Nagar News : गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाचा तडाखा बसला. पावसाने काढणीला आलेल्या गहू (Wheat), ज्वारीसह आंबा व इतर फळपिकांचे (Fruit Orchard Damage) नुकसान झाले.
आधीच कांद्याला दर (onion Rate) नाही. त्यात आता अवकाळी पावसाने इतर पिकांनाही फटका बसला असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. काही भागांत अल्प प्रमाणात गाराही पडल्या. या पावसामुळे काढणीला आलेला गहू, ज्वारीचे नुकसान झाले. वादळाने आंब्याचा मोहर गळाला. कैऱ्यांचीही गळती झाली.
पाथर्डी, नगर, संगमनेर, अकोले, कर्जत, श्रीरामपूर, राहुरी भागांत पावसाचा जोर अधिक होता. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकूर व बिरेवाडी परिसरात रविवारी (ता. ५) रात्री आठच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची त्रेधा उडाली. दिवसा कडक ऊन आणि रात्री थंडी असे सध्या वातावरण आहे.
दरम्यान, दोन दिवसांपासून पावसाला पूरक असे वातावरण होते. रविवारी रात्री आठच्या सुमारास साकूर परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे अर्धा तास झालेल्या पावसाने सोंगणी केलेला गहू, कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली.
राहुरी तालुक्यातील पूर्व भागात अवकाळी पावसाने रब्बीची पिके अक्षरशः जमीनदोस्त झाली. मांजरी, वांजुळपोई कोपरे शेणवडगाव, पाथरे तिळापूर वळण मानोरी आदी गावांत सोमवारी (ता.६) रात्री वादळ वाऱ्यासहित आलेल्या पावसाने गहू, हरभरा आदी पिके भुईसपाट झाली.
या भागात काही दिवसांपूर्वी गव्हाच्या सोंगण्या सुरू झाल्या होत्या. तर काही सोंगण्या सुरू असताना अवकाळी पावसाचा कहर झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
५० मंडलांत पाऊस
प्रशासनाकडे झालेल्या नोंदीनुसार मंगळवारी (ता. ७) सकाळी आठवाजेपर्यंत जवळपास ४० महसूल मंडलांमध्ये पाऊस झाला. तर बुधवारी (ता. ८) सकाळी आठवाजेपर्यंत झालेल्या नोंदीनुसार ५० महसूल मंडलांमध्ये पाऊस झाला.
सर्वाधिक पाऊस अकोले तालुक्यात झाल्याचे दिसत आहे. इतर भागांत अल्प पाऊस असला तरी वादळामुळे पिकांचे नुकसान झाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.