
Kolhapur Shaktipeeth Highway Oppose : शक्तिपीठ महामार्गावरून कोल्हापुरातील महायुतीच्या नेत्यांमध्ये दोन वेगवेगळ्या भूमिका असल्याने संभ्रम निर्माण होत आहे. आरोग्य शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शक्तिपीठ महामार्गाला विरोध केला आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून उद्योजकांची सोमवारी(ता.१०) बैठक घेत समर्थन दर्शवले. "कोल्हापूर जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार नाही. लोकसभा निवडणुकीत या महामार्गामुळे फटका बसला आहे". अशी माहिती सोमवारी सायंकाळी (ता.१०) मुश्रीफ यांनी दिली. महायुतीतीलच दोन नेत्यांच्या भूमिका वेगवगेळ्या असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात मतमतांतरे निर्माण होत आहेत. शक्तिपीठ महामार्गावरून भविष्यात मतभेद होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातून शक्तिपीठला विरोधच : हसन मुश्रीफ
शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात भूमिका कायम असेल असे म्हणत मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, "शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे हा महामार्ग जिल्ह्यातून जाणार नाही हे मी आधीच बोललो होतो. जिल्ह्यातून जाणारा मार्ग रद्द झाल्याची अधिसूचनाही मी दाखवली होती. राजेश क्षीरसागर हे शहरी भागातील आमदार आहेत. ग्रामीण जनतेचा शक्तिपीठला विरोध आहे." असे स्पष्ट मत मुश्रीफ यांनी व्यक्त केले.
"शक्तिमीठ महामार्गाचा नवा मार्ग आला आहे, त्यावरून संभ्रम निर्माण होत आहे, असे मंत्री मुश्रीफ यांना विचारले असता ते म्हणाले, "शक्तिपीठ महामार्गाचा नवा आराखडा आहे की नाही हे मला माहिती नाही. पण नवा मार्ग जेथून जातो तेथील शेतकऱ्यांचा तो मान्य असेल तर कोणी त्याला विरोध करण्याचे काही कारण नाही." असेही मुश्रीफ म्हणाले.
शक्तिपीठबाबत गैरसमज दूर करू : राजेश क्षीरसागर
"जागतिक महासत्ता बनण्याच्या दृष्टीने देशाची पावले पडत आहेत. यात राज्याचा वाटा महत्त्वाचा असणार आहे. राज्याचा विकास होण्यासाठी सरकार नवनवीन उपाययोजना राबवित आहे. चांगल्या दळणवळण सुविधा निर्माण झाल्यास औद्योगिक, आय. टी. क्षेत्रासह पर्यटन विकासालाही चालना मिळणार आहे. त्यामध्ये शक्तिपीठ महामार्ग महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. याच्या विरोधाची कारणे जाणून घेऊन संबंधितांचे गैरसमज दूर केले जातील. त्यानंतर सर्वांना विश्वासात घेऊनच हा महामार्ग केला जाईल," अशी माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.
"या महामार्गामुळे १८ तासांचा प्रवास आठ तासांवर येणार आहे. यामुळे दळणवळणात वाढ होऊन पर्यटनवाढीस चालना मिळणार आहे. याचा फायदा जिल्ह्याच्या विकासासाठीच होणार आहे. समृद्धी महामार्गाला देखील सुरुवातीला विरोध झाला. परंतु, सरकारने बाधितांना अधिक पटीने मोबदला दिल्याने हा महामार्ग झाला. या महामार्गामुळे उत्तर महाराष्ट्र व विदर्भात औद्योगिक गुंतवणूक वाढली आहे. परंतु, कोल्हापूरची भौगोलिक स्थिती पूरक असतानाही असे प्रकल्प झाले नसल्याने जिल्ह्याची पीछेहाट झाली आहे. ही बाब विचार करण्यासारखी आहे." असे क्षीरसागर म्हणाले.
दृष्टिक्षेपात शक्तिपीठ महामार्ग
नागपूर-गोवा 805 कि. मी. अंतर असून, एकूण खर्च 86 हजार 600 कोटींचा आहे. तर 12 जिल्हे, 37 तालुक्यांतील 368 गावांतील 12 हजार 889 गटांतील 27 हजार 500 एकर भूसंपादन होणार आहे. महामार्गावर 48 मोठे पूल, 28 ठिकाणी रस्ते क्रॉसिंग, 3 ठिकाणी डोंगर पोखरून बोगदे, 386 गावांतील नैसर्गिक संपत्ती नष्ट होणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.