Crop Pattern : मुख्यमंत्र्यांची तोंड पाटिलकी; शेतमालाचे भाव मातीमोल असताना शेतकऱ्यांना उपदेशाचे डोस!

दिवसेंदिवस शेती आतबट्ट्यांचा व्यवसाय होऊ लागला आहे. त्याचं कारण निसर्गाचा लहरीपणा हे तर आहेच, पण केंद्र सरकारची जाचक बंधनं आणि पायाभूत सुविधांचा अभाव त्यातली खरी मेख आहे.
Eknath Shinde New CM Maharashtra
Eknath Shinde New CM MaharashtraAgrowon

मातीचा गंध आणि सुगंध शेतीकडे, जन्मभूमीकडे खेचून आणतो, मी माझ्या जन्मभूमीत येतो तेव्हा माझे पाय आपोआप शेतीकडे वळतात, हे विधान आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं! सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात असलेलं हे शिंदे यांच्या दरे गावी २४ जानेवारी रोजी बोलत होते. निमित्त होतं दरे येथील यात्रेचं. त्यासाठी मुख्यमंत्री शिंदे गेले होते गावी. त्यांनी शेतातली कामं केली. हळद काढली, भात पेरणीचं यंत्र फिरवलं. शेतात फळ झाडांची लागवड केली, त्यामुळं त्यांची हवा भरपूर झाली. एवढंच नाहीतर शेतकऱ्यांनी कशी शेती करावी, याबद्दल उदात्त विचारही शिंदे यांनी प्रकट केले. तसं त्यांच्या स्वप्नाळू गप्पांना कसलाही ब्रेक नसतो म्हणा. म्हणून तर २०२२ च्या हिवाळी अधिवेशनात शेतकरी हेलिकॉप्टरने फिरला पाहिजे. त्यासाठी तालुक्या-तालुक्यात हेलिपॅड बनवण्याचे नियोजन आहे, असं खुद्द शिंदे म्हणाले होते. तेही छाती ठोकून. त्यामुळं शिंदेंची स्वप्नाळू विधानं ऐकून अच्छे दिन वास्तवात उतरले की काय? असं कोणलाही वाटू शकतं.

पण तसा समज करून घेण्यात अर्थ नाही. त्याचं पहिलं कारण शेतकऱ्यांनी आर्थिक उत्पन्न वाढवणाऱ्या पिकांचं उत्पादन घ्यावं, असा मोलाचा सल्ला शिंदे यांनी दिला आहे. त्यांच्या सल्ल्यात शेतकऱ्यांना काही कळत नाही, असा अविर्भाव तर आहेच. पण दुसरीकडे शेतकऱ्यांना गोड बोलून वेड्यात काढता येतं, अशी धारणाही ओघळत बाहेर येते. शेतकऱ्यांनी आर्थिक उत्पन्न वाढवणारी पिकं घेतली पाहिजेत म्हणजे काय केलं पाहिजे? तर बांबू लावला पाहिजे. रेशीम आणि सुपारीची लागवड केली पाहिजे. त्यातून शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळेल, असा शिंदेंचा शेतकऱ्यांना सल्ला आहे. बांबू, रेशीम शेती काही वाईट नाही. पण कोणताही पिकबदल करायचा असेल तर तो एकट्या शेतकऱ्याचा व्यक्तिगत निर्णय नसतो.

Eknath Shinde New CM Maharashtra
Onion Export Ban : कांदा निर्यातबंदीप्रश्नी मार्ग काढू; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

कांदा, सोयाबीन, कापूस, ऊस, तूर, हरभरा इत्यादी पिके सुध्दा नगदी पिके आहेत. आपलं उत्पन्न वाढेल म्हणूनच शेतकरी ही पिके घेतात. या नगदी पिकांची माती करणारी धोरणं सरकारनं राबविल्यामुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. सरकारने शेतकरीविरोधी निर्णय घ्यायची खोड सोडून दिली तर या पिकांपासूनही शेतकऱ्यांना फायदा होईल. ते करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याऐवजी शेतकऱ्यांना उपदेशाचे डोस पाजणं सोपं आहे. हातचं सोडून पळत्याच्या मागे जायचा सल्ला मुख्यमंत्री देत आहेत. राज्यात सोयाबीन, कापूस, कांदा या प्रमुख पिकांचा सरकारच्या धोरणांमुळे विचका झालेल्या असतानाही मुख्यमंत्री शिंदे मात्र शेतकऱ्यांना असे उपदेशाचे ढोस पाजत आहेत.

