Soybean Seed Production : विश्‍वासार्हता, पारदर्शकता जपलेला ‘डेक्कन फार्मस’ बियाणे ब्रॅण्ड

Seed Production : शेतकऱ्यांचा विश्‍वास संपादन करून वाणेवाडी (जि. धाराशिव) येथील डेक्कन फार्मर्स ॲग्रो प्रोड्यूसर कंपनीने सोयाबीन बीजोत्पादनातून दमदार वाटचाल केली आहे.
Soybean Seed Production
Soybean Seed ProductionAgrowon
Published on
Updated on

सुदर्शन सुतार

Deccan Farmers Agro Producer Company : शेतकऱ्यांचा विश्‍वास संपादन करून वाणेवाडी (जि. धाराशिव) येथील डेक्कन फार्मर्स ॲग्रो प्रोड्यूसर कंपनीने सोयाबीन बीजोत्पादनातून दमदार वाटचाल केली आहे. पारदर्शक कारभार, नावीन्यपूर्ण उपक्रम राबवीत सोयाबीन बीजोत्पादन व त्याचा खात्रीशीर ‘ब्रॅण्ड’ तयार करून उल्लेखनीय विक्रीतून स्वतःची ओळख तयार करण्यास सुरुवात केली आहे.

सोलापूर- धुळे महामार्गावर येडशीनजीक चोराखळी शिवारात धाराशिव साखर कारखान्याच्या पाठीमागे वाणेवाडी (ता. कळंब) येथे डेक्कन फार्मर्स ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी कार्यरत आहे. कंपनीचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण शेळके यांनी आपल्याच शेतात ती उभारली आहे. त्यांचे वडील शंकर शेतीच करतात. त्यांची १४ एकर शेती आहे. त्यातील तीन एकरांत कंपनी आहे. सन २०१३ मध्ये कृषी पदविकेपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर प्रवीण यांनी लातूर येथे सोयाबीन बीजोत्पादन आणि तेल निर्मितीतील खासगी कंपनीत नोकरी सुरु केली. चार-पाच वर्षे कामाचा अनुभव घेतला. दरम्यान, कृषी पदवीही पूर्ण केली.

कंपनीची वाटचाल

गाव परिसरात सोयाबीनचे उत्पादन सर्वाधिक होते. त्यामुळे शेतकरी कंपनी स्थापन करून बीजोत्पादनाद्वारे बियाणे ब्रॅण्ड तयार करायचा असा विचार प्रवीण यांनी केला. काम कठीण होते. पण धाडसाने पुढे पाऊल टाकले. तानाजी भोसले, रविकांत तिडके यांच्यासह दहा जणांचे संचालक मंडळ तयार केले. गावातील समवयस्क आणि उद्योगासाठी साह्य करू शकणाऱ्या व्यक्तींना एकत्र करण्यास सुरुवात केली. अडचणींना तोंड देत २०२० मध्ये कंपनीची नोंदणी झाली.

‘डेक्कन फार्मस’ ब्रॅण्ड

वाणेवाडी परिसर दख्खन पठारात येतो. त्यामुळे शेतकरी कंपनीला दख्खन नाव द्यायचे ठरले. पण तांत्रिक अडचणींमुळे नामकरण डेक्कन फार्मस ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी असे झाले. बियाण्याचा
डेक्कन फार्मस हा ब्रॅण्ड आकाराला आला. वाणेवाडीसह परिसरातील ४२ गावांतील ३५० शेतकरी कंपनीचे सभासद झाले. धाराशिवसह लातूर, बीड, सोलापूर जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र निश्‍चित केले. त्यातून १९० गावांमध्ये काम सुरू आहे. बारा कर्मचाऱ्यांना रोजगारही दिला आहे.

Soybean Seed Production
Soybean Seed Production : सोयाबीन ग्रामबीजोत्पादनासाठी घरचे बियाणे मोहीम

पहिल्याच वर्षी दमदार खरेदी

कंपनीने २०१९-२० मध्ये सोयाबीन खरेदी-विक्रीत काम सुरू केले. लातूरच्या कंपनीशी करार केला. पहिल्याच वर्षी ४९५१ टन खरेदी झाली. प्रमुख बाजारपेठांप्रमाणे दर दिला. तीनच दिवसांत शेतकऱ्यांना पेमेंटही केले. शेतकऱ्यांनीही प्रतिसाद दिला. संचालकांचा उत्साह वाढला. सन २०२०-२०२१ मध्ये सुमारे ३४८५ टन खरेदी झाली.

