Jalgaon News : खानदेशात मागील पाच दिवसांपासून वादळी पाऊस, हलकी गारपीट (Hailstorm), अशी स्थिती असून, त्यात या कालावधीत सुमारे तीन हजार हेक्टरवरील पिकांची हानी (Crop Damage) झाली आहे.
गुरुवारपासून (ता. ६) वादळी पाऊस येत आहे. गारपीट अधिक झालेली नाही. परंतु अनेक भागांत हरभऱ्याच्या आकाराच्या गारा काही सेकंद पडल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात जामनेर, मुक्ताईनगर, अमळनेर, धुळ्यात धुळे, साक्री, शिरपूर, नंदुरबारात नवापूर, नंदुरबार भागात नुकसान झाले आहे.
सर्वाधिक नुकसान धुळे जिल्ह्यात झाले असून, तेथे सुमारे १८०० हेक्टरला मागील पाच दिवसांत पाऊस व वादळाने कमी अधिक फटका बसला आहे. कांदा, मका, भाजीपाला पिकांची अधिकची नासाडी झाली आहे. जळगावात जामनेर तालुक्यात अधिकचे नुकसान झाले आहे.
जळगाव जिल्ह्यात सुमारे ६५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर नंदुरबारातही सुमारे ५०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. ही आकडेवारी वाढतच आहे.
प्रशासनाने रविवारपर्यंत (ता. ९) झालेल्या नुकसानीची माहिती सादर केली आहे. तसेच सोमवारी (ता. १०) अनेक भागांत पाऊस व हलकी गारपीट झाली आहे. प्रशासनाला रोज पंचनामे व माहिती सादर करावी लागत आहे.
यामुळे अंतिम माहिती समोर आलेली नाही. सोमवार व मंगळवारच्या नुकसानीची माहिती बुधवारी (ता. १२) सादर होईल, अशी माहिती मिळाली.
केळी व पपईच्या दरांना फटका
वादळी पाऊस, वातावरणातील बदल व इतर समस्यांमुळे केळी व पपईच्या दरांवर दबाव आला आहे. पपईचे दर किमान सात व कमाल साडेआठ रुपये प्रतिकिलो, असे आहेत. केळी दरातही मागील पाच ते सहा दिवसात घट झाली असून, कमाल दर २३०० रुपये प्रतिक्विंटल, असे स्थानिक बाजारात आहेत. किमान दरही १६०० ते १७०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत.
कलिंगड, खरबुजाची काढणी रखडत आहे. कलिंगडासही कमाल आठ रुपये प्रतिकिलोचा दर सांगितला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मळणी, काढणीची कामे ठप्प झाली आहेत. मजूरटंचाई आहे. नुकसान सुरूच आहे. यामुळे मोठी वित्तीय हानी होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.