बरं शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न वाढण्याइतकी क्षमता शेतकऱ्यांमध्ये आहेच, आणि त्यांनी ते वेळोवेळी सिद्ध करून दाखवलं आहे. पण शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न वाढलं नाही पाहिजे, अशी सरकारची धोरणं आहेत, याचा मात्र शिंदेंनी सोयीस्कर विसर पाडून घेतलेला दिसतो. त्यामुळेच तर शिंदे शेतकऱ्यांना वेड्यात काढतायत? असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही.

पंतप्रधान मोदींच्या कौतुकाचे गोडवे मुख्यमंत्री गात असतात त्याच मोदी सरकारनं सध्या शेतकऱ्यांचं वाटोळं करण्याचा सपाटा लावलेला आहे .केंद्र सरकारला शेतकरी हिताचे धोरण राबवण्यासाठी भाग पाडणं गरजेचं असताना शिंदे मात्र शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न देणारी शेती करण्याचा सल्ला देत आहेत. दिवसेंदिवस शेती आतबट्ट्यांचा व्यवसाय होऊ लागला आहे. त्याचं कारण निसर्गाचा लहरीपणा हे तर आहेच, पण केंद्र सरकारची जाचक बंधनं आणि पायाभूत सुविधांचा अभाव त्यातली खरी मेख आहे. पण त्यावर ब्र न उच्चारता सातत्यानं शेतकऱ्यांना उपदेश करणं, हाच मार्ग अनेकांसारखा शिंदेंनाही सोपा वाटला. त्यामुळं त्यांचं अलीकडचं विधान शेतीबद्दल रोमॅंटिसिझम दाखवून शेतकरी आळशी असतो, या धारणेला खतपाणी घालणारा आहे.

सध्या महाराष्ट्रातील बहुतांश भाग दुष्काळाशी झुंज देतोय. मराठवाड्यात तर चारा टंचाई आणि पाणी टंचाईचं संकट जानेवारीच्या मध्यातच तोंड वासून उभं राहिलं आहे. त्यात केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणानं तेल ओतलंय. पण त्यावर सोयीस्कर मीठाची गुळणी धरून शेतकऱ्यांना मात्र हवा तो सल्ला देणं सोप्पं आहे, अशी मुख्यमंत्र्यांचीही मानसिकता दिसते. दुष्काळग्रस्त भागात मदत मिळत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. जिथं कसंबसं पाणी आहे, तिथं वीज भारनियमनाची टांगती तलवार शेतकऱ्यांवर आहेच. त्यावर मुख्यमंत्री शब्दही उच्चारत नाहीत. पण शेतकऱ्यांनी शेती कशी करावी यावर उपदेश करतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे उपदेश आणि सल्ले म्हणजे केवळ तोंड पाटिलकीच ठरते.

थोडक्यात काय तर कोणताही पिकबदल करायचा असेल तर तो एकट्या शेतकऱ्याचा व्यक्तिगत निर्णय नसतो. त्यासाठी पायाभूत सुविधा आणि धोरणात्मक पाठबळ लागतं. त्यासाठी सरकारने कंबर कसून प्रयत्न केले पाहिजेत. जेव्हा जेव्हा असे प्रयत्न झाले त्यावेळी शेतकऱ्यांनी त्या संधीचं सोनं करून दाखवलं आहे. त्यावेळी शेतकरी स्वतःहून नवीन तंत्र शिकून घेतो, त्याचा अवलंब करतो, त्याला सल्ला आणि उपदेशाची गरज लागत नाही. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com