बीजोत्पादनात पाऊल

खरेदी-विक्रीतील अनुभवाच्या जोरावर कंपनी बीजोत्पादन क्षेत्रात उतरली. कृषी विद्यापीठांकडील सात वाण निवडून त्यांच्या बियाण्यांचा पुरवठा सभासदांना केला. सन २०२१ मध्ये १२८३ एकर क्षेत्रावर २४७ शेतकरी व २०२२ मध्ये ३६५० एकर क्षेत्रावर १२६३
शेतकऱ्यांकडे बीजोत्पादन कार्यक्रम राबविला. यंदा २६३० एकरांवर ९४९ शेतकऱ्यांकडे बीजोत्पादन घेतले आहे.

Soybean Seed Production
Soybean Village Seed Production : हिंगोलीत अडीच लाख हेक्टरवर सोयाबीन ग्रामबीजोत्पादनाचे नियोजन

बियाणे विक्री

-पहिले वर्ष- १४७१ क्विंटल
-दुसरे वर्ष- ३२५० क्विंटल
-कंपनी कार्यक्षेत्रातील चार जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा १०० रुपये प्रति बॅग कमी दराने विक्री.
--कंपनीचे प्रति दिन ५० टन क्षमतेचे ‘क्लीनिंग, ग्रेडिंग युनिट’. अद्ययावत सामग्रीसह प्रयोगशाळा व ८० टन वजनाचा ‘इलेक्ट्रॉनिक्स’ वजनकाटा.

‘जिओ टॅगिंग’द्वारे नोंदी

कंपनीचे अध्यक्ष शेळके म्हणाले, की सभासदांना बीजोत्पादन व्यवस्थापनाच्या अनुषंगाने सर्व तांत्रिक मार्गदर्शन प्रत्यक्ष शेतात जाऊन केले जाते. तीन-चार वेळा कंपनीचे प्रतिनिधी शेतांना भेटी देतात. आमचे बीजोत्पादक, त्यांच्या बियाण्यांची गुणवत्ता, विश्‍वासार्हता या बाबींसाठी जिओ टॅगिंगची सुविधा सुरू केली आहे. बीजोत्पादनात अशी सुविधा देणारे राज्यात कदाचित आम्हीच पहिले असू. सर्व ‘प्लॉट्‍स’च्या नोंदी जिओ टॅगिंगनुसार घेतल्या जातात. त्यासाठी ‘ॲप्लिकेशन’चा वापर होतो. त्यात शेतकरी व शेताची आवश्‍यक माहिती समाविष्ट केली आहे.

बीजोत्पादनात राबवलेल्या स्तुत्य बाबी

-बियाण्यातील ओलावा, माती वा खराब या प्रकाराची तूट किंवा कटती दरातून केली जात नाही.
-सभासदांना सोयाबीन आणण्यासाठी कंपनीचे वाहन पुरवले जाते. डिझेलचा खर्च शेतकऱ्यांकडे असतो. गतो.
-कोणत्या शेतकऱ्याला कोणत्या वाणाचे बियाणे पुरवले आहे? त्याचा लॉट क्रमांक आदी नोंदींनुसार
शासकीय प्रयोगशाळेत बियाणे परीक्षणासाठी नमुना पाठवला जातो. कंपनी स्तरावर खासगी प्रयोगशाळा व अन्य अशी एकूण तीन-चार वेळा उगवण चाचणी होते. त्यातून बियाण्याच्या गुणवत्तेबाबत कंपनीचा आत्मविश्‍वास वाढतो.
- ‘गूडसीड’- ‘पाससीड’ धोरणानुसार बियाणे शासकीय प्रयोगशाळेच्या चाचणीत ७० टक्क्यापर्यंत उगवणशक्तीला पात्र ठरले तर शेतकऱ्याला अतिरिक्त ३०० रुपये प्रति क्विंटल दर. उर्वरित सोयाबीन तेल उद्योगाला पाठवले जाते. त्यास १०० रुपये प्रति क्विंटल जास्त दर.
-२० हजार टन क्षमतेचे गोदाम. नोव्हेंबरपासून ते ३१ मेपर्यंत त्यात साठवणूक. या कालावधीत दररोजचा दर सभासदांना कळवला जातो.

सामाजिक जाणीव

सभासदांशी केवळ व्यावसायिक नाते न ठेवता आपल्याच कुटुंबातील ते भाग आहेत ही जाणीव दृढ होण्यासाठी कंपनीने शिवसंकल्प ट्रस्ट स्थापन केला आहे. सभासदांना रुग्णवाहिका आणि मुलांसाठी करिअर गायडन्स, मिळालेल्या यशाबद्दल सत्कार असे उपक्रम राबविले जातात.

संपर्क ः प्रवीण शेळके, ९८०९५६१००१
(‘चेअरमन’, ‘डेक्कन फार्मस’)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com