Crop Damage In Solapur : वादळी पावसाने उभी पिके जमीनदोस्त

महिनाभरापूर्वीच अवकाळी व गारपिटीमुळे सोलापूर जिल्ह्यातील विविध भागातील शेती मालाचे मोठे नुकसान झाले.
Grape Crop Damage
Grape Crop DamageAgrowon
Published on
Updated on

सोलापूर : महिनाभरापूर्वीच अवकाळी व गारपिटीमुळे (Hailstorm) सोलापूर जिल्ह्यातील विविध भागातील शेती मालाचे मोठे नुकसान झाले.

यातून शेतकरी सावरतोय तोच जिल्ह्यातील विविध भागात शुक्रवारी रात्रीपासून व शनिवारी सकाळी व सायंकाळच्या सुमारास वादळी वारे व अवकाळी पावसामुळे शेतातील उभी पिके व जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट ओढावले आहे.

बार्शीसह तालुक्यात द्राक्षबागेचे १० लाखांचे नुकसान

बार्शी : नुकत्याच झालेल्या गारपिटीच्या नुकसानीनंतर शेतकरी सावरत असतानाच शुक्रवारी (ता. ७) रात्री अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्याने शेलगाव व्हळे येथील देविदास विठोबा शिंदे यांची गट नं. ७२/२ मधील दोन एकर द्राक्षबाग भुईसपाट झाली आहे.

विक्रीसाठी तयार झालेले २५ टन द्राक्षाचे नुकसान झाले असून, तहसीलदार सुनील शेरखाने यांनी भेट देऊन पंचनामा केला. बार्शी शहरासह तालुक्यात शुक्रवारी रात्री वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाने हजेरी लावली.

बळिराजाच्या हातातोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा निसर्गाने हिरावून घेतला असून, सरसकट पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरत आहे.

द्राक्ष बागांसह ज्वारी, हरभरा, गहू या शेतातील पिकांचे पुन्हा नुकसान झाले असून, कृषी सहायक, तलाठी, ग्रामसेवक यांच्यामार्फत नुकसानीचे पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

Grape Crop Damage
Crop Damage In Nashik : गारपीटने केला कहर; शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला

हिंगणी येथे वीज पडून दोन म्हशी मृत्युमुखी

वैराग : महिनाभरापूर्वीच झालेल्या अवकाळी पावसामुळे वैराग भागातील द्राक्ष बागांसह इतर पिकांचे नुकसान झाले होते. शनिवारी (ता. ८) दुपारी वादळी वारे व अवकाळी पावसाने हिंगणी (आर) येथील एक एकर द्राक्षबाग जमीनदोस्त झाली असून, हत्तीज येथे वीज पडून दोन म्हशींचा मृत्यू झाला आहे.

शनिवारी सकाळी आठच्या सुमारास वैराग, मुंगशी, दहिटणे, राळेरास आदी भागात जोराचा पाऊस झाला. तसेच दुपारी चारच्या सुमारास देखील वैराग भागात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे हिंगणी (आर) येथील मारुती बाबू बनसोडे या शेतकऱ्याची एक एकर द्राक्षबाग मालासह भुईसपाट झाली.

यात शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तर हत्तीज येथील संजय हरिश्चंद्र जाधव यांच्या हत्तीज- जळगाव रोडवर असणाऱ्या शेतात बांधलेल्या दोन म्हशी अंगावर वीज पडल्याने मृत्युमुखी पडल्या. अवकाळी पावसामुळे दाक्षबाग, टरबूज, खरबूज यांचेही नुकसान होत आहे. ज्वारीबरोबर कडब्याचेही नुकसान होत आहे.

मोहोळ तालुक्यात वीज पडून चार जनावरांचा मृत्यू

मोहोळ : शहरासह तालुक्यात शनिवारी (ता. ८) सकाळी सात ते आठच्या दरम्यान विजांच्या प्रचंड कडकडाटासह झालेल्या अवकाळी पावसामध्ये तालुक्यातील नजीक पिंपरी व अर्धनारी येथे वीज कोसळून एक म्हैस, दोन रेडके तर एका गाभण गाईचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

शनिवारी सकाळी सात ते आठच्या दरम्यान आकाशात जमलेल्या काळेकुट्ट ढगांसह विजांच्या प्रचंड कडकडाटाने अवकाळी पावसाचा जोरदार सडाका झाला. विजांच्या प्रचंड कडकडाटाने अक्षरशः भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी नजीक पिंपरी येथे सकाळी आठच्या दरम्यान क्षीरसागर वस्ती येथे वीज कोसळली व अभिमान कृष्णा क्षीरसागर यांच्या आंब्याच्या झाडाखाली बांधलेली म्हैस व दोन रेडक्यांचा मृत्यू झाला. तर अर्धनारी येथे परमेश्वर वसंत कोळी यांच्या वस्तीवर वीज कोसळून गाभण गाय मृत्युमुखी पडली. दोन्ही ठिकाणी घटनास्थळी तलाठी यांनी भेट देऊन पंचनामे केले आहेत.

Grape Crop Damage
Sugarcane Crop Management : कागलच्या अमोल खोत यांचे पाच एकरातील ऊसशेतीचे नियोजन

नातेपुते परिसरात विजांच्या कडकडाटात पाऊस

नातेपुते : आज (शनिवारी) दिवसभर कडक ऊन होते. जीवाची लाही- लाही होत होती. मात्र, रात्री पावणेआठ वाजता नातेपुते शहरात व परिसरात विजांच्या कडकडात पावसाला सुरवात झाली. पावसापेक्षा विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात सुरू होती.

रात्री साडेआठनंतर पाऊस थांबला. काढणीस आलेल्या उभ्या पिकांना व आंबा पिकाला या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसणार आहे. अर्धा तास वीजपुरवठा खंडित झाला होता. इस्लामपूर येथे नारळाच्या झाडावर वीज पडली मात्र कोणतीही जीवित झाली नाही.

या परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता. शिंदेवाडी, देशमुख वाडी येथे व परिसरात रात्री आठ वाजता दहा-पंधरा मिनिटे गारांचा सडाका झाला. या भागातील विद्युत पुरवठाही खंडित झाला होता.

मळेगाव परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस

मळेगाव : बार्शी तालुक्यातील मळेगाव परिसरात शनिवारी सकाळी नऊ वाजता व रात्री आठ वाजता वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. अवकाळी पावसाचा विक्रीला आलेली द्राक्ष, ज्वारी, हरभरा व आंबा पिकाला मोठा फटका बसला आहे.

शेतमालाचे पडलेले दर, व्यापाऱ्यांनी शेतमाल खरेदी करण्यासाठी फिरवलेली पाठ अन्‌ त्यात अवकाळीरूपी अस्मानी व सुलतानी संकट यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.

शेतकऱ्यांनी मोत्यासारखी पिकवलेली ज्वारी, सोन्यासारखी पिकवलेली द्राक्ष मातीमोल होण्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना हवेत गारवा निर्माण झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com