्च २०२५
सर्व गावनिहाय सर्व गटांचे स्पर्धात्मक मूल्यमापन.
गुणगौरव व बक्षीस वितरण
या उपक्रमाच्या नियोजनासाठी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१-पुणे मधील अकरा रोटरी क्लबने पुढाकार घेतला आहे. दीपस्तंभ ही स्वयंसेवी संस्था या उपक्रमात सहयोगी आहे. रोटरी क्लबने यासाठी निधी आणि तज्ज्ञांची उपलब्धता करून दिली आहे. दीपस्तंभ संस्थेचे अनेक स्वयंसेवक प्रकल्पाचे सर्व व्यवस्थापन बघत आहेत.
यातून काय साध्य होईल?
माझ्या गावाच्या पाण्याची सर्वांगीण स्थिती कशी असते आणि स्वयंपूर्णतेसाठी प्रत्यक्षात ती कशी असायला हवी हे गावातील युवक आणि गावकऱ्यांना समजेल. यासाठी विविध प्रकारे पाण्यासंबधित मोजमापे कशासाठी घ्यायची, कशी घ्यायची, त्याचा अन्वयार्थ कसा लावायचा हे शिकतील.
त्यातील समस्या कोणत्या आणि चांगल्या बाबी कोणत्या यांची त्यांची समज वाढवणे हा उद्देश आहे. या समस्यांवर मात करण्यासाठीच्या शास्त्रीय व तांत्रिक उपाययोजना काय असतात याचे ज्ञान लोकांना मिळेल. भविष्यात त्यावर कृती कार्यक्रम लोकांकडूनच आखला जाण्यासाठी प्रेरणा व साह्य मिळेल. जलज्ञानी समाजाच्या निर्मितीतून जलसंवर्धन आणि शाश्वत पर्यावरणाकडे वाटचाल करण्यासाठीचा हा वस्तू पाठ तयार करणे हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या उपक्रमात काय काय मोजायचे?
भूपृष्ठजलाच्या जागा, त्यांचे क्षेत्रफळ व घनफळ, त्याचे बदलत जाणारे (कमी किंवा भर पडण्याची) आकारमान.
भूजलाची पातळी नियमित मोजणे.
हवामानाचे विविध घटकांचे मापण करणे.
पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी, सांडपाणी यातील विविध (पोषक, प्रदूषणकारक) घटकांचे प्रमाण नियमित मोजणे.
मातीतील पोषक, प्रदूषणकारक घटकांचे मोजमाप करणे.
मोजमाप कसे करणार? मोजून काय करणार?
भूजल :
भूजल मोजण्यासाठी ‘भूजल’ या पेटंटेड मोबाइल ॲपचा वापर करून गावातील ५० ते १०० कूपनलिकेच्या पाण्याची पातळी दर पंधरा दिवसाला मोजावी. या माहितीची व्यवस्थित नोंद करावी. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे गणितीय मांडणी करावी. त्यातून अनुमान काढावा. यामुळे नियोजनाची दिशा व पर्याय ठरवणे सोपे जाते.
यामध्ये मुख्यत्वे भूजल वाढविण्याबरोबरच ते वाचविण्यासाठीच्या उपायांचा अभ्यास करावा. या माहितीचा वापर करून कृती कार्यक्रम ठरवावा. या माहितीचा व कृतीचा व्यापक प्रसार करणे आवश्यक आहे.
भूपृष्ठ जल :
तळी, शेततळी, बंधारा आणि जमिनीवर साठवलेले वाहते कोणतेही पाणी याचे दर महिन्याला मोजमाप करावे. यासाठी उपग्रहाने दिलेल्या फोटो व प्रतिमांचा आधार घ्यावा, त्यासाठी आवश्यक संगणक प्रणालींचा वापर करावा. या माहितीचा वापर करून पाणी साठवणे, वाचवणे आवश्यक आहे. यासाठी विविध उपाययोजनांचे नियोजन आणि कृती कार्यक्रमाची आखणी तसेच अंमलबजावणी आवश्यक ठरते.
हवामान निरीक्षण :
पिकांना पाणी देण्याचे सर्व गणित हवा आणि जमिनीतील आर्द्रतेवर (ओलावा) अवलंबून असते. बाष्पीभवनावर या आर्द्रता अवलंबून असतात. बाष्पीभवन आणि त्याचा दर अवलंबून असतो हवामानाच्या विविध घटकांवर उदा. हवेचे तपमान, वाऱ्याचा वेग. पिकाची वाढ व सुदृढता अवलंबून असते हवेतील आर्द्रतेवर. या सर्व हवामानाच्या घटकांचे मोजमाप करण्यासाठी विविध उपकरणे वापरणे आवश्यक आहे.
यासाठी तापमापक, हवेचा आर्द्रता मापक, माती आर्द्रता मापक, वातमापक, प्रकाश मापक आणि पर्जन्यमापक या उपकरणांची गरज आहे. या उपकरणाद्वारे योग्य मोजमाप घेऊन त्यानुसार अनुमान काढावे, त्यावर आधारित शास्त्रशुद्ध उपाययोजना करणे फायदेशीर ठरते. या मोजमापासाठी गावामध्ये विविध उपकरणे उपलब्ध करणे आवश्यक आहे.
पाण्याची गुणवत्ता :
पिण्याचे पाणी, सिंचनाचे पाणी, सांडपाणी तसेच माती यांचे रासायनिक भौतिक व जैविक गुणधर्म तपासणे आवश्यक आहे. गुणवत्ता तपासणीसाठी खास कीट उपलब्ध आहे. त्याचा वापर करून निरीक्षणे नोंदवणे आणि माहिती जमा करणे पुढील नियोजनासाठी उपयुक्त ठरते.
सतीश खाडे, ९८२३०३०२१८,
(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ या पुस्तकाचे लेखक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.