Baramati News
Baramati News Agrowon

Baramati Model : बारामतीच्या विकासासाठी हात आखडता घेणार नाही

Ajit Pawra : राज्यात विकासाचे मॉडेल म्हणून बारामतीची ओळख आहे. भविष्यात बारामतीचा सर्वांगीण विकास करण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मनोदय आहे.

Barmati News : ‘राज्यात विकासाचे मॉडेल म्हणून बारामतीची ओळख आहे. भविष्यात बारामतीचा सर्वांगीण विकास करण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मनोदय आहे. बारामतीच्या विकासासाठी सरकार हात आखडता घेणार नाही,’’ अशी ग्वाही शनिवारी (ता.२) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

बारामतीत आयोजित ‘नमो महारोजगार’ मेळाव्याचे उद्‍घाटन झाल्यानंतर आयोजित कार्यक्रमात एकनाथ शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे, सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Baramati News
Sharad Pawar : केंद्र सरकारची कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका नाही : शरद पवार

या प्रसंगी बारामतीचे बसस्थानक, पोलिस उपमुख्यालय, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कार्यालय, पोलिस वसाहतीचे उद्‍घाटन ऑनलाइन पद्धतीने झाले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘युवकांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे, ही सरकारची भूमिका असून यात राजकारण आणू इच्छित नाही. राज्यातील युवकांना ७५ हजार नोकऱ्या देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे.

बारामती हे विकासाचे मॉडेल असून शरद पवार व अजित पवार यांचे या विकासात मोलाचे योगदान आहे. अजित पवार यांच्या हातातच तिजोरीची चावी असून, बारामतीच्या विकासासाठी सरकार हात आखडता घेणार नाही. राज्यातील सर्वच बसस्थानके आदर्श बनविणार असून बारामतीपासून त्याची सुरुवात झाली आहे.’’

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘चांगल्या कामात राजकारण होत नाही ही आपली राज्याची संस्कृती असून त्याचा प्रत्यय आज बारामतीत येत आहे. रोजगार देणारे व रोजगार हवे असणारे यांना एकत्र आणण्याचे काम सरकारने केले आहे. नागपूरला ११ हजार जणांना या मेळाव्यात नोकरी मिळाली आहे.’’

अजित पवार म्हणाले, ‘‘बारामतीतील कृषिमूल शिक्षण संस्था व माळेगाव आयटीआयमध्ये कमी कालावधीचे अभ्यासक्रम देण्यात येणार आहेत. ते केल्यानंतर रोजगाराच्या संधी मिळतील. पुणे ग्रामीण पोलिसांना जिल्हा नियोजन निधीतून ३९ वाहने दिली आहेत. राज्यात विकासाचे मॉडेल म्हणून बारामती ओळखली जावी यासाठी यापुढेही काम करत राहू,’’ अशी ग्वाही पवार यांनी दिली.

Baramati News
Ajit Pawar : विकासकामे गतीने मार्गी लावण्यासाठी पुरेसा निधी देणार

शरद पवार यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून युवकांच्या हाताला काम देण्यासाठी सरकारने पुढाकार घेतल्याबद्दल प्रशंसा केली. रोजगारासाठी सरकार जे प्रयत्न करेल त्यात आमची कायम साथ असेल, अशी ग्वाहीही दिली. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मेळाव्याची पार्श्वभूमी विशद केली. आयुक्त निधी चौधरी यांनी प्रास्ताविक केले.

‘पण गृहखाते देणार नाही...’

बारामतीतील पोलिस दलाच्या सुसज्ज इमारतींवर खूष झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी भविष्यात राज्यातील सर्वच पोलिस दलांच्या इमारती अजित पवार यांच्या मार्गदर्शनाने बांधू, असे म्हटले. ‘नंतर ते हळूच म्हणतील, की मला गृहखातेही देऊन टाका, पण असे होणार नाही, गृहखाते मिळणार नाही,’’ अशी गंमतीदार कोटीही फडणवीस यांनी केली. बारामतीच्या सरकारी कार्यालयांना ‘कार्पोरेट लूक’ असल्याची पावती देत, फडणवीसांनी सरकारी कार्यालये ही चांगलीच असावीत असे नमूद केले.

‘तिजोरीची चावी तुमच्याकडेच’

‘‘बारामतीच्या विकासासाठी हात आखडता घेणार नाही,’’ अशी ग्वाही देतानाच मुख्यमंत्री शिंदे अजित पवारांकडे बघून म्हणाले, ‘‘तिजोरीची चावी तुमच्याकडेच आहे, त्यामुळे काही अडचणच नाही.’’ यावर अजित पवारांनाही स्मित हास्य केले.

...आणि एकच जल्लोष

ज्येष्ठ नेते शरद पवार व्यासपीठावर येताच युवकांनी जोरदार जल्लोष केला. पवारांनी हात उंचावून अभिवादन केल्यानंतर तसेच ते भाषणाला उभे राहिल्यानंतर उपस्थित युवकांनी पुन्हा एकदा जोरदार जल्लोष केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com