Satara News : सातारा जिल्ह्याच्या अनेक भागात मॉन्सूनपूर्व तसेच मॉन्सून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मात्र टंचाई भागात अपेक्षित पाऊस नसल्याने पाणी टंचाई कायम आहे. जिल्ह्यातील आजही १६० गावे आणि ४८६ वाड्या-वस्त्यांवर १६० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
सातारा जिल्ह्याच्या पूर्व दुष्काळी तालुक्यासह पश्चिमेकडील तालुक्यांना टंचाईच्या झळा सोसाव्या लागल्या आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी सुरू असलेल्या टँकर भागात पाऊस न झाल्याने टंचाई कमी होऊ शकलेली नाही. जिल्ह्यातील सुमारे २० टक्के गावे आजही टँकरच्या पाण्यावर विसंबून आहेत. जिल्ह्यातील आजही १६० गावे ४८६ वाड्या-वस्त्यांवरील दोन लाख ४४ हजार ८९१ लोकांना १६० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये माण तालुक्यात सर्वाधिक ७६ टँकरद्वारे ५० गावे ३४ वाड्या-वस्त्यांवर पाणीपुरवठा केला जात आहे. यानंतर
कोरेगाव तालुक्यात २५ टँकरद्वारे ३३ गावांना, फलटण तालुक्यात २४ टँकरद्वारे ३३ गावे १०० वाड्या-वस्त्यांवर, खटाव तालुक्यात २३ टँकरद्वारे २९ गावे ४० वाड्या-वस्त्यांवर, वाई तालुक्यात सात टँकरद्वारे सात गावे व सात वाड्या-वस्त्यांवर, कऱ्हाड तालुक्यात चार टँकरद्वारे सात गावात, खंडाळा तालुक्यात एका टँकरद्वारे दोन गावांत पाणीपुरवठा केला जात आहे. संरक्षित पाण्यासाठी ५६ विहिरी ३३ बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
काही ठिकाणी टँकर बंद
टंचाई भागात पावसामुळे पाणीटंचाई कमी झाल्याने काही ठिकाणी टँकर बंद करण्यात आले आहे. सोमवारी २०८ टँकर सुरू होते, मंगळवारी यामध्ये घट होऊन टँकरची संख्या १६० वर आली आहे. पाटण तालुक्यात दमदार पावसामुळे या तालुक्यातील टँकर बंद केल्याने सध्या जिल्ह्यातील सात तालुक्यात टँकर सुरू आहेत. टंचाई भाग अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. धरणातील पाणीपातळीत फारसा बदल झाला नसून जैसे थे परिस्थिती आहे. सध्या सर्व प्रमुख धरणात अवघा उपयुक्त १५.४४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.