Akola News : अकोला जिल्ह्यात सात ते नऊ एप्रिलदरम्यान झालेल्या अवकाळीमुळे सुमारे १६ कोटी ५५ लाख रुपयांचे नुकसान (Crop Damage) झाले आहे. याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे.
जिल्ह्यात एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. वादळी वारा, अवकाळी पाऊस तसेच गारपीट झाल्याने पिकांचे व फळबागांचे नुकसान झाले होते.
या नुकसानीचा तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांमार्फत पंचनामासुद्धा करण्यात आला. यानुसार अवकाळीमुळे ७०७ गावात १५ हजार ३७१ शेतकऱ्यांचे ९ हजार २६८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. हे नुकसान सुमारे १६ कोटी ५५ लाख ७ हजार ८०० रुपयांचे झाले होते.
या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निकषानुसार मदत मिळावी यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला. जिल्ह्यातील अकोला, बार्शीटाकळी, पातूर, बाळापूर व मूर्तिजापूर या तालुक्यांतील शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते.
टरबूज, गहू, हरभरा, पपई, केळी, लिंबू, आंबा, संत्रा, भाजीपाला, कांदा, मूग, मका अशा विविध पिकांचे नुकसान झालेले आहे. यात सर्वाधिक तीन हजार ५५ हेक्टरवरील पिकांचे बाळापूर तालुक्यात नुकसान झाले.
अकोल्यात दोन हजार ८५, पातूर २००२, बार्शीटाकळी १७८८ व मूर्तिजापूरमध्ये ३३७ हेक्टरचे नुकसान झालेले आहे. जिल्ह्यात अवकाळीने झालेल्या नुकसानाच्या पाहणीसाठी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी भेट देऊन पाहणी केली होती.
त्यांनी यंत्रणांना तातडीने पंचनामे करून अहवाल देण्याबाबत सूचना केली होती. त्यानुसार हा एकत्रित अहवाल तयार करून शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
आपत्तीचे हंगाम...
यंदाच्या वर्षात खरीप, रब्बी तसेच आता उन्हाळी हंगामाला पावसाने सर्वाधिक फटका दिला. परतीच्या पावसाने खरिपातील पिकांचे नुकसान केले. त्यामुळे उत्पादकता घटली होती. रब्बीतही पिकांना अवकाळी पावसाने झोडपले.
आता ही पिके काढणीला आलेली असतानाचा अवकाळी पाऊस, गारपीट झाली होती. शिवाय उन्हाळी पिकांनाही बाधा झाली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.