Team Agrowon
सटाणा, मालेगाव तालुक्यांत शनिवारी (ता.८) दुपारी साडेतीननंतर वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. तसेच गारपिटीने दाणादाण उडविली. ऐन सुगीच्या दिवसांत पुन्हा शेतकऱ्यांच्या कष्टाची अस्मानी संकटाने माती केली आहे.
यामध्ये उन्हाळ कांद्यासह गहू, हरभरा, डाळिंब, आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नांदगाव तालुक्यात गारपिटीने कांद्याला मोठा फटका बसला आहे. मका पीक आडवे झाले आहे. यामुळे शेतकरी पुन्हा उध्वस्त झाला आहे.
सटाणा तालुक्यातील पिंगळवाडे, आखतवाडे, बिजोटे, आसखेडा, निताने, भुयाने परिसराला गारपिटीने झोडपले. अनेक भागात गारांचा खच साचला.
१५ मिनिटे झालेल्या जोरदार गारपिटीमुळे सबकेन झालेल्या द्राक्ष बागांचे तर काढणीसाठी आलेल्या उन्हाळ कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले.
कसमादे भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने नुकसान भरपाई द्यावी व त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे, यासाठी तत्काळ यंत्रणेला सूचना देऊन पंचनामे करावेत, अशी मागणी भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा भामरे यांनी केली.
दगाव तालुक्याच्या पूर्व भागात जोरदार पाऊस होऊन गारपीट झाली. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले.
- दादाभाऊ दाभाडे, शेतकरी, मानिकपुंज, जि. नाशिक.