
शिवराज सिंह चौहान
Agricultural Innovation: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भारतीय शेती सतत प्रगतीकडे वाटचाल करत आहे. त्यांच्या दूरदर्शी विचारसरणीने आणि शेतकरी कल्याणासाठी समर्पित ऐतिहासिक निर्णयांनी आपल्या शेतकरी बंधू-भगिनींना समृद्ध आणि सक्षम केले आहे. तसेच ‘विकसित भारत’ या विशाल संकल्पालाही नवीन बळ दिले आहे. आज आपले अन्नदाते केवळ देशाची अन्न सुरक्षा सुनिश्चित करत नाहीत तर जगातील अनेक देशांमध्ये अन्नधान्य निर्यात करून भारताचा गौरवदेखील वाढवत आहेत. शेती विकसित व्हावी, शेतकरी स्वावलंबी व्हावेत, प्रयोगशाळेत केलेले संशोधन योग्य वेळेत शेतापर्यंत पोचावे, या ध्येयाने आपण ‘एक राष्ट्र-एक कृषी -एक टीम’ हा मंत्र घेत राज्यांसोबत काम करत आहोत.
शेती आणि शेतकरी हा देशाच्या समृद्धीचा प्रमुख आधार आहे. आपल्या कृषी शास्त्रज्ञांनी अनेक संशोधने केली आहेत. कृषी शास्त्रज्ञ नवीन तंत्रज्ञान, प्रगत बियाणे, खते इत्यादींच्या मदतीने कमी खर्चात पीक उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्नरत आहेत. आपल्या शास्त्रज्ञांचे संशोधन प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना हवामान बदलाचे परिणाम, मातीतील पोषक तत्त्वे, खतांचे योग्य प्रमाण यासह शेतीच्या विविध पैलूंबद्दल जागरूक करणे आवश्यक आहे. यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय २९ मे ते १२ जून दरम्यान ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ सुरू करत आहे. या देशव्यापी मोहिमेद्वारे, शास्त्रज्ञांची २१७० पथके देशातील ७०० हून अधिक जिल्ह्यांमधील सुमारे ६५ हजार गावांपर्यंत पोहोचतील. या काळात सुमारे दीड कोटी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला जाईल.
पंतप्रधानांच्या यशस्वी नेतृत्वाखाली, शेतीचा विकास करणे आणि शेतकऱ्यांचे जीवन परिवर्तन करणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ हे एक कर्मकांड नाही, तर शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणण्यासाठी केलेला एक महायज्ञ आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) चे शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र (KVK), राज्यांचे कृषी विभाग, कृषी विद्यापीठे, नवोन्मेषाशी संबंधित संस्था या सर्व एकत्रितपणे ‘विकसित शेती आणि समृद्ध शेतकरी’ या ध्येयाकडे वाटचाल करतील. पंतप्रधानांच्या ‘लॅब टू लँड’ अर्थात ‘प्रयोगशाळेतून शेतापर्यंत’ या मंत्राचा वापर करून चालवण्यात येणाऱ्या या मोहिमेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे भाग्य आणि भारतीय शेतीचे चित्र आमूलाग्र बदलेल.
शास्त्रज्ञ गावोगावी जाऊन शेतकऱ्यांशी थेट संवाद साधतील आणि त्यांना प्रयोगशाळेत होणाऱ्या संशोधनाची माहिती देतील. यासोबतच शेतकऱ्यांच्या अनुभवातून बोध घेऊन कृषी संशोधन व्यावहारिक करण्याचे प्रयत्न केले जातील. आमच्या ‘विकसित कृषी संकल्प अभियाना’च्या प्रयत्नांनी आणि शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमाने, जर एका हेक्टरमध्ये एक क्विंटलनेही उत्पादन वाढले, तर देशभरात २० टनांनी अन्नधान्य उत्पादन वाढविण्यात आपण यशस्वी होऊ.
शेती ही भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि सुमारे ५० टक्के लोकसंख्या प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे त्यावर अवलंबून आहे. हे क्षेत्र स्थूल राष्ट्रीय उत्पादनात (GDP) सुमारे १८ टक्के योगदान देते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत वेगाने विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, ज्यामध्ये विकसित शेती आणि समृद्ध शेतकऱ्यांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. गेल्या ११ वर्षांत, शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी, सरकारने बियाण्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत घेतलेल्या प्रत्येक निर्णयामुळे शेतकऱ्यांसाठी शेती करणे अधिक सोपे झाले आहे. किमान आधारभूत किमतीने खरेदी, कांदा आणि तांदळावरील निर्यात शुल्क रद्द करणे, हवामान अनुकूल आणि उच्च उत्पादन देणाऱ्या पिकांच्या जातींचा विकास करणे यासारख्या अलीकडील निर्णयांपासून ते शेतकऱ्यांच्या हिताच्या योजनांचा विस्तार करण्यापर्यंत, शेतकरी कल्याण हे नेहमीच मोदी सरकारचे प्राधान्य राहिले आहे.
पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली, भारताने अलीकडेच जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याकडे झेप घेतली आहे. कृषी उत्पादनात ऐतिहासिक वाढ झाली आहे. अन्नधान्याचे उत्पादन २०२४-२५ मध्ये ३३०९ लाख टनांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. खरीप हंगामातील उत्पादनात तांदूळ १२०६ लाख टन, गहू ११५४ लाख टन आणि सोयाबीन १५१ लाख टनांसह विक्रमी पातळीवर आहे. सोयाबीनची उत्पादकता प्रति हेक्टर ९८५ किलोवरून ११६९ किलो झाली आहे. फलोत्पादन क्षेत्रातील उत्पादनही ३६२१ लाख टनांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. या कामगिरीवरून दिसून येते की आपल्या शेतकऱ्यांचे कठोर परिश्रम, शास्त्रज्ञांची संशोधन क्षमता आणि मोदी सरकारची शेतकरी कल्याणकारी धोरणे कृषी क्षेत्राला सतत प्रगतीच्या नवीन उंचीवर घेऊन जात आहेत.
व्यापक दृष्टिकोन, समावेशक विचारसरणी, स्पष्ट धोरण आणि चांगल्या हेतूंसह, केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी, त्यांच्या कष्टाचे योग्य मूल्य मिळावे यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी सहा कलमी धोरण तयार केले आहे. उत्पादन वाढविण्यासाठी, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी, उत्पादनाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी, नैसर्गिक आपत्तींमध्ये योग्य प्रमाणात मदत देण्यासाठी, शेतीमध्ये विविधता आणण्यासाठी आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय लक्षपूर्वक काम करत आहे.
‘विकसित कृषी संकल्प अभियान’ हे शेतकऱ्यांचे जीवन सुधारण्यासाठी तयार केलेले एक उत्तम अभियान आहे. मी माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींना आवाहन करतो की तुम्ही सर्वांनी या महामोहिमेत सामील व्हावे आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, तसेच अभियानाअंतर्गत शास्त्रज्ञांनी दिलेल्या सल्ल्याचे पालन करून शेतीमध्ये सुधारणा करावी. उत्पादन वाढवणे, खर्च कमी करणे आणि शेतकऱ्यांना फायदा मिळवून देणे या उद्देशाने विकसित केलेले हे धोरण म्हणजे कृषी महायज्ञ आहे. भावी काळात हाच महायज्ञ विकसित भारतासाठी आधारभूत ठरेल.
(लेखक केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामविकास मंत्री आहेत)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.