
Nagpur News : ‘लाडक्या बहिणी’ला १५०० रुपये देणारे सरकार मात्र शेतकऱ्यांना सावत्र समजत त्यायच्या शेतीमालाला भाव देत नाही ! यंदाही आमचे सोयाबीन हमीभावापेक्षा कमी भावानं ईकल्या गेलं.
४८९२ रुपयाचा हमीभाव अन् आमच्या सोयाबीनला ३९१० रुपये कमी भाव मिळाला. सरकारले आमच्या श्रमाचं मोलचं नाई हे सांगतात सोयाबीन विक्रीसाठी बाजार समितीत आलेल्या ६५ वर्षाच्या निळाबाई तुळशीराम गराटे यांचे डोळे पाणावले होते.
उमरेड येथील जोगीठाणा पेठेतील रहिवासी असलेल्या निळाबाईंची धुरखेडा शिवारात पाच एकर शेती आहे. या पाच एकरांतून त्यांना अवघी दहा पोती सोयाबीनची उत्पादकता झाली. बाजारात हे सोयाबीन विक्रीसाठी आणल्यानंतर त्याला ४८९२ रुपयांचा हमीभाव देखील मिळाला नाही. लिलावाच्या माध्यमातून ३९१० रुपयांनी निळाबाईचे सोयाबीन खरेदी करण्यात आले.
या अल्प दरातून उत्पादकता खर्चाची भरपाई झाली नाही. येणाऱ्या हंगामासाठी लागणाऱ्या पैशाची सोय करणे, देणीदाराची देणी चुकती करणे, त्यासोबतच वर्षभराच्या गरजा भागविण्यासाठी लागणारा पैसा उभारणे अशी अनेक आव्हाने आहेत. परंतु सरकारच्या लेखी शेतकरी सावत्र असल्याने त्याच्या समस्यांशी सरकारला काईच देणेघेणे नाही, अशी खंत निळाबाईंनी पाणावलेल्या डोळ्यांनी व्यक्त केली.
सोयाबीन विकायला आणला जी, माह्या सोयाबीनले भावच नाही ! सरकारनं आमच्या सोयाबीनले प्रति क्विंटल ५००० रुपये भाव द्यावा, अशी रास्त मागणी निळाबाईंनी बोलतांना केली. उमरेड बाजार समितीतच मालेवाडा येथील ज्येष्ठ शेतकरी भगवान लहानू नेवारे तथा कारगावचे शेतकरी रामू बुधाजी नान्हे यांनी देखील त्यांचे सोयाबीन विक्रीसाठी आणले होते.
त्यांनी देखील दर दबावात असल्याने सोयाबीनची खरेदी हमीभावापेक्षा ७०० ते ८०० रुपये कमी दराने होत असल्याचे सांगितले. लाडक्या बहिणींचा विचार करणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांना सावत्र न समजता त्यांच्या शेतीमालाला अपेक्षित दर कसा मिळेल याची काळजी करावी, अशी अपेक्षा या शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.