Pune News : ‘‘शिरूर तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घालून शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांसह अनेक नागरिकांवर हल्ला केला. संरक्षणाच्या दृष्टीने शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज मिळावी, यासाठी अनेकवेळा अधिवेशनात आवाज उठवला गेला.
आता बिबट प्रवण क्षेत्रात शेतकरी व नागरिकांना दिवसा वीज मिळणार आहे. निमोणे येथून याची सुरवात केली आहे,’’ अशी माहिती शिरूर- हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी दिली.
पवार म्हणाले, शिरूर शहराचा विविध विकासकामांद्वारे झपाट्याने कायापालट करण्याचे ध्येय आहे. शिरूर शहरात टेरेसवर वीजवाहक तारेला हात लागून मृत्यूच्या घटना घडल्या. ‘महावितरण’च्या जुन्या वीज वाहक तारा बदलून त्याजागी बंच केबल टाकण्याचे काम सुरू केले आहे.
या पुढील काळात घराजवळून, टेरेसवरून जाणाऱ्या वीज वाहक तारांपासून कुठलाही धोका होणार नाही. निर्वी व चिंचणी असे दोन नवीन फिडर कार्यान्वित केले. त्या भागात दिवसा वीज देण्यास अडचण येणार नाही. वडगाव रायसाई येथे फीडरला एअर बंद केबल टाकण्याचे काम सुरू आहे.’’
‘महावितरण’चे कार्यकारी अभियंता सुमीत जाधव उपस्थित होते. सरदवाडीमधील धोकादायक स्पीड बेकर हटवण्याची नागरिकांची मागणी होती. गतिरोधकामुळे रोज अनेक अपघात होत आहेत. त्यामुळे मोठ्या झिक झॅक गतिरोधक टाकण्याच्या सूचना बांधकाम अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
अॅल्युमिनियमची तार वापरणार
शिरूर तालुक्यात विद्यूत रोहित्राच्या वारंवार चोऱ्या वाढल्यामुळे ११ केव्हीचे रोहित्र बसवण्याची सरकारकडे मागणी केली आहे. रोहित्रामध्ये तांब्याच्या तारेऐवजी अॅल्युमिनियमची तार वापरावी, अशा सूचना दिल्या आहेत. याची सुरवात निमोणे येथून झाली आहे. रोहित्र चोरी करून त्याच्या तारा जो व्यावसायिक घेत असेल, त्याच्यावरही गंभीर गुन्हा दाखल करावा, अशा सूचना महावितरण व पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या.
अधिवेशनात निर्णय
‘‘शिरूर तालुक्यातील अनेक भाग बिबट प्रमाण क्षेत्रात येत आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळेस शेतीला पाणी देताना तसेच रात्री प्रवास करणाऱ्या मोटर सायकलस्वारांवरही बिबट्याने जीवघेणे हल्ले केले आहेत. त्यामुळे पाणी देण्यासाठी दिवसा वीज देण्याची मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली होती. यंदाचा अधिवेशनात दिवसा वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,’’ असे पवार म्हणाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.